यदृच्छयोपपन्नान्नमद्याच्छ्रेष्ठमुताऽपरम् ।
तथा वासस्तथा शय्यां प्राप्तं प्राप्तं भजेन्मुनिः ॥३५॥
सहज भिक्षेसी आलें जाण । शुष्क अथवा मिष्टान्न ।
तेणें करावें प्राणधारण । रसनालालन सांडोनि ॥४७॥
निद्रालस्याचें न ये प्रस्थान । तैसें करावें प्राणधारण ।
दृढ ठसावें आसनध्यान । `युक्ताहार' जाण या नांव ॥४८॥
वल्कल अथवा अजिन । नवें अथवा वस्त्र जीर्ण ।
सहजें प्राप्त झाल्या जाण । करी प्रावरण यथासुखें ॥४९॥
कंथा हो कां मृदु आस्तरण । तृणशय्या कां भूमिशयन ।
स्वभावें प्राप्त झाल्या जाण । तेथही शयन करी मुनि ॥२५०॥
मी एक भोक्ता शयनकर्ता । हेही नाहीं त्यासी अहंता ।
स्नानादि कर्मीं वर्ततां । त्याची निरभिमानता हरि सांगे ॥५१॥