सईच्या अंगणीं झोकुन दिलं बाई झोकुन दीलं
चोळुन मोळुनी राळ केलं बाई राळ केलं
सईनं उचलूनी घरांत नेलं बाई घरांत नेलं
कांडुन कुटूनी तांदुळ केलं बाई तांदूळ केलं
म्होरच्या बाजारीं विकाय नेलं बाई विकाय नेलं
त्या बाई तांदळाचा खुरदा आला बाई खुरदा आला
त्या बाई खुरद्याची बांगडी लेली बाई बांगडी लेली
सासूबाईनं ठोसला दिला बाई ठोसला दिला
तो बाई ठोसला दूरच्या दूर बाई दूरच्या दूर
माझं माहेर पंढरपूर बाई पंढरपूर
माझं आजूळ रत्नांगिरी बाई रत्नांगिरी
माझ्या हातांत कोइमतुरी चुडा बाई चुडा
मला बसायला निळ्ळा घोडा बाई निळ्ळा घोडा
कोण्या देशींचे गहू आणले बाई गहू आणले
त्याच्या चपात्या केल्या नऊ बाई केल्या नऊ
त्या बाई चपातिच्या तारा तुट बाई तारा तूट
माझ्या झिम्माचा धिंगाणा उठ बाई धिंगाणा ऊठ