गुरू ! गुणालया ! परापराघिनाथ सुंदरा । शिवादिकाहुनी वरिष्ठतूंचि एक साजिरा ।
गुणावतार तूं धरानियां जगासि तारिसी । सुरां मुनीश्वरां अलभ्य या गतीस दाविसी ॥१॥
जया गुरुत्व बोधिलें तयासि कार्य साधिलें । भवार्णवासि लंघिलें सुविघ्नदुर्ग भंगिलें ।
सहा रिपूंसि जिंकिलें निजात्मतत्त्व चिंतिलें । परात्परांसि पाहिले प्रकृष्टदुःख साहिलें ॥२॥
गुरु उदार प्रशांतिसौख्यसाउली । जया नरासि फावली तयास सिद्धि गावली ।
'गुरू गुरू गुरू गुरू' म्हणोनि जो स्मरे नरू । तरोनि मोहसागरू सुखी घडे निरंतरू ॥३॥
गुरू चिदब्धिचंद्र हा महात्पदीं महेंद्र हा । गुरु प्रतापरूद्र हा गुरू कृपासमुद्र हा ।
गुरुस्वरूप दे स्वतां गुरूचि ब्रह्म सर्वथा । गुरूविना महाव्यथा नसे जनीं निवारिता ॥४॥
शिवाहुनी गुरू असे अधीक हें मला दिसे । नरांसि मोक्ष द्यावया गुरुस्वरूप घेतसे ।
शिवें स्वरूप आपुलें न मोक्षदक्ष देखिलें । गुरुत्व पूर्ण घेतलें, म्हणोनि कृत्य साधिलें ॥५॥
गुरूचि बाप माउली गुरूचि दीनसाउली । गुरूचि शिष्यवासुरांसि कामधेनु गाउली ।
गुरूचि चिंतितार्थ दे गुरूचि तत्त्व तो वदे । अलभ्य मोक्षलाभ आपुल्या कृपें गुरुचि दे ॥६॥
गुरूचि भेद नाशितो जडांधकार शोषितो । गुरूचि मोह वारितो अविद्यभाव सारितो ।
गुरूचि ब्रह्म दावितो गुरूचि ध्यान लावितो । गुरूचि विश्व सर्व आत्मरूप हें बुझावितो ॥७॥
गुरूचि मूळदीप रे जगत् गुरुस्वरूप रे । समस्त देवही तदंश दीसताति साजिरे !
गुरूचि पूर्णसिंधू रे तयांत देव बिंदु रे । गुरू स्वयंभु सूर्य अन्य सर्वही मयूख रे ॥८॥
गुरूचि दिव्य दृष्टि रे गुरूचि सर्व सृष्टि रे । गुरूचि ज्ञानबोध रे गुरूचि सर्व शोध रे ।
गुणांत तोचि विस्तरे मनांत तोचि संचरे । समस्त भूतमात्र चेष्टवोनि एकला उरे ॥९॥
गुरू विराटरूप गुरू हिरण्यगर्भ रे । गुरूचि ॐ त्रिवर्ण पंचवर्ण मुख्य तार रे ।
गुरुचि विश्व तैजसू गुरूचि प्राज्ञ पूरुषू । गुरूविना दुजा नसे श्रुतीस घोष सर्वसु ॥१०॥
गुरूचि ध्येय ध्यान रे गुरूचि सर्व मान रे । नसे गुरूसमान रे जनीं गुरूस मान रे ।
गुरूचि थोर सान रे महासुखा निधान रे । गुरू गुरू गुरू गुरू करीं म्हणोनि गान रे ॥११॥
गुरुस्वरूप चिंतिजे समाधि हेचि बोलिजे । समस्त वेदपाठनाममंत्रजाप्य जाणिजे ।
यथार्थ सर्वतीर्थ सद्गुरूपदाब्जतोय हें । गुरूचि सेवणें अनेक अश्वमेघयज्ञ हे ॥१२॥
नमो गुरू कृपाकरा नमो गुरू गुणाकरा । नमो गुरू परात्परा नमो गुरू महत्तरा ॥
नमो गुरू सनातना नमो गुरू मनोन्मना । नमो गुरू घनाघना नमो गुरू निरंजना ॥१३॥