जय योगीश्वर दत्तदयाळ । तूंचि एक जगतीं प्रतिपाळ ॥१॥
अत्र्यनसूये करुनि निमित्त । प्रगटसि जगतास्तव निश्चित ॥२॥
ब्रह्मदेव-हरिहर अवतार । शरणागत दीनां आधार ॥३॥
अंतर्यांमी सत् चित् सुख । प्रगटसि सद्गुरु द्विभुज सुमुख ॥४॥
झोळि अन्नपूर्णा हातीं । कमंडलू दुसर्या हातीं ॥५॥
कुठें षड् भुजा कोठें चार । अनंत बाहू तूं निर्धार ॥६॥
शरणागत मी बाळ अजाण । दिगंबरा उठ ! जातो प्राण ॥७॥
ऐकुनि अर्जुन-धांव्याला । पावसि देवा तुष्टीला ॥८॥
दिलीस ऋद्धी सिद्धि अपार । अंतीं मुक्ति महापद सार ॥९॥
करिसी तूं कां आजि विलंब । तुजविण मजसि नसे आलंब ॥१०॥
विष्णुशर्म त्वां उद्धरिला । श्राद्धीं जेवुनि वर दिधला ॥११॥
जंभासुर छळि देवांना । आश्वासुनि रक्षिसि त्यांना ॥१२॥
विस्तारोनि माया त्याला । इंद्र करानें वधवीला ॥१३॥
ऐशी लीला तव अगणीत । करील त्याचें कोण गणीत ? ॥१४॥
आला आयु सुतेच्छेनें । तृप्तचि केला वरदानें ॥१५॥
बोधियले यदु परशूराम । साध्य देव प्रह्लाद अकाम ॥१६॥
ऐसी ही तव कृपा अगाध । कां न घेंसि तूं माझी दाद ? ॥१७॥
धाव अनंता पाहि न अंत । न करी अवचित शिशुचा अंत ॥१८॥
पाहुनि ब्राह्मणस्त्रीचा स्नेह । पुत्र होसि तूं निःसंदेह ॥१९॥
स्मर्तृगामी कलिकाल कृपाळ । रजकाचा केला उद्धार ॥२०॥
पोटशुळी द्विज तारियला । ब्राह्मणशेठ हि वांचविला ॥२१॥
करिसि न कां तूं मजसि सहाय । धरितो देवा तूझे पाय ॥२२॥
शुष्क काष्ठ त्वां पल्लविला । उदास भगवन् कां झालां ? ॥२३॥
जर्जर वंध्येचीं स्वप्नें । केलि सफळ त्वां साकल्यें ॥२४॥
निरसुनि विप्राचा कोड । केला रोगाचा मोड ॥२५॥
वांझ महिषिला दोहविलें । दैन्य तयाचें खलु हरिलें ॥२६॥
घेवडिच्या शेंगा खासी । सुवर्ण धट विप्रा देसी ॥२७॥
ब्राह्मणस्त्रीच्या मृत भर्त्या । सजीव देवा केलें त्वां ॥२८॥
पिशाचबाधा करुनी दूर । विप्रपुत्र उठवियला शूर ॥२९॥
अंत्यज हस्तें विप्रमदास । हरुनि रक्षिलें त्रिविक्रमास ॥३०॥
निमिशार्धीं तंतुक भक्तास । पोंचविलें हो श्रीशौलास ! ॥३१॥
एकचि वेळीं अष्टस्वरुप । होउनि देवा अससि अरुप ॥३२॥
तोषविलें त्वाम भक्तजनां । चमत्कार दावुनि नाना ॥३३॥
यवनराजस्फोटक वारी । वर्ण जाति तुज सम सारी ॥३४॥
रामकृष्ण या अवतारीं । केल्या लीला बहुत परी ॥३५॥
तारुनि प्रस्तर गणिका व्याध । समान गणिलें पशुपक्ष्यांस ॥३६॥
अधमोद्धारक तूझें नाम । गातां पुरति न कां रे काम ? ॥३७॥
आधि, व्याधि, उपाधी सर्व । टळति स्मरण मात्रें सर्व ॥३८॥
मूठ चेटुक न चाले जाण । पावे नर स्मरणें निर्वाण ॥३९॥
डाकिण, शाकिण, महिषासूर । भुतें, पिशाचें, झिंद, असुर ॥४०॥
पळताति मुठी आंवळुनी । ’दत्तधून’ पडतां कानीं ॥४१॥
करुनि धूप गातिल नेमें । ’दत्तबावनी’ जे प्रेमें ॥४२॥
साधे त्यांना इह पर लोक । कधीं न त्यांना बाधे शोक ॥४३॥
दासी सिद्धी त्यांची होय । कधींच त्यांना दुःख न होय ॥४४॥
बावन गुरुवारीं नियमित । बावन पाठ करी परिमित ॥४५॥
यथावकाशें करुनि नियम । तया कदापि न दंडी यम ॥४६॥
अनेक रुपीं दत्त अभंग । गातां नडे न माया रंग ॥४७॥
सहस्त्र नामें नामीं एक । दत्तदिगंबर असंग एक ॥४८॥
वंदन तुजला वारंवार । वेद श्वास हे तव निर्धार ॥४९॥
जिथें वर्णिता थकला शेष । कोण रंक मी बहुकृत वेष ? ॥५०॥
अनुभवतृप्तीचे उद्गार । यांसी हसतां बसेल मार ॥५१॥
’तपसि’, ’तत्त्वमसि’ हा देव । बोला जय जय श्री गुरुदेव ॥५२॥
रंगावधूत विरचित ही । गुजराथी दत्तबावनी ।
पांडुरंगसुत दत्तानें । अर्पियली सद्गुरुचरणीं ॥