येथें कोणाचें काय बा गेलें । ज्याचें त्यानेंच अनहित केलें ॥ध्रु०॥
संतीं सांगितलें ऐकेना । स्वतां बुद्धिही असेना ।
वृत्ति निवरली पिकेना । मूढ कोणाचें ऐकेना ॥१॥
अन्य यातिचे संगति लागे । साधुजनांमध्यें न वागे ।
केल्यावीण पराक्रम सांगे । जेथें सांगे तेथेंचि भीक मागे ॥२॥
नीत टाकुनी अनीत चाले । भडभड भलतेंच बोले ।
मत्त होउनी उन्मत्त डोले । अखेर फार वाइट झालें ॥३॥
तुका म्हणे कांहीं नेम । चित्तीं न धरी अधम ।
सांग पडलासे भ्रम । अंतीं कुटील त्यासी यम ॥४॥