११.
लढा लावितो बंधुबंधूमधें हा
दुही एकमेकांमधें माजवी हा
बघे भौज ती सर्वदा कौतुकानें
सदा वागतो सौबलाच्या मतानें.
१२.
मिठी मारितो एकदां आत्मजांना
दुरी लोटितो तेधवां पांडवांना
तिरस्कार जेव्हां करी आत्मजांचा
धरी तेधवां पक्ष बंधू-सुतांचा.
१३.
महाराज हा आत्मसत्ताभिलाषी
अविच्छिन्न हा आत्मजांचा हितैषी
धरी नित्य हा मत्पतीशीं असूया
वरी दावितो प्रेम मोठें कन्हैया.
१४.
करी भूप हा आमुचा द्वेष बुध्द्या
गमे वांकडें यास गोष्टींत साध्या
अशी ही विरोधी स्थिती राहतांना
मिळावें कसें सौख्य या पांडवांना ?
१५.
अविश्वास हा धर्म याचा दयाळा
कधीं ना मिळे त्यामुळें सौख्य याला
नसे ठाउकें ऐक्य या भूपतीला
जणूं द्वैत आसधिलें पांचवीला.
१६.
स्थिती पाहतां भूप हा नामधारी
मदोन्मत्त हे एकशें कारभारी
मतीमंद हा अंध अन्यावलंबी
महा हावरा वृद्ध हा राज्य-लोभी.
१७.
जुवारा दिली मान्यता या नृपानें
यदा घेतला हट्ट दुर्योधनानें
मनस्वी करी लाड हा आत्मजांचे
सहर्षें करी पूर्ण हा हट्ट त्यांचे.
१८.
महाराज हा पुत्र-शोकें मरुं दे
सदा घोरशा रौखीं हा पडूं दे
त्वरें ये निसंतान याचें कराया
वृथा भार हा राजसिंहासना या.
१९.
समुत्कर्ष या कौरवांचा असावा
सवें पांडवांचा समुच्छेद व्हावा
असें एच्छितो भूप हा मानभावी
म्हणूनी भली यास शिक्षा करावी.
२०.
क्रिया आणि कर्मांतरें लाडक्यांचीं
करावीं स्वयें ही स्पृहा या नृपाची
सदिच्छेस या आड येऊं नको तूं
करी पूर्ण याच्या मनांतील हेतू.