त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा । त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ॥
नेति नेति शब्दें न ये अनुमाना । सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना ॥१॥
जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता । आरति ओंवाळीतां हरली भवचिंता ॥ध्रु०॥
सबाह्य-अभ्यंतरीं तूं एक दत्त । अभाग्यासी कैंची कळेल ही मात ॥
पराही परतली तेथें कैंचा हेत । जन्ममरणाचा पुरलासे अंत ॥ जय० ॥२॥
दत्त येऊनीयां उभा ठाकला । सद्भावें साष्टांगें प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥ जय० ॥३॥
दत्त दत्त ऐसें लागलें ध्यान । हारपलें मन झालें उन्मन ॥
मीतूंपणाची झाली बोळवण । एकाजनार्दनीं श्रीदत्तध्यान ॥
जय देव जय० ॥४॥
*
श्री दत्ताची आरती ( चाल- आरती भुवनसुंदराची०)
आरती दत्तात्रयप्रभुची । करावी सद्भावे साची ॥ आरती० ॥ध्रु०॥
श्रीपदकमळा लाजविती । वर्तुल गुल्फ रम्य दिसती ॥
कटिस्थित कौपिन ती वरती । छाटी अरुणोदय वरि ती ॥ चाल ॥
वर्णूं काय तिची लीला ॥ हीच प्रसवली । मिष्ट अन्न बहु । तुष्टचि झाले ।
ब्रह्म क्षत्र आणि । वैश्य शूद्रही । सेवुनिया जीची ॥ अभिरुची से० ॥ आरती० ॥१॥
गुरुवर सुंदर जगजेठी । याचे ब्रह्मांडें पोटीं ॥ माळा अवलंबित कंठीं । बिंबफळ रम्यावर्ण ओष्ठीं ॥ चाल ॥ अहा ती कुंदरदनशोभा ॥ दंड कमंडलु । शंख चक्र करि । गदा पद्म धरिं । जटा मुकुट परि । शोभतसे ज्याची ॥ आरती० ॥२॥
रुचिरा सौम्य युग्मदृष्टी । जिनें द्विज तारियला कुष्ठी ॥ दरिद्रें ब्राह्मण बहु कष्टी । केला तिनेंच संतुष्टी ॥ चाल ॥ दयाळा किती म्हणुनि वर्णूं ॥ वंध्या वृद्धा । तिची सुश्रद्धा । पाहुनि विबुधचि । पुत्ररत्न जिस । देउनियां सतिची ॥ इच्छा पुरवियली मनिंची ॥ आरती० ॥३॥
देवा अघटित तव लीला । रजकहि चक्रवर्ति केला ॥ दावुनि विश्वरूप मुनिला । द्विजोदरशूल पळें हरिला ॥ चाल ॥ दुभविली वाझं महिषि एक ॥ निमिषामाजीं ॥ श्रीशैल्याला । तंतुक नेला । पतिताकरवीं । वेद वदविला ॥ महिमा अशी ज्याची ॥ स्मरा हो महिमा अशी ज्याची ॥ आरती० ॥४॥
वळखुनी शूदभाव चित्तीं । दिधलें पीक अमित शेतीं ॥ भूसुर एक शुष्कवृत्ती । क्षणार्धें धनद तया करिती ॥ चाल ॥ ज्याची अतुल असे करणी ॥ नयन झांकुनी । सवें उघडितां । नेला काशिस । भक्त पाहतां । वार्ता अशी ज्याची । आरती० ॥५॥
दयाकुल औदुंबरिं मूर्ती । नमितां होय शांत वृत्ती ॥ न दे ती जनन मरण पुढती ।
सत्य हें धरा मनिं न भ्रांती ॥ चाल ॥ सनातन सर्वसाक्षि ऐसा ॥ दुस्तर हा भव । निस्तरावया । जाउनि सत्वर । आम्ही सविस्तर । पूजा करूं त्याची ॥ चला हो पूजा करूं त्यांची ॥ आरती० ॥६॥
तल्लिन होउनि गुरुचरणीं । जोडुनि भक्तराज पाणी ॥ मागे हेंचि जनकजननी । अंती ठाव देई चरणीं ॥ चाल ॥ नको मज दुजें आणिक कांहीं ॥ भक्तवत्सला । दीनदयाळा । परमकृपाळा । श्रीपदकमळा । दास नित्य याची ॥ उपेक्षा करूं नको याची ॥ आरती दत्तात्रय प्रभुची । करावी सद्भावें० ॥७॥
*
श्रीदत्ताची आरती ( चाल- साधी )
जय देव जय देव जय अवधूता । अगम्य लीला स्वामी त्रिभुवनीं तुझी सत्ता ॥ध्रु०॥
तूझें दर्शन होतां जाती हीं पापें । स्पर्शनमात्रें विलया जाती भवदुरितें ॥ चरणीं मस्तक ठेवुनि मनिं समजा पुरतें । वैकुंठींचें सुख नाहीं यापरतें ॥ जय० ॥१॥
सुगंधकेशर भाळीं वर टोपी टीळा । कणीं कुंडलें शोभति वक्षःस्थळिं माळा ॥ शरणागत तुज होतां भय पडलें काळा । तूझे दास करिती सेवा सोहळा ॥ जय० ॥२॥
मानवरूपी काया दिससी आम्हांस । अक्कलकोटीं केला यतिवेषें वास ॥ पूर्णब्रह्म तोचि अवतरला खास । अज्ञानी जीवास विपरित हा भास ॥ जय० ॥३॥
निर्गुण निर्विकार विश्वव्यापक । स्थिरचर व्यापुनि अवघा उरलासी एक ॥ अनंत रूपें धरिसी करणें मायीक ॥ तूझे गुण वर्णितां थकले विधिलेख ॥ जय० ॥४॥
घडतां अनंत जन्मसुकृत हें गांठीं । त्याची ही फलप्राप्ती सद्गुरुची भेटी ॥ सुवर्णताटीं भरली अमृत रसवाटी । शरणागत दासावरि करिं कृपादृष्टी ॥ जय देव जय देव० ॥५॥
*
श्रीदत्ताची आरती
विधि हरिहर सुंदर दिगंबर जाले । अनुसूयेचें सत्त्व पहावया आले ॥
तेथें तीन बाल करूनि ठेविले । दत्त दत्त ऐसें नाम पावले ॥१॥
जयदेव जयदेव जय दत्तात्रेया । आरती ओंवाळूं तुज देवत्रया ॥ध्रु०॥
तिहीं देवांच्या युवती पति मागों आल्या ।
त्यांना म्हणे वळखुनि न्या आपुल्याला ।
कोमल शब्देंकरुनी करुणा भाकिल्या ।
त्यांसी समजाविल्या स्वस्थानीं गेल्या ॥२॥
काशी स्नान करविर क्षेत्रीं भोजन ।
मातापुरिं शयन होतें प्रतिदिन ।
तैसें हें अघटित सिद्ध महिमान ।
दास म्हणे हें तों नव्हे सामान्य ॥३॥