१.
नमस्ते प्रभो वृष्णिवंशावतंसा
नमस्ते सदा वत्सला श्रीनिवासा
नमस्ते विभो सच्चिदानंदकंदा
नमस्ते हरे रामकृष्णा मुकुंदा.
२.
हरे गोपगोपीप्रिया वासुदेवा
नमस्ते गुरो नित्य देवाधिदेवा
प्रभो द्वारकानाथ गोपालकृष्णा
तुला आदरें वंदिते आर्त कृष्णा.
३.
तुझी श्रीहरे मानिलेली स्वसा ही
पृथेची स्नुषा द्रौपदी सौम्य-देही
बुडाली पहा सागरीं संकटाच्या
छळांतून ही सोडवी कौरवांच्या.
४.
प्रतिज्ञा जणूं घेतली या खलांनीं
छळाया तुझी ही स्वसा याज्ञसेनी
हरे ये त्वरें द्यूत-लीलांगणीं या
मला संकटांतून या सोडवाया.
५.
मला वेढिलें या नृदेही पशूंनी
स्वसेला तुझ्या गाठिलें आडरानीं
सुचेना मला काय आतां करावें
तुवां सत्वरीं येथ येऊन जावें.
६.
करुं मी कसे क्लेश हे सह्य आतां
व्यथा सोसवेना मुळीं विश्वनाथा
झणीं येउनी हे पहा कष्ट माझे
तनू जाहली आज जीवास ओझें.
७.
स्वयोगें पहा ही स्थिती दैन्यवाणी
तुला आदरें प्रार्थिते याज्ञसेनी
पळूं मी कुठें सांग येथून आतां ?
दडायासही वाव नाहीं अनंता.
८.
जुवारास बोलावुनी आग्रहानें
फशीं पाडिले मत्पती या नृपानें
धरी नित्य विद्वेष हा पांडवांशी
करी अंतका नष्ट हा पापराशी.
९.
समुच्छेद या गोत्रजांचा कराया
करी सर्वदा यत्न हा देवराया
विभू मांडुनी मानभावीपणानें
गळा कांपिला आंबिकेयें कचानें.
१०.
चळे भूप वृद्धापकाळामुळें हा
स्वयें लाविली आग यानें स्वगेहा
उतावीळ हा जाहला आत्मनाशा
महेशा करावी न याची निराशा.