जय जगज्जननि, विठाबाई । उठो हो जागृत लवलाही ॥धृ०॥
क्षिराब्धीवासि गरुडवाहन । नावडे शेषावर शयन
दवडिला पुत्र वेदवदन । विशेषहि लक्ष्मीवर न मन
आगळें वैकुंठाहून । आवडे पंढरपूर भुवन
(चाल)- निर्मळ वाहे चंद्रभागा
पावति कोटि पापें भंगा
दंडकारण्य-धन्य लावण्य-पुण्यहि अगण्य
कटिं कर विटेवरता राही । उभा प्रत्यक्ष शेषशायी ॥१॥
सुयोधन लाक्षागृहीं कोंडी । पांडव दहनांतुनि काढी
वसन बळें दुःशासन ओढी । नेसवी दौपदिला लुगडीं
बंधनें पतितांची तोडी । पुरवी भक्तांच्या आवडी
(चाल) मृत स्त्री संकट जयदेवा
मेहता नरसिंह करि धावा
धावणें आज-राखणें लाज-उचित हें काज
गौरवी त्याचा जावई । उग्र विष प्याली मिराबाई ॥२॥
पितांबर शोभतसे पिवळा । गळ्यामधें तुळसीच्या माळा
हर हर सदाशिव भोळा । सदा शिरिं धरिसी घननीळा
मिळाला भक्तांचा मेळा । ललाटें घासिति पदकमळा
(चाल) नीरांजन-धूप-दीप आरती
सुमंत्रे पुष्पांजुळि वाहती
सदा आनंद-राधेगोविंद-लागला छंद
विठ्ठल, विठ्ठल, रुखमाई । भजनें होति ठाइं-ठाई ॥३॥
तुजविण एकला मी कष्टी । कृपेची सकळांवर वृष्टी
एकदां मजकडे जगजेठी। क्षणभर करसिल जरि दृष्टी
तरि मग स्वमुखें परमेष्ठी । मजला धन्य म्हणेल सृष्टी
(चाल) ऐकुनी करुणेची वाणी
कृपेनें द्रवे चक्रपाणी
प्रभु, वनमाळि-ब्रीद सांभाळि-दिनाप्रति पाळि
प्रकटे भक्ताच्या हृदयीं । विष्णुदास लागे पायीं ॥४॥