विवेकचूडामणी - श्लोक संग्रह ५५१-५८०

विवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.


मुक्त पुरुषाचा देह प्रारब्ध कर्माने कल्पिलेल्या वासनानी भोगांकडे संसारी पुरुषाप्रमाणे वळत असतो; पण संकल्पविकल्परहित असा मुक्त पुरुष त्या देहामध्ये चाकाच्या मध्यबिंदूप्रमाणे व साक्षीप्रमाणे स्वतः गुपचूप राहतो. ॥५५१॥

साक्षीप्रमाणे राहिलेला आणि स्वरूपानंद संबंधी घन रस प्यायल्यामुळे आनंदीत झालेला ब्रह्मवेत्ता इंद्रियांना विषयांकडे योजित नाही, किंवा विषयांकडून परतवीत नाही व कर्माच्या फलाकडे किंचितही पहात नाही. ॥५५२॥

स्थूल, सूक्ष्म शरीरावरच अभिमान टाकून जो पुरुष केवलरूपाने राहतो, तो पुरुष स्वतःच साक्षात शंकर आहे आणि ब्रह्मवेत्त्यात अग्रगण्य आहे, असे समजावे. ॥५५३॥

उत्कृष्ट ब्रह्मवेत्ता जिवंत असताच सदा मुक्त आहे; आणि कृतार्थ आहे. हा जीवन्मुक्त पुरुष उपाधीचा नाश होतो तेव्हा ब्रह्मरूपानेच अद्वितीय ब्रह्माला प्राप्त होतो. ॥५५४॥

नट (स्त्रीचा) वेष घेतलेला असो की नसो, तो जसा सदैव पुरुष असतो. तद्वत उत्कृष्ट ब्रह्मवेत्ता सदैव ब्रह्मरूपच असतो वेगळा नसतो. ॥५५५॥

ब्रह्मरूप झालेल्या पुरुषाचे शरीर झाडाच्या पानाप्रमाणे गळून कोठेही पडो, त्याची काही त्याला चिंता नसते. कारण, ते त्याचे शरीर पूर्वीच चैतन्यरूप अग्नीने जाळून टाकलेले असते. ॥५५६॥

पूर्ण, अद्वितीय आणि आनंदमयरूपाने सद्रूप ब्रह्माचे ठायी निरंतर राहणार्‍या मुनिला त्वचा, मांस आणि विष्ठा यांचा पिंड (देह) टाकण्याला देश, काल इत्यादिकांच्या योग्यतेची अपेक्षा नसते. ॥५५७॥

देहाचा, दंडाचा किंवा कमंडलूचा त्याग करणे हा मोक्ष नव्हे तर ह्रदयातील अविद्यारूप ग्रंथी सोडणे हाच मोक्ष होय. ॥५५८॥

कालव्यात, नदीत, शंकराच्या देवालयात किंवा चव्हाट्यात जर पान पडेल तर त्या योगाने झाडाला काही शुभ किंवा अशुभ आहे? (काही नाही.) ॥५५९॥

देह इंद्रिये, प्राण आणि बुद्धि यांचा पान, फूल आणि फल यांच्याप्रमाणे नाश होतो. पण पान, फूल फल इत्यादिकांबरोबर जसा वृक्षाचा नाश होत नाही, तद्वत देह, इंद्रिये प्राण आणि बुद्धि या बरोबर सच्चिदानंदरूप स्वकीय आत्म्याचा विनाश होत नाहीच. ॥५६०॥

श्रुति, आत्मा प्रज्ञानघन आहे. अशा प्रकारे आत्म्याच्या सत्यत्वसूचक लक्षणाचा अनुवाद करून उपाधिच्या संबंधाने प्राप्त झालेल्या देहादिकांच्या मात्र नाश सांगत आहेत. ॥५६१॥

'अविनाशी वा अरेऽयमात्मा' ही श्रुति विकारी पदार्थांचा नाश होत असताही आत्म्याच्या अविनाशीपणाचा उपदेश करीत आहे. ॥५६२॥

दगड, झाडे, गवत, धान्य, भुसकट इत्यादिक पदार्थ जळले असता जसे मृत्तिकारूपच होतात. तद्वत देह, इंद्रिये, प्राण, मन इत्यादिक सर्व दृश्य वस्तु ज्ञानाग्नीने जळल्या असता परमात्मरूपाला प्राप्त होतात. ॥५६३॥

अंधःकार प्रकाशाहून अगदी वेगळा असताही जसा सूर्याच्या प्रकाशात लय पावतो. तद्वत सकल दृश्य वस्तु ब्रह्माहुन अगदी वेगळ्या असताही ब्रह्माचे ठायी लय पावतात. ॥५६४॥

घडा फुटला असता त्यातील आकाश जसे व्यक्तपणे आकाशच होते, तद्वत उपाधीचा लय झाला असता ब्रह्मवेत्ता स्वतः ब्रह्मच होतो. ॥५६५॥

जसे दूध दूधात, तेल तेलात, पाणी पाण्यात मिळविले असता एकरूप होते, तद्वत ब्रह्मवेत्ता मुनि ब्रह्माचे ठायी मिळाला म्हणजे एकरूप होतो. ॥५६६॥

अशा प्रकारे जो अखंड सद्रूपपणा याचेच नाव विदेहकैवल्य. तस्मात, संन्याशी अशा ब्रह्मरूपाला प्राप्त होऊन पुन्हा जन्ममरणाच्या फेर्‍यात येत नाही. ॥५६७॥

जीव आणी ब्रह्म यांच्या ऐक्यज्ञानाने या संन्याशाचे अविद्यादिक देह जळून गेल्यामुळे याला ब्रह्मरूपताच प्राप्त झालेली असते. तर मग ब्रह्माला जन्म कोठून संभवणार ? ॥५६८॥

क्रियारहित रज्जूचे ठायी सर्पाचा आभास आणि त्याचा निरास हे जसे पुरुषाने कल्पिलेले आहेत, तद्वत क्रियारहित सद्रूप आत्म्याचे ठायी बंध आणि मोक्ष मायेने कल्पिलेले आहेत (वस्तुतः नाहीत.) ॥५६९॥

आवरण नसल्याने बंध होतो, आणि त्याचा नाश झाल्याने मोक्ष होतो, असे म्हटले पाहिजे. ब्रह्माला कोणत्याही प्रकारचे आवरण नाही. कारण, ब्रह्मावाचून दुसर्‍या वस्तूचा अभाव असल्यामुळे ते आवरणरहित आहे. दुसरे वस्तू आहे असे म्हणावे तर अद्वैताची हानि होते, आणि द्वैताला तर श्रुति मुळीच सहन करीत नाही. ॥५७०॥

मेघाने केलेल्या दृष्टीच्या आवरणाची मूढ लोक ज्याप्रमाणे सूर्याचे ठायी कल्पना करतात. तद्वत बंध आणि मोक्ष या बुद्धीच्या गुणांची मूढ लोक ब्रह्माचे ठायी कल्पना करतात. ब्रह्म तर अद्वैत, असंग चैतन्यरूप आणि अक्षर आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी बंध किंवा मोक्ष मुळीच नाहीत. ॥५७१॥

ब्रह्माचे ठायी बंध आहे, किंवा होता तो नाहीसा झाला, असे जे दोन प्रकारचे प्रत्यय ते बुद्धीचेच गुण आहेत. पण नित्यवस्तुरूप जे ब्रह्म त्याचे नव्हेत. ॥५७२॥

यासाठी बंध आणि मोक्ष हे मायेने कल्पिलेले आहेत. ते आत्म्याचे ठायी नाहीत. अवयवरहित, क्रियारहित, शांत, निर्दोष, निरंजन, अद्वितीय, आकाशाप्रमाणे असंग अशा परमतत्त्वरूप आत्म्याचे ठायी बंधमोक्षाची कल्पना कशी संभवणार. ॥५७३॥

प्रलय नाही, उत्पत्ति नाही, बंध नाही, साधक नाही, मुमुक्षु नाही आणि मोक्षही नाही, हेच वास्तविक आहे. ॥५७४॥

हे शिष्य ! कलियुगासंबंधी दोष ज्याच्या आंगी नाहीत कामनारहित ज्याची बुद्धी आणि मुक्त होण्याची ज्याला इच्छा आहे अशा तुला वारंवार आपल्या मुलाप्रमाणे मानून सकल वेदांतातील मुख्य सार सिद्धांतरूप हे अति गुह्य परमतत्त्व मी तुला आज कथन केले. ॥५७५॥

अशा प्रकारचे गुरूंचे वचन ऐकून सकल बंधनातून मुक्त झालेला शिष्य प्रेमपूर्वक सद्गुरूंना नमस्कार करून त्यांची आज्ञा मिळाल्यावर तेथून चालता झाला. ॥५७६॥

ब्रह्मानंदरूप समुद्रात ज्यांचे अंतःकरण सदैव निमग्न झाले असे सद्गुरू सकल पृथ्वीला पवित्र करीत संचार करू लागले. ॥५७७॥

मुमुक्षु जनांना सुखाने बोध होण्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे गुरू आणि शिष्य यांच्या संवादरूपाने आत्मलक्षणाचे निरूपण केले. ॥५७८॥

शास्त्रोक्त कर्माच्या योगाने ज्यांनी आपल्या चित्तातील सकल दोष नाहीसे केले आहेत, संसारसुखाचा ज्यांना वीट आला, ज्यांचे चित्त अतिशय शांत झाले, श्रुतीवर ज्यांची प्रीति फार, अशा प्रकारचे मुमुक्षुजन या हितकारक उपदेशाचा आदर करोत. ॥५७९॥

संसाररूप मार्गामध्ये तापत्रयरूप सूर्य किरणांपसून उत्पन्न झालेल्या दाहव्यथेने खेद पावलेले आणि थकवा आल्यामुळे निर्मल प्रदेशात उदकाच्या इच्छेने परिभ्रमण करणारे अशा संसारी लोकांना अतिशय समीप असलेल्या अद्वैतब्रह्मरूप सुखकर अमृतसमुद्राला दाखविणारी आणि परम सुख (मोक्ष) देणारी शंकराचार्यांची वाणी जयजयकार पावत आहे. ॥५८०॥

 

इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यगोविन्दभगवत्पूज्यपादशिष्यश्रीमच्छंकरभगवंत कृत विवेकचूडामणि समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : January 14, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP