यस्त्वेतत् कृच्छ्रतश्चीर्णं तपो निःश्रेयसं महत् ।
कामायाल्पीयसे युञ्ज्याद्बालिशः कोऽपरस्ततः ॥१०॥
एवं वानप्रस्थ अतिकष्टीं । तपादिसाधनसंकटीं ।
भोगफळाशेच्या तुटीं । मोक्षपरिपाटी पावले ॥५०॥
जें हाता आलें मोक्षफळ । आविरिंच्यादि मंगळ ।
तें तपादिसाधन निर्मळ । कामार्थ केवळ कल्पिती ॥५१॥
जेवीं कां चिंतामणीचियेसाठीं । मागे चातीलागीं खापरखुंटी ।
कां परीस देवोनि पालटीं । काळी गोमटी वीट मागे ॥५२॥
तेवीं मनुष्यपणाचिये स्थितीं । उत्तम जन्में तपःप्राप्ती ।
ते तपःक्रिया व्यर्थ करिती । काम वांछिती ते मूर्ख ॥५३॥
त्या मूर्खांचें मूर्खपण । किती सांगावें गा गहन ।
मोक्षप्राप्तीचें साधन । कामलिप्सा जाण नाशिलें ॥५४॥
असो हें मूर्खाचें कथन । वानप्रस्थाचेंचि लक्षण ।
पूढील सांगेन संपूर्ण । शस्त्रार्थ जाण सुनिश्चित ॥५५॥
जो वानप्रस्थ आपण । तपादि साधनीं अतिक्षीण ।
झाला तरी वैराग्यज्ञान । ज्यासी जाण नुपजेचि ॥५६॥
पन्नास वर्षें गार्हस्थ्य । दोनी द्वादशें वानप्रस्थ ।
झाला तरी जो अप्राप्त । वैराग्ययुक्त निजज्ञाना ॥५७॥
आयुष्याचे तीन भागवरी । वेंचलें गा ऐशापरी ।
आतां चतुर्थ भाग उरल्यावरी । क्षीण शरीरीं जर्जर ॥५८॥
ऐसें शरीर झालिया क्षीण । अल्पही वैराग्य झाल्या जाण ।
करावें संन्यासग्रहण । कर्माचरण यथाशक्ती ॥५९॥
वानप्रस्थाश्रमी झाल्याही । निःशेष वैराग्य अल्पही ।
सर्वथा नुपजे ज्याच्या ठायीं । त्याचा अधिकार पाहीं हरि बोले ॥६०॥