३१.
अनाचार साध्वीस हा ओढण्याचा
मदांधाक्ष या नीच दुःशासनाचा
पहा येउनी हाल हे त्वत्स्वसेचे
निवारी त्वरें दुःख बाह्यांतरीचें.
३२.
करी यादवा दंड या दुर्जनाला
मदंगास हा झोंबला धुंद मेला
धरायास वेणी धजे त्वत्स्वसेची
कळूं दे तया ही फणा नागिणीची.
३३.
अरे आज अस्पृश्य ऐकांबरा मी
सभा-मंदिरीं यावया योग्य कां मी
असा राजवाड्यांत मी प्रश्न केला
परी कींव माझी न आली खलाला.
३४.
रहा नग्न किंवा रहा एक वस्त्रें
तुला पृच्छितो कोण कृष्णे अशस्त्रे
असें बोलला मत्त चांडाळ मेला
सुरा ये त्वरें छेद याच्या जिभेला.
३५.
नको ही मला सोसणें अप्रतिष्ठा
स्वसेची तुला ही रुचे काय चेष्टा
कसें ईश्वरा स्वस्थ हें पाहतोसी
झणी आज तूं कां न धाऊन येसी ?
३६.
करुनी जुवारांत कौटिल्य देवा
खलें जिंकिला आमुचा सर्व ठेवा
सवें आमुचें राज्यही जिंकियेलें
पुढें पांडवां निंद्य हें दास्य आलें.
३७.
मतिभ्रष्ट केलेंस कां मत्पतींना
किमर्थी भ्रमीं पाडिलें तूं तयांना
तुवां रक्षिलें पांडवां आजवेरी
कुठें त्वत्कृपा आज गेली मुरारी.
३८.
कसा हा अनाचार तूं पाहतोसी
कुठें सज्जना आज तूं गुंतलासी
सुखें पाहसी काय तूं क्लेश माझे
तुला जाहले आज मी काय ओझें ?
३९.
तुझी मी कधींही न केली अवज्ञा
भजावें तुला हीच माझी प्रतिज्ञा
दुजी भावना ऐकमेकांत नाही
अभिप्रायही आपुला ऐक राही.
४०.
असंदिग्ध ऐशी स्थिती राहतांना
मला कां बरें क्लेश होतात नाना
असा काय अन्याय केला तुझा मी
कथी काय केलीं अघें पूर्वजन्मीं !