एखाद्या लक्षाला उद्देशून सोडलेला बाण ज्याप्रमाणे आपले फल (लक्ष्यला वेधणे) दिल्यावाचून पडत नाही, तद्वत ज्ञानाचा उदय होण्याच्या पूर्वीचे प्रारब्ध कर्म आपले फल दिल्यावाचून केवळ ज्ञानाने नष्ट होत नाही. ॥४५१॥
गाईला वाघ समजून सोडलेला बाण,मागाहून ही गाय आहे असे (सोडणाराला) समजले तरी थांबत नाही. तर वेगाने लक्ष्याला कापूनच टाकतो. ॥४५२॥
तद्वत ज्ञान्यांचे देखील प्रारब्ध बलवत्तर असते. त्याचा भोगण्यानेच क्षय होतो आणि पूर्वसंचित कर्माचा व भावी कर्मांचा अपरोक्ष ज्ञानरूप अग्नीनेच नाश होतो. जे पुरुष ब्रह्म आणि जीव यांचे ऐक्य जाणून सर्वदा ब्रह्ममयच होऊन राहिले असतील, त्यांना प्रारब्ध, संचित व भावी ही तिन्ही कर्मे कधीही नाहीत. कारण, ते निर्गुणब्रह्मच होत. ॥४५३॥
उपाधीच्या अध्यासाने रहित अशा केवळ ब्रह्मरूपानेच स्वस्वरुपी राहणार्या मुनीला प्रारब्ध असते हे म्हणणे युक्त नाही. कारण जागृत पुरुषाला स्वप्नातील गोष्टींचा संबंध जसा संभवत नाही, तद्वत हे संभवत नाही. ॥४५४॥
जागा झालेला मनुष्य स्वप्नांतील देहावर किंवा देहाच्या उपयोगी पडलेल्या वस्तूवर अहंता, ममता किंवा इदंता ठेवीत नाही तर स्वतः जागृतपणानेच व्यवहार करतो. ॥४५५॥
जागृत झालेल्या मनुष्याला स्वप्नातील मिथ्यापदार्थ सिद्ध करण्याची इच्छा दिसत नाही, व स्वप्नातील जगाचा त्याने संग्रह केलेलाही दिसत नाही. जर जागृतीमध्येही स्वप्नसंबंधी मिथ्या पदार्थांची अनुवृत्ति असेल तर त्या मनुष्याला झोपेने सोडले नाही असे खचित समजावे. ॥४५६॥
वर सांगितलेल्या जागृत मनुष्याप्रमाणे परब्रह्माचे ठायी राहिलेला पुरुष सद्रूपानेच राहतो पण ब्रह्मावाचून दुसरे काहीही पाहत नाही. जसे जागृत मनुष्याला स्वप्नात पाहिलेल्या पदार्थांचे स्मरण रहाते, तद्वत सद्रूपाने राहणार्यालाही भोजन आणि मलोत्सर्ग इत्यादिक कार्याविषयीचे स्मरण राहते. ॥४५७॥
देह कर्माने निर्माण केला आहे म्हणून प्रारब्ध देहाचे आहे अशी खुशाल कल्पना करावी; पण अनादि असल्यामुळे जो कर्माने निर्माण केलेला नव्हे, अशा आत्म्याला प्रारब्ध असल्याची कल्पना करणे युक्त नाही. ॥४५८॥
वायफळ न बोलणारी श्रुति 'आत्मा जन्मरहित, नित्य आणि शाश्वत आहे' असे म्हणत आहे. त्या आत्मरूपाने राहणार्या जीवन्मुक्ताला प्रारब्ध अशी कल्पना तरी कशी संभवेल ? ॥४५९॥
देहरूपाने स्थित असेल तर प्रारब्ध सिद्ध होईल. पण मुनीची देहरुपाने स्थिति असेल असे मुळीच संमत नाही. यासाठी प्रारब्धाला सोडून द्यावे. ॥४६०॥
शरीराला प्रारब्ध आहे अशी कल्पना करणे ही देखील भ्रांतिच आहे. कारण, अध्यस्त (कल्पित) पदार्थांच्या आंगी खरेपणा कोठून असणार ? जो पदार्थ खरा नाही तो जन्मास कोठून येणार जो जन्मास आला नाही त्याला मरण कोठून येणार? आणि ज्याला जन्ममरण नाही अशा केवळ कल्पित पदार्थाला प्रारब्ध आहे असे कसे संभवणार ! तस्मात ज्ञानाने अज्ञानाच्या समूळ कार्याचा लय झाला असता हा देह कसा राहतो अशी शंका घेणार्या मूढ लोकांचे समाधान करण्यासाठी प्रारब्ध असते असे श्रुति बाह्य दृष्टीने सांगत आहे. पण विद्वानांना 'देहादिक सत्य आहेत' असा बोध करण्यासाठी सांगत नाही. ॥४६१॥ ॥४६२॥ ॥४६३॥
परिपूर्ण, अनादि, अनंत प्रमाणाने जाणण्याला कठीण आणि विकाररहित अशा प्रकारचे ब्रह्म एकच आणि अद्वितीय आहे. येथे (ब्रह्माचे ठायी) वेगळे वेगळे काहीच नाही. ॥४६४॥
सच्चिदानंदरूप, नित्य आणि क्रियारहित, अशा प्रकारचे ब्रह्म एकच आणि अद्वितीय आहे. येथे वेगळे वेगळे काहीच नाही. ॥४६५॥
प्रत्यग्रूप, एकरस, अनंत आणि व्यापक अशा प्रकारचे ब्रह्म एकच अद्वितीय आहे. येथ वेगळे वेगळे काहीच नाही. ॥४६६॥
जे त्याज्य नाही, ग्राह्य नाही, इंद्रियास विषय होत नाही, आणि ज्याला आश्रयाची अपेक्षा नाही, अशा प्रकारचे ब्रह्म एकच आणि अद्वितीय आहे. येथे वेगळे वेगळे काहीच नाही. ॥४६७॥
निर्गुण, अवयवरहित, सूक्ष्म, निर्विकल्प आणि निरंजन अशा प्रकारचे ब्रह्म एकच आणि अद्वितीय आहे. येथे वेगळे वेगळे काहीच नाही. ॥४६८॥
मन अथवा वाणी यांना अगोचर असल्यामुळे ज्याच्या स्वरूपाचे निरूपण होऊ शकत नाही, अशा प्रकारचे ब्रह्म एकच आणि अद्वितीय आहे. येथे वेगळे वेगळे काहीच नाही. ॥४६९॥
सत्य, परिपूर्ण, स्वतःसिद्ध, शुद्ध, ज्ञानरूप आणि ज्याची कोणाशी तुलना करता येत नाही, अशा प्रकारचे ब्रह्म एकच आणि अद्वितीय आहे येथे वेगळे वेगळे काहीच नाही. ॥४७०॥
राग आणि भोग यांचा त्याग करणारे, शांत आणि जितेंद्रिय अशा प्रकारचे मोठमोठे संन्यासी परम तत्वाला जाणून अज्ञानाचा नाश झाला असता स्वस्वरूपाचा चिंतनाने परम सुखाप्रत प्राप्त झाले. ॥४७१॥
तूही या परमतत्त्वरूप आणि आनंदघन स्वस्वरूपाचे चिंतन करून आणि आपल्या मनाने कल्पिलेल्या मोहाला दूर करून मुक्त, कृतार्थ आणि प्रबुद्ध हो. ॥४७२॥
समाधीपासून उत्कृष्ट स्थिर झालेल्या बुद्धीने स्पष्ट बोधरूप नेत्राच्या योगाने तू आत्मतत्वाचे अवलोकन कर. ऐकलेला पदार्थ जर चांगला निःसंशयपणे अवलोकनात आला तर त्या विषयी पुन्हा विकल्प उत्पन्न होत नाही. ॥४७३॥
आपली अविद्यारूप बंधनाच्या संबंधातून सुटका झाली असता सत्य, ज्ञानरूप आणि आनंदरूप अशा आत्म्याची प्राप्ति होते. याविषयी शास्त्र, युक्ति, गुरूची युक्ति आणि आत सिद्ध असलेला स्वताचा अनुभव ही प्रमाणे आहेत. ॥४७४॥
बंध, मोक्ष, तृप्ति, चिंता, आरोग्य, क्षुधा इत्यादिक वस्तु स्वतःच आपल्या आपण जाणल्या पाहिजेत. दुसर्यांना जे त्यांचे ज्ञान होते ते केवळ अनुमानानेच कळावयाचे. ॥४७५॥
श्रुतीप्रमाणे गुरुही तिर्हाइत राहून बोध करीत असतात, तस्मात्, ईश्वराचा अनुग्रह जिच्यावर आहे अशा बुद्धीच्या योगानेच विद्वानाला तरले पाहिजे. ॥४७६॥
स्वताच्या अनुभवाने स्वताच आपल्या अखंडित स्वरूपाला जाणून चांगला सिद्ध झालेला पुरुष निर्विकल्प रूपाने आपल्या ठिकाणीच राहो. ॥४७७॥
जीव आणि सकल जगत ब्रह्मरूपच आहे आणि अखंड रूपाने राहणे हाच मोक्ष होय. हेच काय ते वेदान्ताच्या सिद्धांताचे व्याख्यान आहे. ब्रह्म अद्वितीय आहे अशाविषयी श्रुति प्रमाण आहे. ॥४७८॥
अशा प्रकारचे गुरूचे वचन श्रुतिरूप प्रमाण आणि स्वतची युक्ति यांच्या योगाने परमतत्त्वाला जाणून ज्याची इंद्रिये शांत झाली, आणि मन एकाग्र झाले, असा शिष्य एका ठिकाणी निश्चल राहून समाधिनिष्ठ झाला. ॥४७९॥
काही काळ लोटेपर्यंत परब्रह्माचे ठायी एकाग्र चित्त ठेवून नंतर त्या परमानंदरूप समाधीतून उठून तो शिष्य पुढील वचन म्हणाला. ॥४८०॥
जीव आणि ग्रह यांच्या ऐक्याचा अनुभव आल्यामुळे बुद्धि लयास गेली, प्रवृत्ति नाहीशी झाली, मी दृश्य पदार्थ जाणतनाही, अदृश्य पदार्थही जाणत नाही, व ज्याचा अंत नाही अशा प्रकारचे ते सुख कसले व किती हेही जाणत नाही. ॥४८१॥
स्वरूपानंदरूप अमृताच्या पूराने भरलेल्या परब्रह्मरूप समुद्राचा महिमा वाणीने बोलण्यास किंवा मनाने मनन करण्यास शक्य नाही. माझे मन समुद्रात पडलेल्या पावसातील गारांप्रमाणे ह्या महिम्याच्या अतिसूक्ष्म अशामध्ये लीन होऊन आनंदरूपाने सुखात राहिले आहे. ॥४८२॥
हे जगत कोठे गेले, कोणी नेले, अथवा कोठे लीन झाले ? मी आताच या जगाला पाहिले होते, हे मोठे नवल नाही काय? ॥४८३॥
अखंड आनंदरूप अमृताने भरलेल्या ब्रह्मरूप महासागरात काय घ्यावे? काय टाकावे ? कोणते वस्तु भिन्न आणि कोणते विलक्षण? (तेथे असा काहीच प्रकार नाही) ॥४८४॥
या स्थितीत मी काही पाहत नाही, ऐकत नाही, व जाणतही नाही, तर सदानंदरूप स्वताचे स्वरूप असल्यामुळे मी सर्वांहून वेगळा आहे. ॥४८५॥
मोठ्या मनाचे, संगरहित, सत्पुरुषात अग्रगण्य,नित्य आणि अद्वितिय अशा प्रकारचा आनंदरस हेच ज्याचे स्वरूप, व्यापक आणि अपार दयेचे समुद्रच, अशा प्रकारचे जे आपण सद्गुरु, त्यांना निरंतर नमस्कार असो. ॥४८६॥
ज्या सद्गुरूच्या कटाक्षरूपी चंद्राचे दाट किरण पडल्यामुळे मी संसारतापापासून झालेल्या दगदगीतून मुक्त झालो, आणि अखंड ज्याचे वैभव अशा आनंदरूप अक्षय आत्मपदाला क्षणमात्रात प्राप्त झालो. त्या आपणाला नमस्कार असो. ॥४८७॥
मी आपल्या अनुग्रहाने धन्य झालो, कृतकृत्य झालो, संसाराच्या तडाक्यातून सुटलो, नित्य आनंदरूप झालो आणि परिपूर्ण झालो. ॥४८८॥
मी असंग आहे, अवयवरहित आहे, लिंगशरीररहित आहे, अविनाशी आहे, शांत आहे, अनंत आहे, निर्मल आहे आणि सनातन आहे. ॥४८९॥
मी अकर्ता आहे, अभोक्ता आहे, निर्विकार आहे, क्रियारहित आहे, शुद्धबोध रूप आहे, केवळ आहे आणि निरंतर मंगलरूप आहे. ॥४९०॥
पाहणारा, ऐकणारा, बोलणारा करणारा आणि भोगणारा याहून मी अगदी वेगळा आहे, आणि नित्य, निरंतर, क्रियारहित सीमारहित संगरहित आणि पूर्ण बोधरूप आहे. ॥४९१॥
मी द्रष्टा नाही, आणि दृश्यही नाही, तर या दोघांना प्रकाशित करणारा, पर, शुद्ध अंतर्बाह्यप्रदेशरहित, पूर्ण आणि अद्वितीय ब्रह्मरूप आहे. ॥४९२॥
उपमारहित, अनादि, तत्त्वरूप, 'तू, मी हे आणि ते' या कल्पनेच्या पलीकडचे, नित्य, आनंदैकरस, सत्य अशा प्रकारचे जे अद्वितीय ब्रह्म तेच मी आहे. ॥४९३॥
नरकासुराचे मर्दन करणारा नारायण मी आहे. त्रिपुरासुराचे मर्दन करणारा शंकर मी आहे, आणि अखंड बोधरूप, सर्वांचा साक्षी ज्याला कोणी नियंता नाही आणि अहंता व ममता यांनी रहित असा मी आहे. ॥४९४॥
आत बाहेर सर्वांना आश्रयभूत असा सर्व भूतांमध्ये ज्ञानरूपाने राहिलो आहे. भोक्ता भोग्य आणि प्रथम जे जे काही 'हे आहे' अशा प्रकारे पाहण्यात येत होते, ते सर्व मी स्वतःच आहे. ॥४९५॥
अखंडसुखाचा समुद्र अशा मजवर मायारुप वायूच्या विलासाने अनेक प्रकारच्या जगद्रूप लहरी उठतात, आणि लयास जातात. ॥४९६॥
काल हा अंश व भेद यांनी रहित असूनही लोकांनी कल्प, वर्ष, अयन, ऋतु इत्यादिक त्याचे अंश जसे कल्पिले आहेत, तद्वत अंशरहित आणि भेदरहित अशा मजवर भासणारे स्थूलपणा, कृशता इत्यादिक धर्म लोकांनी भ्रांतीने कल्पिलेले आहेत. ॥४९७॥
अतिशय दोषांनी युक्त अशा मूढ जनांनी कल्पिलेला पदार्थ आपल्या अधिष्ठानाला दूषित करणारा असा कधीही असत नाही, मृगजलाचा मोठाही प्रवाह उखर भूमीच्या भागाला भिजवीत नाही. ॥४९८॥
मी आकाशाप्रमाणे निरंतर स्थिर आहे, सूर्याप्रमाणे प्रकाश्य वस्तूहुन वेगळा आहे, पर्वताप्रमाणे निरंतर स्थिर आहे आणि समुद्राप्रमाणे अपरंपार आहे. ॥४९९॥
आकाशाचा जसा ढगांशी संबंध नाही, तद्वत माझा देहाशी संबंध नाही. म्हणूनच जागृति, स्वप्न, सुषुप्ति या देहधर्मांशी माझा संबंध कोठून असणार ? ॥५००॥