कीर्तीनें तरती क्षितीं मनुज ते पाताळिच्या दानवां
पावाया तव भोतिकारण घडे तूझ्या पदीं वैभवा ।
रामा ! स्वर्गवतां तथा मुनिजनां त्वद्भक्ति तारीतसें
द्वेषीभक्तउपेक्ष्य यापरि तुला वैषम्य देवा नसे ॥८४॥
शिष्टांतें परिपाळितोसि म्हणती दुष्टांस संहारिसी
माया मात्र तुझी दिसे उभयतां तूं निश्चयें पाळिसी ।
कोण्या एकमिसें दयांबुधि तुवां उद्धार त्याचा किजे
देवा ! निर्घृण तूं ह्नणोनि तुजला त्या तामसीं मानिजे ॥८५॥
आहे मी सस सर्वभूतनिवहीं वैषम्य नाहीं मला
गीतेमाजि असाचि अर्थ बरवा त्वां अर्जुना बोधिला ।
तैं आलें मम मानसाप्रति बकी मारावयाला तुला
आली ते जननीगतीस मिनली नाहीं पदा ज्या तुळा ॥८६॥
रामा ! त्वत्प्रियवल्लभा दशमुखें नेली वनीं चोरुनी
तेणें कष्ट तुला बहूत घडले ते हिंडतां मेदिनी ।
ऐशा दुष्टमतीसही पद तुवां दिल्हें ! मुनीद्राप्रती
नोहे लभ्य अनंत सौख्य विलसे तैं पावला निश्चितीं ॥८७॥