|
घोड्यास चालण्याबद्दल इशारा देणें ; टांचेला मंब्रेज त्यानें घोड्यास टोंचणें . स.क्रि. १ ठार करणें ; जीव घेणें . व्युत्पत्तिदृष्ट्या , मृ ह्या धातूस अनुसरुन जरी हा अर्थ प्राथमिक आहे तथापि तो मारणें ह्या क्रियापदाच्या ऊन प्रत्ययान्त रुपाशीं टाकणें हे क्रियापद योजलें असतां , अथवा मारणें क्रियापद कांहीं विशिष्ट क्रियाविशेषणांशी किंवा क्रियाविशेषण असलेल्या जीव ह्या शब्दाशीं योजिलें असतां मात्र होतो . उदा० मारुन टाकणें ; ठार मारणें ; अगदीं मारणें ; निःशेष मारणें = जिवानशीं - जिवानें - जिवें - मारणें . २ ताडन करणें ; ठोकणें ; पिटणें ; हाणणें ( कोणत्याहि साधनानें ). ३ जिंकणें ; पराभव करणें . ४ ( पारा , वंग इ० कांच्या ) तीव्रतेचा नाश करणें . ५ हल्ला करणें ( घर , गांव , प्रवाशी इ० कांवर ). ६ लुबाडणें ; अंगावर तुटून पडून ( ठार मारुन , ठोकून , जुलूम करुन ) हिरावणें ; हिसकावून घेणें . सोनें - खजाना - हुंडी - मारली . ७ काबीज करणें ; वश करणें ; दमन करणें ( मनोविकार , इच्छा , वासना ). ८ ठोकणें ( खिळे , खुंट्या , मेखा ). ९ लावणें ; बसविणें ; न हालेसा करणें ( कुलपें , वांसे , बिड्या , कोणतीहि वस्तु इ० जलद घट्ट बसणें असा अर्थ असतां योजतात ). १० ( सोनारी धंदा ) कोणत्याहि . जिनसाला पैलू पाडणें किंवा विशिष्ट आकार देणें , ठसा उठबणें वगैरे उदा० वटंगावर बिलवर मारणें . ११ संभाळणें ; निभावणें ; निभावून नेणें ; पांर पाडणें . ही एवढी आणीबाणीची वेळ मारुन न्या म्हणजे झालें . १२ लिहिणें . पत्रकावर शेरा मारला पाहिजे . १३ करणें ह्या क्रियापदाच्या विस्तृत अर्थी ( जोर , जलदी , झटपट , चटपट इ० क्रिया दाखविणें असतां ) उपयोग करितात . उदा० एवढें काम मारतों आणि येतों . करणें याच्या अनेक अर्थी योजलेल्या मारणें क्रियापदाचे कांहीं अर्थ :- उडविणें ( बंदूक ); लढणें ( लढाई ); लगावणें ( तरवार , चाबूक , छडी ); फेकणें ; झुगारणें ( अस्त्र ); घालणें ( घाला ); आरंभणें ( धांव , नृत्य , ताण , जोर , दम , यत्न ); ठोकणें ( तंबू ); फकदिशीं आंत टाकणें , फेकणें ( तोंडांत - मिष्टान्न , घांस , बकाणा ); गट्ट करणें , खाणें ( पैसा , माल ); चलाखीनें व हुशारीनें मिळविणें , कमावणें ( धंद्यांतील नफा ); उदा० त्या व्यापारांत म्यां दोनशें रुपये मारले ; कर्कशपणें व मोठ्यानें उच्चारणें ( आरड , हाक , आरोळी , कुकारा ); झपाट्यानें , उत्सुकतेनें करणें ( मौज , कौतुक , ख्याल , बाष्कळ गोष्टी ); - चल लौकर हात मार , फडशा करुन टाक . याप्रमाणें जोरानें , झटकन केलेलें कृत्य दाखविण्याकरितां योजलेल्या मारणें क्रियापदाचीं उदाहरणें असंख्य आहेत . यावरुन जोर , दम , चलाखी , उचल ह्या अर्थांच्या द्योतक अशा घालणें , टाकणें , लावणें , पाडणे , हाणणें , ठोकणें इ० अर्थाच्या क्रियापदांच्या वर्गांतीलच मारणें हें क्रियापद असल्याचें दिसून येतें . १४ - अक्रि . लागणें ; परिणाम होणें . ह्या तळ्याची ओल त्याच्या ओटीवर मारती . काय शस्त्रांची झळक , चकाकी मारती शरीरांत एकदम उत्पन्न होणें उठणें . ( चमक , धमक , लचक , शूल , कळ , उसण इ० ); शीर - डोई - डोसकें - मस्तक - मारतें . [ सं . मृ = मरणें ; फ्रेंजि . मर ; पोर्तु . जि . मारार ] म्ह० मारशील ( जाळशील ) तर पुढें जाशील = जर तूं मला मारशील तर तूं पुढें जाशील ( तुला पुढें काय होईल तें समजेल ). मारण्याचा धाक घालणारास ताकीद देतांना ह्मणतात . मारावा हत्ती लुटावा भंडार . ( वाप्र . ) छटा , छाया मारणें - सारखेपणाची लकेर असणें . तुमच्या बोलण्यांत तीर्थरुपांच्या बोलण्याची छाया मारती . झोप मारणें , डुकल्या मारणें - निद्राग्रस्त होणें ; पेंगणें . वास , घाण मारणें - ( एखाद्या वस्तूचा ) वास , रंग , रुचि , छटा , लकेर , झांक असणें . मजा मारणें - चैन करणें ; मौज करणें .
|