श्रीरामा सुरशेखरा सुखनिधे सौन्दर्यरत्नाकरा
साकेताधिप सूर्यवंशतिलका सर्वाद्य सर्वेश्वरा ।
सीतावल्लभ सदिभूषणमणे संसारनिर्मूलना
सत्तानायक सिद्धवंदितपदा संतारिसी सज्जना ॥१॥
ब्रह्मेशानसुरेंद्रमन्मथरवीचेंद्रादि ते दिक्पती
विश्वेसाध्यमरुदृसृपितर ते सिद्धेश जे वर्तनी
हे सारे तुझियाचि पादभजनें पावोनियां उन्नती
लोका वंद्य घडोनि काम समुदे कल्पागसें अर्पिती ॥२॥
रामा ! दिव्य तुझा पलंग अहि हा सामर्थ्य ऐसें वरी
त्रैलोक्यांग तुला रमा सहसुखें वाहे शरीरावरी ।
पाहा सर्षपबीजसी वसुमती अक्लेश माथां घरी
जे मेरुसरिता समुद्रभुवनाधारा विराजे परी ॥३॥
भूभारोद्धरणार्थ विश्वजनकें पूर्वी तुला प्रार्थिलें
यासाठी क्षितिपाळ होउनि तुवां सत्कार्य संपादिलें ।
धर्मी सज्जनवेदयज्ञविबुधा संस्थापिले राघवा
तूं सर्वाद्य म्हणोनि खेळ करिसी शैलूष तैसा नवा ॥४॥
झाली धन्य तुझीच एक जननी त्या योषितांच्या गणी
झाला श्लाघ्य तुझाच एक जनिता भूपाळचूडामणी ।
विश्वाचा जनिता तुला स्वजठरीं वाहे सती आदरें
देवा ! दाशरथी असें म्हणविसी कैं पुण्य वानूं सरे ॥५॥
रामा ! त्वत्तनुकंतिनीळ विलसे ऐसें मला हें दिसे
जे तूझे निजभक्तदोष समुदें त्वां घेतले भर्वसे ।
तूझे जे गुण शुद्ध सर्वहि तया त्वां दीधले सुंदरा
तूं दूर्वादलशामकोमलवपूधर्ता जगत्शेखरा ॥६॥
संसारातपतप्तदाहशमनीं तूं नीळमेघाकृती
रामा ! घेउनि पूर्णवृष्टि करिसी स्वांतामृतें श्रीपती ।
झाली त्या समयींच जाण चपला देवी धरित्रीसुना
आतां तापविपत्ति राहिल कसा भक्तां तुह्मांदेखतां ॥७॥
तूझें रुप अनूप भूषणगणीं जें सांबळे शोभतें
सीतालिगित भद्रपीठशिखरीं सानंद तें तिष्ठतें ।
जैसें सुंदर नीलवर्ण गगनें नक्षत्रमालागणें
पर्वी शारदचंद्रिकेसह जगी या शोभिजे सदगुणें ॥८॥
या तूझ्या वदनांबुजासम शशी लाहे कलंकी कसा
कंदपीयुत सुंदरा जिणुनियां जें शोभतें राजसा ।
फुल्लांभोज तसें विकासित दिसे हें सर्वदां राघवा
जेथें हास्यसुधामरंद विलसे जो नित्य वाटे नवा ॥९॥
हे तुझे भुजयुग्म मार्गजमणिस्तंभापरी शोभती
औदार्यै तरि कल्पभूरुहमहाशाखांसि हे जिंतिती ।
शत्रुतें वधिती स्वभक्तसुजनाधर्मासि संस्थापिती
कोदंडेशु धरोनि हे विलसती दीनावना सांप्रती ॥१०॥
नेत्रीं चारुकटाक्ष शीतकिरणा पीयूषधारा घना
जिंती शीतळ आणि माधुरपणें रामा ! जगत्कारणा ! ।
तूझ्या सत्करुणांबकें निरखिसी जीवासि ज्या चिद्धना
तो पावे परमंपदासि म्हणति गाती श्रुती पावना ॥११॥
हें तूझें हदयारविंद सकळ ज्ञानासि राहावया
झालें आस्पद हें म्हणोनि बहुशा विस्तार पावे तया ।
तत्रापि द्विजपादचिन्ह मिरवे रोलंबसान्यें वरी
जेथें नित्य करोनि पूर्ण वसती राहे रमासुंदरी ॥१२॥
साजे तें वटपत्र पोट बरवें त्रैलोक्य जेथें वसे
सर्वागीं सुर राघताति तुझिया रामा ! महासौरसें ।
तत्वें सर्व तुझ्याच आश्रयवशें देही तुझ्या राहती
तूं सर्वाश्रय, तूं विना आणिक ते कोणासि नाहीं गती ! ॥१३॥
हें पीतांबर शोभतें कटितटीं संध्यांवराचे परी
जेथें सुंदर बूटचित्र दिसती त्रैलोक्य चित्रें बरी ।
तूझ्या श्रेष्ठ अशा विराटवपुला शोभा अनंता करी
हे लीला तव काय वर्णन करुं जाणे लघू वैखरी ? ॥१४॥
रामा ! त्वत्पदपद्म पाउनि जरी ते इंदिरा सुंदरी
राहे लोघुनि आझुनी सुखघनामोदा मिलिंदीपरी ।
सेवी प्रेममरंद पावन सती जे जन्मभू नादरी
अद्यापी मुनिमामसें भ्रमरसी ते भोंवती सादरीं ! ॥१५॥
रामा ! त्वन्नखचंद्रिकारजयुता होवोनि भागीरथी
गेली सिंधुसमागमा समरसा पावोनि राहे सती ।
जेव्हां सागर मंथिला सुरवरीं हव्यंगवीनापरी
झाला हा शशिपिंडमंडित जगीं पियूषज्योत्स्नावरी ॥१६॥
रामा ! त्वत्करपंकजाहुनि बरे पादाब्ज हे आगळे
ऐसें बोलति सर्वही निगम ते मोठे कवीही भले ।
लंकाराज्य दिल्हें करीं धरुनियां वीभीषणा सद्यशा
पाहा पादरजें पळांत घडली पाषाण एणीदृशा ॥१७॥