मौनानीहानिलायामा दण्डा वाग्देहचेतसाम् ।
न ह्येते यस्य सन्त्यङ्ग वेणुभिर्न भवेद्यतिः ॥१७॥
मौन अथवा सत्य भाषण । कां श्रीरामनामाचें स्मरण ।
हो कां ओंकाराचें उच्चारण । `वाग्दंड' जाण या नांव ॥९६॥
शरीरींचे जितुकें चळण । तें प्राणाचेनि बळें जाण ।
त्या प्राणाचें प्राणरोधन । करावें आपण प्राणायामें ॥९७॥
प्राणायामें निजप्राण । जिणोनि करावा स्वाधीन ।
या नांव `देहदंड' जाण । ऐक लक्षण `मनोदंडाचें' ॥९८॥
मनाचें चपळपण । संकल्प विकल्प जाण ।
त्याचें करावया छेदन । ब्रह्मानुसंधान करावें ॥९९॥
माझें स्वरूप सर्वगत । तेथ निश्चयें ठेवितां चित्त ।
मन संकल्पविकल्पें जाय जेथ । तेथ तेथ स्वरूप ॥१००॥
ऐसें सावध राखतां मन । दृढ लागल्या अनुसंधान ।
तंव संकल्पविकल्प क्षीण । सहजचि जाण स्वयें होती ॥१॥
देह वाचा आणि मन । या त्रिदंडांचें लक्षण ।
तुज म्यां सांगितले संपूर्ण । संन्यासत्व जाण येणें सत्य ॥२॥
हे तिन्ही दंड नसतां जाण । केवळ वेणुदंडग्रहण ।
तेणें संन्यासत्व न घडे जाण । देहविटंबन दंभार्थ ॥३॥
सन्याशाचा आहार विहार । आचार संचार विचार ।
स्वधर्मयुक्त साचार । स्वयें सारंगधर सांगतु ॥४॥