२१.
महाभाग जे अच्युता मानिले मी
गुरु द्रोण गांगेय ते अर्थकामी
तपस्वी गुरु हे दुजे ब्रह्मचारी
परंतू क्षमायास हे नाधिकारी.
२२.
नृपान्नावरी नित्य हे पोसलेले
परस्वेंच हे वृद्ध ओशाळलेले
मला न्याय द्याया न हे सिद्ध देवा
तुवां येउनी न्याय माझा करावा.
२३.
जुवारांत आधी पती दास होतां
कशी लावितां ये पणा धर्म-कांता
असंदिग्ध हा प्रश्न केला सभेला
परंतू न ये सोडवाया कुणाला.
२४.
कशी हो जिता मानिता याज्ञसेनी
गुरुंना असें पृच्छिलें मी नमूनी
परंतू अतोनात मिंधे गुरु हे
मला सांगती धर्म हा सूक्ष्म आहे.
२५.
अहो सभ्य हो न्याय माझा करा हो
असा फोडिला येथ मी दीर्घ टाहो
परी भीष्म हे बोलले वासुदेवा
तुझा द्रौपदी न्याय धर्में करावा.
२६.
जगन्मान्य विख्यात हे तत्त्ववेत्ते
असे बोलती आज संदिग्ध मातें
तपोवृद्ध हे जाहले पक्षपाती
पहा न्यायदेवीस लाथाळिताती.
२७.
अपेशी यदा कौरवां द्यूत होतें
यदा निंद्य हे दास्य जावेस जातें
तदा लागतां न्याय हा कां तिलाही
मला जो दिला आज या द्यूत-गेहीं.
२८.
प्रभो लाज गुंडाळिली या गुरुंनी
तुला सांगते स्पष्ट ही याज्ञसेनी
गुरु न्याय देतील ऐसी मदाशा
परी जाहली आज माझी निराशा.
२९.
शुभा न्यायदेवी मृतप्राय झाली
नसे बापुडीला कुणी येथ वाली
परीक्षा हिची सत्वरीं तूं करावी
हिला औषधें देउनी वांचवावी.
३०.
पवित्रोदकें जाहलें स्नान ज्यांना
महावातही ज्यां शिवाया धजेना
अशा माझिया कुंतलां ओढुनीयां
मला आणिली द्यूत-लीलांगणीं या.