आणिक नाहीं तुज मागणें । राज्य चाड संपत्ति धन ।
जिव्हे घेतां सुख जेणें । तें हें नाम तुझें ॥१॥
तुझें रुप सर्वां ठायीं । देखें ऐसें प्रेम देईं ।
नीववा जी पायीं । अनुभव चित्ताचा ॥२॥
जन्ममरणाचा बाध । उन्मळुनी तुटो कंद ।
लागो हाचि छंद । हरि गोविंद वाचेसी ॥३॥
काया पालटे दर्शनें । अवघें कोंदाटलें चैतन्य ।
जीवशिवखंडण । होय तें चिंतितां ॥४॥
तुका म्हणे याचि भावें । आम्ही घालूं तुझ्या नांवें ।
सुखें जन्म व्हावें । भलतेंचिया भलतेंसी ॥५॥