रामा ! त्वां जोडिल्या त्या अतिकठिणशिळा बांधितां सेतुतें जें
श्रीशा ! तुझ्या कृपेनें तव गुणमणि म्यां जोडिले आणि वोजें ।
आहे सामर्थ्य तुझें अमित परि खरें त्वत्कृपेसी तुळेना
सामर्थ्य जें घडेना घडवि तव कृपा पार तीचा कळेना ॥९६॥
कर्ता कोण शिलावधू क्षितितळीं पाषाण तारी जळीं ?
ऐसा कोण पुरीच ने स्वमहिमें वैकुंठधामा बळी ? ।
कोणाचें तरि नाम तारक घडे प्राणप्रयाणोत्सवी ?
रामा ! तूजसमान अन्य न दिसे धुंडाळितां या भवीं ! ॥९७॥
रामा ! त्वां नगरीच सर्व अपुली वैकुंठलोकाप्रती
नेली साच गमे श्रुती सकळही त्वत्कीर्ति वाखाणिती ।
तूतें जे स्मरताति अंतसमयीं त्वद्धाम ते पावती
जे तूशीं रमले अहर्निश तयां नोहे कशी सद्गती ? ॥९८॥
पापी हो परदारवित्तहर हो वंचो जनाकारणें
मातातात वधो द्विजांप्रति छळो हो क्रूर सर्वागुणें ।
ऐसाही मरणागमीं मुखपुटीं त्वन्नाम उच्चारितां
रामा ! तो न पवेल त्वत्पद असें कोणा नये बोलतां ! ॥९९॥