४१.
मदोन्मत्त दुर्योधनें देवराया
कुशद्बें मला ताडिलें मंदिरीं या
वदे श्रीधरा हा मला तुच्छ दासी
पुन्हा बोलला चाल माझ्या निवासीं.
४२.
घरे पाडिती बोल हे काळजाला
परंतू करुं काय मी या खलाला
अशस्त्रा पुन्हां निर्बला मी मुकुंदा
न ये शासिताम त्यामुळें या मदांधा.
४३.
शिरीं लादलें दास्य कृष्णा खलांनी
अमर्याद ही वाटते मानहानी
तुझ्या दिव्य सामर्थ्ययोगें दयाळा
पराधीनता सत्वरीं ने लयाला.
४४.
जिथें लाभला मान सन्मान मातें
रहावें कसें दास होऊन तेथें
नको हें जिणें सद्गुरो दैन्यवाणें
कसें आवडावें मला दास होणें !
४५.
पराधीन या मद्धवांनी असावें
मृतान्नेंच या भामिनीनें जगावें
वयें आमुचीं मानहानींत जावीं
असा लेख या खोदिला काय दैवीं ?
४६.
खलांची अहोरात्र सेवा करावी
तयांच्या पुढें मान मी वाकवावी
असावें पराधीन जन्मांतरीं मी
असें प्रार्थिलें काय मी पूर्वजन्मीं ?
४७.
नखें काढुनी या हरीनी फिरावें
विनाशस्त्र यांनी जगीं वावरावें
कपाळावरी या हरींच्या जयंता
लिही अक्षरें काय ऐसी विधाता ?
४८.
पराभूत युद्धांत होतां हरी हे
जरी राज्य जातें तरी दुःख नोहे
असत्यें पहा जिंकिलें या खलांनी
गमे श्रीपते ही मला मानहानी.
४९.
जिता बोलतो हा मला भामिनीला
वरी हांसुनी डागितो काळजाला
कसें दाखवूं तोंड मी हें जगाला
पराधीन हा लागला डाग ज्याला.
५०.
विवस्त्रा अशी आपुली मांड डावी
मला माधवा हा मदोन्मत दावी
बलात्कार कृष्णेवरी आज झाला
कधीं त्वेष येणार धर्मानुजाला ?