६१.
निजाधीनता जी विहंगां पशूंना
नको काय ती विक्रमी पांडवांना
तुझ्या सेवकांची अशी ही अवस्था
कशी पाहसी स्वस्थ वैकुंठ-नाथा ?
६२.
कसें यापुढे सांग आम्हीं जगावें
उद्या काय माध्यान्हकालीं गिळावें
दशा आज अन्नान्न केली खलांनीं
तुला कींव ये ना कशी चक्रपाणि ?
६३.
अनुज्ञा रिपूंच्या वधा धर्म दे ना
धनी हा असें कां करी तें कळेना
बरी काय हिंसा अहिंसा जगीं या
पडे प्रश्न हा काय याला कन्हैया ?
६४.
रिपूंच्या वधा भीम उद्युक्त झाला
परी पार्थ हा बैसवी स्तब्ध त्याला
कळेना मला काय यांना म्हणावें
अहिंसेंत त्यांनी वृथा कां शिरावें ?
६५.
कुलाचार कां टाकिला या हरीनीं
स्वधर्मास कां सोडिलें आज यांनी
अनायास चालून हें भक्ष्य येतां
हरी हे वृथा टाकिती कां अनंता ?
६६.
तुवां मारिलें ठार त्या दुष्ट कंसा
पुरा तूंच केली मधू-दैत्य-हिंसा
तुझा हा शुभाचार हे जाणुनीया
अहिंसा कसे लागले आचराया ?
६७.
जरी अग्निनारायणाची सुता मी
जरी विक्रमी पांडुपुत्रां वरी मी
तरी संकटीं ना कुणी तारणारा
मला रक्षिता एकला तूं उदारा.
६८.
किती मी तुला आळवूं श्रीनिवासा
खलांनी मला जीव केला नकोसा
कधीं सांग येणार तूं मंदिरीं या
अहंकार हा कौरवांचा हराया ?
६९.
नको वामकुक्षी करुं आज देवा
नको अंगिकारुं तुझी पादसेवा
धुमाकूळ हा घातला या खलांनीं
पहायास ये आयुधें पाजळोनी.
७०.
घरा माझिया आग ही लागतांना
तुझे मित्र अग्नींत हे पोळतांना
सुखानें तुला लागते झोप कैसी
चमत्कार हा वाटतो मन्मनासी.