दुःखोदर्केषु कामेषु जातनिर्वेद आत्मवान् ।
अजिज्ञासितमद्धर्मो गुरुं मुनिमुपाव्रजेत् ॥३८॥
शेंडा धरूनि समूळ । ज्याचें उत्तरोत्तर दुःख फळ ।
अतिबाधक विषयजाळ । त्यासी केवळ जो अनासक्त ॥२७०॥
माझे प्राप्तीलागीं चित्त । सदा ज्याचें आर्तभूत ।
स्वधर्मकर्मीं वर्तत । जो वेदशास्त्रार्थ विवंची ॥७१॥
इहामुत्रभोगीं निश्चित । त्रासलें असे ज्याचें चित्त ।
ऐसा जो कां नित्य विरक्त । अतिविख्यात मुमुक्षु ॥७२॥
तेणें साधवया ब्रह्मज्ञान । तेचि साधनीं लावितां मन ।
स्वकर्म झालिया विलक्षण । आली नागवण प्रत्यवायें ॥७३॥
तेणें कर्म संन्यासोनि जाण । करावें संन्यासग्रहण ।
सद्गुरूसी रिघावें शरण । तेणें ब्रह्मज्ञानपदप्राप्ती ॥७४॥
एक केवळ भावार्थीं । नेणे स्वधर्मकर्मगती ।
नेणे शास्त्रश्रवणव्युत्पत्ती । परी माझी प्रीती अनिवार ॥७५॥
तेणेंही संन्यासूनि जाण । गुरूसी रिघावें शरण ।
त्यासीही गुरुकृपा जाण । ब्रह्मज्ञानअवाप्ति ॥७६॥
गुरु करावा अतिशांत । शास्त्रार्थ परमार्थपारंगत ।
त्याचे सेवेचा भावार्थ । स्वयें श्रीकृष्णनाथ सांगत ॥७७॥