सोन्याची सुपली बाई मोत्यांनी गुंफली
तिथं आमच्या वन्सं खेळत होत्या
वन्सं वन्सं, मला आलं मूळ
गुणाचे गौरी मला काय पुसतीस पूसजा आपल्या दिराला
सोन्याचा चेंडू बाई मोत्यांचा दांडू
तिथं आमचे भाऊजी खेळत होते
भाऊजी भाऊजी, मला आलं मूळ
गुणाचे गौरी मला काय पुसतीस पूस जा आपल्या जावेला
सोन्याची रवी बाई रुप्याचा डेरा
तिथं आमच्या जाऊबाई ताक करीत होत्या
जाऊबाई जाऊबाई, मला आलं मूळ
गुणाचे गौरी मला काय पुसतीस पूसजा आपल्या सासर्याला
सोन्याची सहाण बाई रुप्याचं खोड
तिथं आमचे मामाजी पूजा करीत होते.
मामाजी मामाजी, मला आलं मूळ
गुणाचे गौरी बरीच दिसतीस पूसजा आपल्या सासूला
सोन्याचा करंड बाई रुप्याचा आरसा
तिथं आमच्या सासूबाई कुंकूं लावीत होत्या
सासूबाई सासूबाई, मला आलं मूळ
गुणाचे गौरी बरीच दिसतील पूस जा आपल्या नवर्याला
रुप्याचा पलंग बाई रेशमाची गादी
तिथं आमचे पति निजले होते
पति पति, मला आलं मूळ
आणा फणी, घाला वेणी, जाऊंद्या राणी माहेरा