५१.
भिकारी तुझे कांत हे टाकुनीयां
वरी सुंदरी वैभवी कौरवा यां
असें बोलला हा मदांधाक्ष पापी
क्षमायास हा योग्य नोहे कदापी.
५२.
भणंगांस त्यां सोड तूं याज्ञसेनी
तुला लेखितो आज मी पट्टराणी
कुलांगार माझा धरी लोभ ऐसा
वधा योग्य हा निश्चयें श्रीनिवासा.
५३.
मदांधास या जाहली भूतबाधा
गमे यास वारांगना मी मुकुंदा
झणी धांव पंचाक्षरी होउनीयां
समुच्छेद या दुर्जनांचा कराया.
५४.
अनार्यास या द्यूत झालें यशस्वी
तयें यास उन्माद आला मनस्वी
उणीं उत्तरें मत्त देतो मला हा
प्रभावा तुझ्या दाखवी या वराहा.
५५.
अकालीं तुला काळ नेईल मत्ता
असें शापिलें कौरवा मी अनंता
करावी खरी ही तुवां शापवाणी
तुला प्रार्थिते ही स्वसा याज्ञसेनी.
५६.
खलांनी भ्रतारांस निःशस्त्र केलें
प्रभो त्यामुळें मी निराधार झालें
कधीं सांग येणार तूं भक्त-काजा
विलंबें तुझ्या घात होईल माझा.
५७.
महाविक्रमी सर्व हे धर्म-बंधू
क्षणार्धामधें प्राशिती शत्रु-सिंधू
परी धर्मपाशामुळें आज यांना
स्वयंनिर्णयें वागतां येथ ये ना.
५८.
खलें आमुची जिंकिली राज्य-लक्ष्मी
परंतू तयाची न मानी क्षिती मी
प्रयत्नें पुन्हां निश्चयें मेळवूं ती
प्रसादें तुझ्या शस्त्र येतांच हातीं.
५९.
दिला शस्त्र-संन्यास यांना खलांनी
गमे कल्पनातीत ही मानहानी
विनाशस्त्र आम्ही कसें वावरावें
अशस्त्रें कसें विक्रमा दाखवावें ?
६०.
महाविक्रमी कांत हे यत्नवादी
परी आड ये त्यांस ही शस्त्रबंदी
अशा आततायी रिपूंना वधाया
करीं शस्त्र दे शीघ्र यांच्या कन्हैया.