१ अचला सप्तमी :
मार्ग . शु. सप्तमी किंवा माघ शु. सप्तमीस हे व्रत करतात.
२ उदय सप्तमी :
मार्ग. शु. सप्तमीस हे नाव आहे. हे एक तिथीव्रत आहे. व्रतावधी एक वर्ष. यात प्रत्येक महिन्यात सूर्याची निरनिराळ्या नावांनी पूजा करतात.
३ त्रितय सप्तमी :
मार्ग. शु. सप्तमीला हस्तनक्षत्र असेल तर जगत्प्रसूती सूर्यनारायणाची गंधपुष्पादींनीं उत्तम प्रकारे पूजा करावी व व्रत आचरावे. असे एक वर्षपर्यंन्त प्रत्येक शु. सप्तमीला केले तर चांगल्या कुळात जन्म, स्थायी आरोग्य आणि येथेच्छ धन प्राप्त होते.
४ निक्षुभार्क चतुष्टय :
(१) मार्ग. शु. षष्ठी व सप्तमीला उपवास, सूर्यपूजन आणि अष्टमीला भोजन,
(२) केवळ वद्य सप्तमीला उपवास व सूर्यपूजन,
(३) सप्तमीला निराहार उपोषण व पिठाचा हत्ती बनवून अर्पण करणे आणि
(४) मार्ग. किंवा माघ व. सप्तमीला दृढ व्रतधारी होऊन उपोषण, यथाविधी पूजन आणि एक वर्ष लोटल्यावर पुन्हा गंधादींनीं सूर्यपूजा, ब्राह्मणांना मणिमुक्ता, भोजनादी देउन स्वतः भोजन करणे. अशा प्रकारे व्रत केले असता भ्रूणहत्यादी पापे दूर होतात.
५ नंदा सप्तमी :
मार्ग. शु. सप्तमीला सूर्याचे पूजन करुन दही-भाताचा नैवेद्य दाखवावा. उपवास करावा. असे केल्याने सर्व प्रकारे आनंदीआनंद होतो.
६ भद्रा सप्तमी :
याच मार्ग. शु. सप्तमीला सूर्याला दूध, तूप, व उसाचा रस यांनी स्नान घालावे आणि उपवास करावा, अष्टमीला पारणे करून भोजन करावे.
७ मित्रसप्तमी :
मार्ग. शु. सप्तमीला प्रथम श्मश्रू करून घेऊन स्नान करावे व नंतर उपवास करावा. सूर्याची षोडशोपचार पूजा करून ब्राह्मणभोजन घालावे. मधुमिश्रित मधुरान्नाने स्वतः भोजन करावे. याविषयी ब्रह्मपुराणात सांगितले आहे की, सूर्याचा कोणी निर्माता नाही. तो विष्णूचा उजवा नेत्र व अदिती आणि काश्यपचा पुत्र होय. त्याला मित्र असे नामाभिधान आहे. म्हणून या दिवशी मित्रसप्तमीचा उपवास करावा. फलहार करावा आणि अष्टमीच्या दिवशी ब्राह्मणांना व नटनर्तकादिकांना भोजन वाढून मधुयुक्त अन्नाचे स्वतः सेवन करावे.
८ विष्णुसप्तमी :
मार्ग. शु. सप्तमीला रक्तचंदन आणि फुले यांनी भगवान विष्णूची पूजा करावी व वड्याचा नैवेद्य दाखवावा आणि व्रत करावे. या व्रताने अभीष्टसिद्धी होते.