बिभृयाच्चेन्मुनिर्वासः कौपीनाच्छादनं परम् ।
त्यक्तं न दण्डपात्राभ्यामन्यत्किञ्चिदनापदि ॥१५॥
भूतां अभयदानपुरस्कर । संकल्पपूर्वक प्रेषोच्चार ।
तैं उरलें दिसे देहमात्र । सर्वस्य येर त्यागिलें ॥७६॥
जो गुरुवाक्यश्रवणासरिसा । वस्तूचि होऊनि ठेला आपैसा ।
उडाला देहबुद्धिचा वळसा । तुटला फांसा कर्माचा ॥७७॥
त्यासी विधिविधान कर्तव्यता । बोलोंचि नये गा सर्वथा ।
नवनीत आलिया हाता । रितें ताक आतां कोण घुसळी ॥७८॥
कापूर मिळालिया वन्हीं । तो परतेना कापूरपणीं ।
तेवीं वस्तु झाला जो गुरुश्रवणीं । तो विधिकिंकरपणीं वर्तेना ॥७९॥
परी गुरुवाक्यें तत्त्वतां । ज्यासी ऐसी हे अवस्था ।
सत्य न बाणेचि सर्वथा । त्याची विधानता अवधारीं ॥८०॥
गुरुवाक्याचें करितां मनन । नागवेपणीं लाजे मन ।
तरी लिंगमात्र आच्छादन । कौपीन जाण धरावी ॥८१॥
इतुकेन निर्वाह न सरे । ऐसें जाणवलें जैं पुरें ।
तैं वस्त्रखंड दुसरें । स्वाधिकारें धरावें ॥८२॥
दंड कमंडलु जंव आहे । तंव कौपीन बहिर्वास राहे ।
दंडत्यागासवें पाहें । त्याग होये वस्त्रांचा ॥८३॥
आपत्तिकाळीं संन्याशासी । रोग लागला होय ज्यासी ।
का जरेनें व्यापिलें देहासी । तैं जें लागेल त्यासी तें द्यावें ॥८४॥
गुरुवाक्यें श्रवण मनन । ऐसें साधी जो साधन ।
त्या साधकाचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥८५॥