१
श्रीगुरुसारिखा असतां पाठिराखा । इतराचा लेखा कोण करी ॥१॥
राजयाची कांता काय भीक मागे । मनाचियाजोगें सिद्धी पावे ॥ध्रु०॥
कल्पतरुतळवटीं जो कोणी बैसला । काय वाणी त्याला सांगिजोजी ॥२॥
ज्ञानदेव म्हणे तरलों तरलों । साच उद्धरलों गुरुकृपें ॥३॥
२
सद्गुरुनायकें पूर्ण कृपा केलीं । निजवस्तु दाविली माझी मज ॥१॥
माझे सुख मज दावियेलें डोळां । दिधली प्रेमकळा ज्ञानमुद्रा ॥ध्रु०॥
तया उतराई व्हावें कवण्या गुणें । जन्मा नाहीं येणें ऐसें केलें ॥२॥
डोळियांचा डोळा उघडिला जेणें । लेवविलें लेणें आनंदाचें ॥३॥
नामा म्हणे निकी सांपडली सोय । न विसंबें पाय खेचराचे ॥४॥
३
सद्गुगुरुचे पाय जीवें न विसंबावे । मन वळवावें वृत्तिसहित ॥१॥
डोळिंयांचे डोळे उघडिले जेणें । आनंदाचें लेणें लेवविलें ॥ध्रृ०॥
जन्म मरणांचें फेडिलें सांकडें । कैवल्यचि फुडें दाखविलें ॥२॥
मोहरले तरु पुष्प फळभारें । तेचि निर्विकार सनकादिक ॥३॥
नामा म्हणे स्वामी खेचर माउली । कृपेची साउली केली मज ॥४॥
४
ॐकास्वरूपा सद्गुरु समर्था । अनाथाच्या नाथा तुज नमो ॥१॥
गुरुराव स्वामी आतां स्वप्रकाश । ज्यापुढें उदास चंद्र रवि ॥२॥
वेदां पडलें मौन शास्त्रें वेडावलीं । वाचा हे निमाली ते श्रीगुरु ॥३॥
श्रीगुरू जयासी पाहे कृपादृष्टी । तयासी हे सृष्टी पांडुरंग ॥४॥
प्रभुराज माझा स्वामी गुरुराव । देतो मज भाव शुद्ध भूमि ॥५॥
भूमि शुद्ध करी ज्ञानबीज पेरी । अद्वैत हें धरीं मी तूं नेणें ॥६॥
मजलागीं माझी सद्गुरू माउली । कृपा करी साउली वर्णू काय ॥७॥
एका जनार्दनीं गुरु परब्रह्म । तयाचें पैं नाम सदा मुखीं ॥८॥