१ पिशाच्च मोचन यात्रा :
ही सांवत्सरिक यात्रा मार्ग. शु. चतुर्दशीला निघते. या दिवशी कपर्दीश्वरा ( शिव )- समीप स्नान करून यात्रा करावी. ही यात्रा करणाराला अन्यत्र मृत्यू आला तरी तो पिशाच-योनीत जात नाही, आणि तीर्थादी ठिकाणी घेतलेल्या दानाचे पाप नष्ट होते.
२ शिवचतुर्दशी व्रत :
शास्त्रामध्ये या व्रताचे विशेष विधान सांगितलेले आहे. या व्रतात मार्ग. शु. त्रयोदशीला एकभुक्त राहून चतुर्दशीला निराहर उपवास करावा. शिवाची पूजा करावी. पुजनात स्नान घातल्यानंतर
'शिवाय नमः पादौ । सर्वात्मने शिरः । त्रिनेत्राय ललाटम् । हराय नेत्रयुग्मम् । इन्दुमुखाय मुखम् । श्रीकंठाय स्कन्धौ । सद्यौजाताय कर्णो । वामदेवाय भुजौ । अघोरहृदयाय हृदयम । तत्पुरुषाय स्तनौ। ईशानाय उदरम् । अनंतधर्माय पार्श्वम् । ज्ञानभूताय कटिम् । अनंतवैराग्यसिंहाय ऊरू । प्रधानाय जंघे । व्योमात्मने गुल्फौ । व्युप्तकेशात्मरूपाय पृष्ठम् अर्चचामि ।
याप्रमाणे अंगपूजा करून
'नमः पुष्टयै, नमस्तुष्टयै ।
म्हणून पार्वतीपूजन करावे. त्यानंतर
प्रीयतां देवदेवो ऽ त्र सद्योजातः पिनाकधृक्'
अशी प्रार्थना करावी व वृषभ, सूवर्ण , जलपूर्ण कलश, गंध, पंचरत्न, आणि अनेक प्रकारचे भोजनपदार्थ ब्राह्माणाला अर्पण करावे व थोडे तूप सेवन करून भूमीवर झोपावे. नंतर पौर्णिमेला ब्राह्मणांची पूजा करून त्यास जेवू घालावे. अशा प्रकारे वद्य चतुर्दशीसही करावे, पुढे प्रत्येक महिन्याच्या दोन्ही चतुर्दशींना शिवपूजनादी केल्यावर मार्गशीर्षात गोमूत्र, पौषात गोमय, माघात गोदुग्ध, फाल्गुनात गोदधी, चैत्रात गोघृत, वैशाखात कुशोदक, ज्येष्ठात पंचगव्य, आषाढात बिल्व, श्रावणात जव, भाद्रपदात गोशृंगजल, आश्विनात जल आणि कार्तिकात काळे तीळ, याप्रमाणे पदार्थ यथाविधी भक्षण करावे. शिवपुजनास निरनिराळ्या महिन्यात निरनिराळी फुले घ्यावीत. मार्गशीर्षात कमळे, पौषात मंदाराची फूले, माघात मालती, फाल्गुनात धोतरा, चैत्रात निर्गुडीची फुले, वैशाखात अशोक, ज्येष्ठात मल्लिका,आषाढात पाटल; श्रावणात अर्कपुष्प, भाद्रपदात कदंब, आश्विनात शतपत्री, आणि कार्तिकात उत्पल (कमल). अशा तर्हेने पूजन केल्याने देवदेवेश महादेव प्रसन्न होतात व महाफल प्राप्त होते. शास्त्रात म्हटले आहे की, हे व्रत केल्याने महाफल मिळते.