युगें अठ्ठावीस विटेवर उभा ॥ वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ॥ चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥
जयदेव जयदेव जय पांडुरंगा ॥ रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावें जिवलगा ॥ धृ ॥
तुळसीमाळा गळां कर ठेउनि कटी ॥ कांसें पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥
देव सुरवर नित्य येती भेटी ॥ गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ॥ जय. ॥ २ ॥
धन्य वेणूनाद अणुक्षेत्र पाळा ॥ सुवर्णाची कमळें वनमाळा गळा ॥
राई रखुमाबाई राणीया सकळा ॥ ओंवाळीती राजा विठोबा सांवळा ॥ जय. ॥ ३ ॥
धन्य पुष्पावती भीमासंगम ॥ धन्य वेणूनाद उभें परब्रह्म ।
धन्य पुंडलीक भक्त निर्वाण ॥यात्रेसी येती साधु सज्जन ॥ जय. ॥ ४ ॥
ओंवाळूं आरत्या कुरवंड्या येती ॥ चंद्र्भागेमाजी सोडूनियां देती ॥
दिंड्या पताका वैष्णव नाचती ॥ पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥ जय. ॥ ५ ॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये स्नानें जे करिती ॥
दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ती ॥केशवासी नामदेव भावें ओंवाळीती ।। जय . ॥ ६ ॥