अहं (मी) या पदाच्या प्रतीतीपासून लक्षित होणारा पदार्थ जो परमात्मा तो नित्य आहे, अद्वैत आहे, अखंड आहे, केवळ चैतन्यस्वरूप आहे, बुद्ध्यादिकांचा साक्षी आहे, कार्य आणि कारण याहून वेगळा आहे, प्रत्यक् आहे आणि सदा आनंदरूप आहे. ॥३५१॥
विद्वान पुरुष वर सांगितल्याप्रमाणे सदसद्वस्तूंचा विभाग करून आपल्या ज्ञानदृष्टीने तत्वाचा निश्चय करून अखंड बोधरूप आत्म्याला जाणून आणि मिथ्या पदार्थांपासून मुक्त होऊन आपोआपच शांत होतो. ॥३५२॥
निर्विकल्प समाधिच्या योगाने जेव्हा अद्वैत आत्म्याचे ज्ञान होते, तेव्हा ह्रदयातील अज्ञानरूप ग्रंथीचा अगदी लय होतो. ॥३५३॥
अद्वैत आणि निर्विशेष अश परमात्म्याचे ठायी बुद्धीच्या दोषाने 'तू, मी आणि हे' अशा प्रकारची कल्पना उत्पन्न होते. जेव्हा समधि उदयास येतो, तेव्हा आत्मरूप वस्तूच्या सत्य स्वरूपाचा निश्चय झाल्यामुळे सर्व कल्पना लयास जाते. ॥३५४॥
शांत, जितेंद्रिय, अतिशय उपरत पावलेला, क्षमाशील, नित्य समाधि करणारा, असा संन्याशी आपल्या स्वरूपाच्या सर्वव्यापकपणाचा (ब्रह्मत्वाचा) अनुभव घेतो आणि या अनुभवाच्या योगाने अविद्यारूपी अंधकारापासून झालेल्या कल्पनांना अगदी जाळून टाकून व स्वतः क्रियारहित व कल्पनारहित होऊन ब्रह्मस्वरूपाने सुखानेच राहतो. ॥३५५॥
आपली श्रोत्रादिक इंद्रिये, चित्त आणि अहंकार या बाह्य (मिथ्या) वस्तूंचा चिदात्म्याचे ठायी लय करून जे स्वरूपैकनिष्ठ झाले, तेच संसारपाशाच्या बंधनातून मुक्त झाले असे समजावे. पण अनुभवावाचून कोरड्या गोष्टी सांगणारे जे इतर लोक आहेत ते मुक्त असे समजू नये. ॥३५६॥
उपाधि भिन्न भिन्न असल्यामुळे आत्मा आपोआपच भिन्नभिन्न रूपाचा भासू लागतो आणि उपाधि दूर झाली असता तो आपोआपच एकटा राहतो. तस्मात उपाधीचा लय होण्यासाठी सुज्ञ पुरुषाने निर्विकल्प समाधीचे ठायी तत्परता राखून असावे. ॥३५७॥
भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वतः भ्रमरपणाला पावतो, तद्वत एकनिष्ठपणाने सद्रूप ब्रह्माचे ध्यान करू लागलेला पुरुष ब्रह्मभावास प्राप्त होतो. ॥३५८॥
दुसरी क्रिया करण्याकडे गुंतण्याचे सोडून देऊन केवळ भ्रमराच्या रूपाचे ध्यान करणारा किडा जसा भ्रमरपणाला प्राप्त होतो, तद्वत् एकनिष्ठपणाने परमात्मतत्त्वाचे चिंतन करणारा योगी परमात्मरूपास पावतो. ॥३५९॥
अतिशय सूक्ष्म असलेले परमात्म्याचे तत्त्व स्थूल दृष्टीने जाणता यायचे नाही. यासाठी अतिशय निर्मळ ज्यांची बुद्धि अशा सत्पुरुषांनी समाधि करून अतिशय सूक्ष्म वृत्ती़च्या योगाने ते तत्त्व जाणावे. ॥३६०॥
उत्तम रीतीने ताव देऊन शुद्ध केलेले सोने ज्याप्रमाणे मळ टाकून आपल्या आंगच्या गुणास प्राप्त होते, तद्वत आत्मचिंतनाने शुद्ध झालेले मन सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणात्मक मळाचा त्याग करून तत्त्वास प्राप्त होते. ॥३६१॥
ते मन वर सांगितल्याप्रमाणे निरंतर अभ्यास केल्याने पक्व होऊन जेव्हा ब्रह्माचे ठायी लय पावते, तेव्हा ते अद्वैत आनंदरसाचा अनुभव आणून देणार्या निर्विकल्प समाधीस आपोआपच प्राप्त होते. ॥३६२॥
या समाधीच्या योगाने समस्त वासनारूप ग्रंथींचा नाश होतो, संपूर्ण कर्मांचा नाश होतो आणि यत्नावाचून आत, बाहेर, सर्व ठिकाणी आणि सर्व काली स्वरूपाचे स्फुरण होत असते. ॥३६३॥
श्रवणापेक्षा मनन करण्यात शंभरपट लाभ आहे, मननापेक्षा निदिध्यास करण्यात लक्षपट लाभ आहे आणि निदिध्यासापेक्षा निर्विकल्प समाधि संपादण्यात अनंतपट लाभ आहे. ॥३६४॥
निर्विकल्प समाधीच्या योगाने ब्रह्मतत्त्वाचे अपरोक्ष ज्ञान खचित होते. पण मनाची वृत्ति चंचल असल्यामुळे दुसर्या कोणत्याहि प्रकारे ते होत नाही आणि होईलच तर ते दृश्य पदार्थांच्या ज्ञानाने मिश्र होईल. ॥३६५॥
यासाठी तू शांत मनाचा आणि जितेंद्रिय होऊन प्रत्यगात्म्याचे ठायी निरंतर निर्विकल्प समाधि कर आणि आत्मस्वरूपाचे ऐक्य अवलोकन करून अनादि अविद्येने उत्पन्न केलेल्या अज्ञानाचा नाश कर. ॥३६६॥
वाणीचा निरोध, परिग्रहाचा (परिवाराचा) त्याग, आशारहितपणा, क्रियारहितपणा आणि नित्य एकांत स्थली वास करण्याचा स्वभाव हे सर्व उपाय म्हणजे योगाचे एक प्रथम द्वारच आहे. ॥३६७॥
एकांती वास केल्याने इंद्रियांना उपरति होते, इंद्रियांना उपरति झाल्याने चित्ताचा संरोध (शम) होतो, चित्ताचा निरोध झाल्याने अहंकाराची वासना लयास जाते आणि अहंकाराची वासना लयास गेल्याने योग्याला निरंतर ब्रह्म संबंधी अविचल आनंदरसाचा अनुभव येतो. तस्मात योग्याने प्रयत्नाने चित्ताचा निरोधच निरंतर केला पाहिजे. ॥३६८॥
वाणीचा मनात, मनाचा बुद्धीत, बुद्धीचा बुद्धीच्या साक्षीत आणि साक्षीचा निर्विकल्प व परिपूर्ण अशा आत्मस्वरूपी लय करुन तू परम शांतीचा अनुभव घे. ॥३६९॥
देह, प्राण, इंद्रिये, मन, बुद्धि इत्यादिक उपाधीपैकी ज्या ज्या उपाधीचा या योग्याच्या वृत्तीचा समागम होतो, त्या त्या उपाधीशी योग्याची तन्मयता होते. ॥३७०॥
त्या उपाधींची निवृत्ति झाल्याने योग्याला सर्व उपाधींचा अतिशय उपरम हेच ज्याचे लक्षण असे स्वरूपसुख प्राप्त होते. आणि तो निरंतर आनंदरसाचा अनुभव घेण्यात निमग्न होतो. ॥३७१॥
विरक्त पुरुषाच्यानेच आतल्या आणि बाहेरल्या विषयांचा परित्याग करवेल. विरक्त पुरुष जो हा त्याग करतो, तो मुक्तिच्या इच्छेनेच होय. ॥३७२॥
ब्रह्माचे ठायी ज्याची निष्ठा असा विरक्तपुरुषच बाहेरच्या विषयबंधनाला आणि आतल्या अहंकारादिकांच्या बंधनाला सोडू शकतो. ॥३७३॥
विचक्षणा ! पक्ष्याचे जसे पंख तसे वैराग्य आणि बोध हे पुरुषाचे पंख होत, असे जाण. कारण मुक्ति हीच उंच राजवाड्याच्या गच्चीवर असलेली लता होय; तिच्यावर चढणे या दोन पंखावाचून इतर उपायाने साधायाचे नाही. ॥३७४॥
जो अतिशय वैराग्यसंपन्न असेल त्यालाच समाधि प्राप्त होते, ज्याला समाधि प्राप्त झाली त्यालाच दृढ बोध होतो, ज्याला दृढ बोध प्राप्त झाला त्याचिच भवबंधनातून सुटका होते आणि ज्याची भवबंधनातून सुटका झाली त्यालाच नित्य सुखाचा अनुभव मिळतो. ॥३७५॥
स्वताचे अंतःकरण ज्याने वश केले अशा पुरुषाला वैराग्याहून वेगळे काहीही सुखदायक आढळत नाही, ते वैराग्य जर अत्यंत शुद्ध अशा आत्मज्ञानाने युक्त असेल तर आत्मनंदरूप साम्राज्य देते. मुक्तिरूप स्त्री मिळण्याचे नेहमीचे हेच द्वार आहे. असे ज्यापेक्षा आहे, त्या पेक्षा तू इतःपर परम कल्याणासाठी सर्व अनात्म वस्तूंविषयी निःस्पृह होऊन निरंतर सद्रूप आत्म्याचे ठायी निष्ठा राख. ॥३७६॥
विषासारख्या विषयांची आशा तोड्न टाक. कारण ही आशा म्हणजे एक मृत्यूची करणी आहे, जाति, कुल आणि आश्रम यावरचा अभिमान सोडून देऊन कर्मांना अतिशय दुरूनच सोडून दे. देहादिक अनात्म वस्तूंवरची आत्मबुद्धि सोडून दे आणि आत्म्याचे ठायी निष्ठा राख. कारण, तू द्रष्टा (साक्षी) आहेस, मनरहित आहेस आणि वास्तविक जे द्वैतरहित परब्रह्म तेच तू आहेस. ॥३७७॥
स्थिर ज्याचे शरीर असा तू मनाला ब्रह्मरूप लक्ष्याचे ठायी अतिशय स्थिर ठेव. बाह्य इंद्रियांना आपापल्या गोलकाचे ठायी ठेव. देहाच्या चरितार्थाकडे दुर्लक्ष कर, आणि स्वताचे ब्रह्माशी ऐक्य पाव. नंतर तन्मय होत्साता अखंडवृत्तीने प्रेमपूर्वक आपल्या ठिकाणी निरंतर ब्रह्मानंदरसाचा आस्वाद घे. अतिशय शून्य अशा इतर वस्तूंच्या योगाने तुला काय लाभ होणार आहे? ॥३७८॥
मोहक आणि दुःखास कारण अशा अनात्मवस्तूच्या चिंतनाला सोडून देऊन जे मुक्तीचे कारण अशा आनंदरूप आत्म्याचे तू चिंतन कर. ॥३७९॥
स्वयंप्रकाश आणि सर्वांचा साक्षी असा आत्मा विज्ञान कोशाचे ठायी (बुद्धीचे ठायी) निरंतर प्रकाशित होत आहे. यासाठी असत पदार्थाहून भिन्न अर्थात सद्रूप अशा या आत्म्याला लक्षात आणून अखंड वृत्तीने 'हे माझे स्वरूप आहे' अशी भावना कर. ॥३८०॥
अनात्म वस्तूची ज्यात प्रतीति नाही अशा अविछिन्न वृत्तीने चिंतन करणारा पुरुष या आत्म्याला 'हे माझे स्वरूप आहे' असे स्पष्टपणे जाणतो. ॥३८१॥
पूर्वोक्त स्वरूपी आत्मबुद्धीला दृढ करणारा आणि अहंकारादिकांवरच्या आत्मबुद्धीचा त्याग करणारा अशा मुमुक्षूने उघडपणे प्रतीतीस येणार्या घटादिक पदार्थांवर (आत्मबुद्धि नसून) जसा उदासीनपणा असतो, तद्वत भासमान अहंकारादिकांचे ठायी (आत्मबुद्धि न करता ) उदासीनपणाने रहावे. ॥३८२॥
शुद्ध झालेल्या अंतःकरणाला स्वरूपभूत आणि ज्ञानमात्र अशा साक्षाचे ठायी लीन करून हळू हळू त्याला निश्चल करणारा पुरुष शेवटी परिपूर्ण असा स्वस्वरूपालाच अवलोकन करतो. ॥३८३॥
देह, इंद्रिये, प्राण, मन, अहंकार इत्यादि जे सर्व उपाधि आपल्या अज्ञानाने कल्पिलेले आहेत, त्यापासून मुक्त अशा आत्म्याला महाकाशाप्रमाणे अखंडरूप परिपूर्ण समजावे. ॥३८४॥
घट, कलश, कणिंग, सुई इत्यादिक शेकडो उपाधि सोडले असता आकाश जसे एकच राहते, पण अनेक प्रकारचे राहत नाही. तद्वत् अहंकारादिक उपाधि सोडले असता परम शुद्ध ब्रह्म एकच राहते; ॥३८५॥
ब्रह्मदेवापासून ते स्तंबापर्यंत असलेले सर्व उपाधि निवळ असत्य आहेत. यासाठी आपला आत्मा परिपूर्ण आणि एकरूपाने राहिलेला आहे असे जाणावे. ॥३८६॥
जे वस्तु ज्या वस्तूवर भ्रांतीने कल्पिलेले असते ते (भ्रांतीने कल्पिलेले) वस्तु विचारांती तद्रूपच (ज्या वस्तूवर भ्रांति घडते त्या रूपाचेच) असते. त्याहून (जेथे भ्रांति घडली त्या वस्तूहून) भिन्न नसते. भ्रांती नाहिशी झाली असता (रज्जूवर भ्रांतीने) पाहिलेल्या सर्पाचे सत्यस्वरुप जी रज्जू ती स्पष्ट दिसू लागते. तद्वत ब्रह्माचे ठायी भ्रातिने पाहिलेले जगत भ्रांति नाहीशी झाली असता ब्रह्मरूपच आहे. ॥३८७॥
ब्रह्मा, विष्णु, इंद्र, शिव आणि हे सर्व जगत स्वतः आत्माच आहे. आत्म्याहून वेगळे काही नाही. ॥३८८॥
आत, बाहेर, पूर्वेस, पश्चिमेस, दक्षिणेस, उत्तरेस, वर आणि खाली स्वतः आत्माच आहे. ॥३८९॥
लाटा, फेस, भोवरे, बुडबुडे हे सर्व वास्तविकपणे जसे उदकच आहे, तद्वत देहापासून ते अहंकारापर्यंत हे सर्व एकरस आणि परमशुद्ध असे चैतन्यच आहे. ॥३९०॥
वाणी आणि मन यांना कळणारे हे सर्व जगत् सद्रूपच आहे. प्रकृतीच्या पलीकडे असणार्या सद्रूप ब्रह्माहून हे भिन्न नाहीच. घट, कलश, कुंभ इत्यादिक जे (मातीचे) पदार्थ पाहण्यात येतात, ते काय मृत्तिकेहून भिन्न असतात ? (जो पुरुष जगाला ब्रह्माहून वेगळे म्हणत असेल) तो पुरुष 'तू आणि मी' अशा प्रकारच्या मायारूप मदिरेने धुंद झालेला आहे असे समजावे. ॥३९१॥
खोटा अभ्यास दूर करण्यासाठी 'यत्र नान्यत' ही श्रुति वारंवार ब्रह्माचे ठायी अद्वैतत्व सांगत आहे. ॥३९२॥
आकाशासारखे निर्मल, विकल्परहित, निःसीम, निश्चल, निर्विकार, ज्याच्या आत बाहेर दुसरे वस्तु नाही, आणि अद्वितीय अशा एका स्वरूपभूत परब्रह्माहून वेगळे दुसरे काय जाणायचे आहे? ॥३९३॥
याविषयी अधिक काय सांगावे? जीव स्वतः ब्रह्म आहे, आणि हे सगळे विस्तीर्ण जगतही ब्रह्मच आहे. कारण, 'ब्रह्म अद्वितीय आहे' असे श्रुति म्हणते. 'मीच ब्रह्म आहे' असे निश्चित समजलेले आणि बाह्य पदार्थाचा त्याग करणारे पुरुष स्पष्टपणे ब्रह्मरूप होऊन निरंतर सच्चिदानन्द रूपाने राहतात, हे खचित. ॥३९४॥
या घामट स्थूल देहावर अहंबुद्धीने उत्पन्न केलेल्या आशेला नाहीशी कर, आणि नंतर वायूसारख्या लिंगदेहावर अहंबुद्धीने उत्पन्न केलेल्या आशेलाही बलात्काराने नाहिशी कर. असे केल्यावर, वेदांनी ज्याची कीर्ति गाइली आहे, आणि जे नित्य व आनंदरूप आहे, अशा प्रकारचे परब्रह्म मीच स्वतः आहे असे पक्के समजून तू ब्रह्मरूपाने रहा. ॥३९५॥
मनुष्य जो पर्यंत या शवासारख्या स्थूल शरीरावर अहंबुद्धि ठेवीत आहे तोपर्यंत तो अपवित्र असतो, तोपर्यंत त्याला दुसर्या पासून उपद्रव होतो आणि तोपर्यंत तो जन्म, जरा आणि मरण यांचे वसतिस्थान असतो. तोच मनुष्य जेव्हा शुद्ध, अविचल आणि कल्याणरूप आत्म्याला जाणतो, त्यावेळी तो वर सांगितलेल्या उपद्रवादिकांपासून मुक्त होतो. असे श्रुतिही सांगत आहे. ॥३९६॥
स्वस्वरूपी कल्पीलेल्या संपूर्ण आभासिक वस्तूंचा निरास केला असता पुरुष पूर्ण अद्वय आणि अक्रिय अशा प्रकारचे परब्रह्म स्वतःच होतो. ॥३९७॥
निर्विकल्प आणि परमात्मारूप ब्रह्माचे ठायी चित्तवृत्ति समाधान पावली असता हा कोणताही संसाररूप विकल्प भासत नाही. तर केवळ तोंडच्या गोष्टी मात्र राहतात. ॥३९८॥
हा जगद्रूप विकल्प मिथ्या आहे; कारण निर्विकार, निराकार आणि निर्विषेश अशा एक ब्रह्मरूप वस्तूचे ठायी भेद कोठून येणार ? ॥३९९॥
निर्विकार, निराकार व निर्विषेश, आणि द्रष्टा दर्शन, दृश्य इत्यादिक धर्मानी रहित अशा एक वस्तूचे ठायी भेद कोठून येणार ? ॥४००॥