विवेकचूडामणी - श्लोक संग्रह ४०१-४५०

विवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.


निर्विकार, निराकार,निर्विशेष आणि प्रलयकालच्या समुद्राप्रमाणे अतिशय परिपूर्ण अशा एक वस्तूचे ठायी भेद कोठून येणार ? ॥४०१॥

प्रकाशात जसा अंधकाराचा लय होतो, तद्वत ज्या वस्तुत भ्रांतीच्या कारणाचा लय होतो, अशा अद्वितीय आणि निर्विशेष परमातत्वाचे ठायी भेद कोठून येणार ? ॥४०२॥

एकरूप परमतत्त्वाचे ठायी भेदाची गोष्ट कशी राहणार ? केवळ सुखरूप अशा सुषुप्ति अवस्थेमध्ये भेद कोणी पाहिला आहे? ॥४०३॥

यतार्थ स्वरूपाचा बोध झाल्यावर निर्विकल्प आणि सद्रूप ब्रह्माचे ठायी जगत नाहीच. यथार्थ स्वरूपाचा बोध झाला असता रज्जूवर सर्प किंवा मृगजलावर नदीच्या पाण्याचा थेंब देखील कालत्रयी दिसत नाही. ॥४०४॥

'हे द्वैत म्हणजे केवळ माया आहे. आणि सत्य पाहू जाता अद्वैत आहे' असे श्रुति म्हणते, आणि या गोष्टीचा सुषुप्तीमध्ये प्रत्यक्ष अनुभवही येतो. ॥४०५॥

'कल्पित पदार्थ अधिष्ठानाहून वेगळा नसतो' हा प्रकार पंडितांनी रज्जुसर्पादिक दृष्टांताचे ठायी पहिला आहे. तस्मात भेद जो दिसतो, त्याचे कारण भ्रांतिच होय. ॥४०६॥

या संसाररूप विकल्पाचे मूळ चित्त आहे. चित्त नसेल तर काही विकल्प नाही. यासाठी प्रत्यग्रूप परमात्म्याचे ठायी चित्ताचा लय कर. ॥४०७॥

नित्य ज्ञानरूप, केवळ आनंदरूप, उपमारहित, नित्यमुक्त, क्रियारहित, सीमारहित, आकाशासारखे (व्यापक), अवयवरहित, विकल्परहित अशा कोणत्या तरी पूर्ण ब्रह्माचा विद्वान पुरुष समाधीमध्ये आपल्या ह्रदयाचे ठायी दृढ अनुभव घेत असतो. ॥४०८॥

प्रकृति आणि विकृति यांनी रहित, मनाला चिंतन करता येणार नाही अशा स्वरूपाचे, एकरसरूप, अभिमानाच्या संबंधापासून दूर असलेले वेदवचनावरून सिद्ध, नित्य, 'मी' या शब्दाने प्रसिद्द आणि ज्याची तुलना करण्यासारखे वस्तु नाही, अशा पूर्ण ब्रह्माचा विद्वान समाधीमध्ये आपल्या ह्रदयाचे ठायी अनुभव घेत असतो. ॥४०९॥

जरारहित, मरणरहित, नित्यवस्तुरूप, शांतसमुद्रासारखे (निश्चल),नामरहित, नित्य, शांत आणि जेथे गुणांचे विकार शांत झाले आहेत अशा एका पूर्ण ब्रह्माचा विद्वान समाधीमध्ये आपल्या ह्रदयाचे ठायी अनुभव घेत असतो. ॥४१०॥

तू आपल्या स्वरुपी एकाग्र चित्त करून अखंड ज्याचे वैभव अशा आत्म्याचे अवलोकन कर, संसाराच्या गंधाने दुर्गंधी झालेल्या बंधाला प्रयत्नाने सोडून दे, आणि आपल्या पुरुषजन्माला सफल कर. ॥४११॥

सर्व उपाधींनी वर्जित, सच्चिदानंदरूप, अद्वितीय अशा अंतःकरणात असलेल्या आत्म्याचे चिंतन कर म्हणजे पुन्हा संसाराच्या फेर्‍यात पडणार नाहीस. ॥४१२॥

आभासरूपाने फलाचा उपयोग घेते म्हणून पुरुषाच्या छायेसारखे दिसणारे आणि विवेकाने शवासारखे दूर टाकलेले अशा या शरीराकडे सत्पुरुष पुन्हा लक्ष देत नाही. ॥४१३॥

निरंतर शुद्ध ज्ञानरूप आणि आनंदरुप अशा परमात्म्याला प्राप्त होऊन या जड आणि मलरुप उपाधीला (देहाला) अतिशय दूर सोडून दे. पुढे फिरून या उपाधीचे स्मरण देखील करू नको. कारण ओकून टाकलेला पदार्थ स्मरणात आला तरी तो किळस उत्पन्न होण्यास कारण होतो. ॥४१४॥

सत्तामात्र आणि निर्विकल्प अशा ब्रह्मरूप अग्नीचे ठायी या समूळ उपाधीचे दहन करून नंतर उत्कृष्ट विद्वान पुरुष स्वतः नित्य शुद्धज्ञानरूप आणि आनंदरूप आत्मस्वरूपाने राहतो. ॥४१५॥

प्रारब्धरूप सूत्रात गुंतलेले शरीर जावो, की राहो पण आनंदरूप ब्रह्माचे ठायी ज्याची वृत्ति लीन झाली असा तत्त्वज्ञानी पुन्हा त्या शरीराकडे, गाईच्या रक्ताकडे जसे कोणी पहात नाही, त्याप्रमाणे पहात नाही. ॥४१६॥

अखंड आणि आनंदरूप आत्म्याला स्वताचे स्वरूप जाणल्यानंतर तत्त्वज्ञानी कशाच्या इच्छेने आणि कोणत्या प्रयोजनासाठी देहाचे पोषण करील ? ॥४१७॥

उत्तम रीतीने सिद्ध झालेल्या जीवन्मुक्त योग्याला आपल्या ठिकाणी आत आणि बाहेर निरंतर स्वरूपानंदरसाचा आस्वाद मिळणे हे उत्तम फळ होय. ॥४१८॥

वैराग्याचे फल बोध, बोधाचे फल उपरति आणि स्वरूपानंदाच्या अनुभवाने शांति प्राप्त होणे हे उपरतीचे फल होय. ॥४१९॥

जर शांति प्राप्त न होईल तर उपरति व्यर्थ होय, उपरति प्राप्त न होईल तर बोध व्यर्थ होय. निवृत्ति, परम तृप्ति, ज्याला उपमा देता येणार नाही असा स्वरूपभूत आनंद आणि अनुभवास येणार्‍या सांसरीक दुःखांपासून उद्विग्न वृत्ति न होणे हे ब्रह्मविद्येचे फल होय. भ्रांतीच्या समयी मनुष्याने जे नानाप्रकारचे निंद्य कर्म केले असेल ते कृत्य, भ्रांति दूर झाल्यावर विचाराने तो कसे करील ? नाहीच करणार. ॥४२०॥ ॥४२१॥

जाणता मनुष्य मृगजलासारख्या मिथ्या वस्तूकडे फलोद्देशाने धावत जात नाही. आणि अज्ञ मनुष्य तिकडे फलोद्देशाने धावत जातो. या दृष्टांतावरून हे निश्चित झाले की, मिथ्या वस्तूकडे प्रवृत्ति न होणे हे ब्रह्मविद्येचे फल होय आणि तिकडे प्रवृत्ति होणे हे अज्ञानाचे फल होय. असे नसेल तर, ब्रह्मज्ञान्याला ब्रह्मज्ञानापासून कोणते दृष्ट फल मिळते असे म्हणावे ? ॥४२२॥

ह्रदयातील अज्ञानरूप ग्रंथीचा जर अगदी नाश होईल, तर स्वतः विषयच आपली इच्छा न करणार्‍या पुरुषाची आपल्याकडे प्रवृत्ति करून घेईल काय ? ॥४२३॥

भोग्य विषयावर वासनेचा उदय न होणे हा वैराग्याचा परम अवधि होय. अहंपणाचा उदय न होणे हा बोधाचा परम अवधि होय, आणि लीन झालेली वृत्ति पुन्हा उदयास न येणे हा उपरतीचा परम अवधि होय. ॥४२४॥

निरंतर ब्रह्मरूपाने राहिल्यामुळे ज्याची बाह्य विषयांवरची बुद्धि झोपी गेलेल्या मनुष्याप्रमाणे लयास गेली आहे; दुसर्‍यांनी दिलेल्या भोग्य पदार्थांचा उपभोग जो अज्ञान पोराप्रमाणे घेतो, आणि स्वप्नात पाहिलेल्या लोकांप्रमाणे या जगाला एखाद्या वेळी पाहतो, असा आपल्या अनंत पुण्याचे फल भोगणारा स्थितप्रज्ञ योगी पृथ्वीतलावर धन्य आणि मान्य होय. ॥४२५॥

जो यति, निर्विकार, क्रियारहित आणि ब्रह्माचे ठायीच ज्याचे चित्त लीन असा असून ब्रह्मानंदाचा आस्वाद घेत असतो, तो स्थितप्रज्ञ समजावा. ॥४२६॥

शोधीत ह्मनजे उपाधिरहीत केलेले जे ईश्वर आणि जीव त्यांचे (ब्रह्मरूपाने) ऐक्य समजणारी, विकल्परहीत आणि ब्रम्हाकार जी वृत्ती तिला प्रज्ञा म्हनतात. ही प्रज्ञा ज्याची उत्ताम प्रकारे स्थिर झाली, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. ॥४२७॥

ज्याची प्रज्ञा स्थिर झाली असेल त्याला निरंतर आनंद मिळत असतो, आणि जो प्रपंचाला बहुतेक विसरला त्याला जीवन्मुक्त म्हणतात. ॥४२८॥

बुद्धि लीन झाली असताही जो जागतो, जागृत असताही ज्याच्या अंगी जागृति अवस्थेचे धर्म नसतात, आणि ज्याचा बोध वासनारहित असतो, त्याला जीवन्मुक्त म्हणतात. ॥४२९॥

ज्याचे संसाराकडचे अनुसंधान लयास गेले असेल, जो कलावान असताही कलाहीनासारखा असेल आणि ज्याचे चित्त चिंतारहित असेल, त्याला जीवन्मुक्त म्हणतात. ॥४३०॥

छायेप्रमाणे मागे लागलेल्या या विद्यमान देहावही अहंता व ममता नसणे हे जीवन्मुक्ताचे लक्षण होय. ॥४३१॥

झालेल्या गोष्टीकडे लक्ष्य न देणे, होणार्‍या गोष्टीचा विचार न करणे आणि चालू गोष्टी विषयी उदासीनपना असणे हे जीवन्मुक्ताचे लक्षण होय. ॥४३२॥

गुणदोषांनी भरलेला म्हणून स्वभावतः विलक्षण अशा या प्रपंचात सर्वत्र समान दृष्टि असणे हे जीवन्मुक्ताचे लक्षण होय. ॥४३३॥

आवडत्या किंवा नावडत्या वस्तु प्राप्त झाल्या असता समदृष्टि असल्यामुळे दोन्ही ठिकाणी निर्विकार चित्त ठेवणे हे जीवन्मुक्ताचे लक्षण होय. ॥४३४॥

ब्रह्मानंदरसाचा आस्वाद घेण्याकडे चित्त गुंतल्यामुळे आतल्या किंवा बाहेरल्या गोष्टीकडे अनुसंधान नसणे हे जीवन्मुक्त संन्याश्याचे लक्षण होय. ॥४३५॥

देह, इंद्रिये इत्यादिकांवर अथवा दुसर्‍या कोणत्याही कर्तव्य गोष्टीवर अहंता व ममता न ठेवता जो सर्वदा तिर्‍हाइतपणाने राहत असेल तो जीवन्मुक्त होय. ॥४३६॥

वेदवचनाच्या सामर्थ्याने ज्याला आपला ब्रह्मपणा चांगला कळला, आणि जो भवबंधनातून सुटला, तो जीवन्मुक्त होय. ॥४३७॥

देह आणि इंद्रिये यांच्यावर अहंता आणि याहून इतर ठिकाणी इदंता (हे सत्य आहे अशी बुद्धि) या दोन्ही कधीही ज्याच्या आंगी नसतात, तो जीवन्मुक्त होय. ॥४३८॥

जो पुरुष स्वताच्या बुद्धीने जीव आणि ब्रह्म यामध्ये अथवा ब्रह्म आणि जगत यामध्ये कधीही भेद मानीत नाही, तो जीवन्मुक्त होय. ॥४३९॥

सज्जनांनी पूजा केली असता किंवा दुर्जनांनी पीडा दिली असता ज्याचा दोहोंवर समभाव राहील, तो जीवन्मुक्त होय. ॥४४०॥

समुद्रात नद्यांचे प्रवाह जसे तदाकार होऊन लीन होतात, तद्वत दुसर्‍यांनी पुढे आणलेले विषय ज्याच्या ठिकाणी प्रविष्ट झाले असता ब्रह्मरूप होऊन लय पावतात; पण कोणत्याही विकाराला उत्पन्न करीत नाहीत, तो जीवन्मुक्त होय. ॥४४१॥

ज्याने ब्रह्मतत्त्व जाणले, त्याला पूर्ववत संसार राहायाचा नाही, आणि जर पूर्ववत राहील तर त्याला ब्रह्मतत्त्व कळले नाही,व तो बहिर्मुख आहे असे समजावे. ॥४४२॥

'पूर्ववासनेच्या वेगाने जीवन्मुक्त देखील जन्ममरणरूप संसाराला पावेल' अशी शंका ठेवू नये. कारण,जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य अनुभवास आले म्हणजे वासना मंद पडते. ॥४४३॥

पुरुष अतिशय विषयी का असेना; पण त्याची कामवासनात्मक वृत्ति जशी आपल्या मातेचे ठायी कुंठित होते, तद्वत पूर्ण आनंदरूप ब्रह्म जाणून निदिध्यास करणार्‍या मननशील संन्याश्याची वृत्तिही विषयांचे ठायी कुंठित होते. जीवन्मुक्ताला जी काही बाह्य प्रतीति होते, ते जीवन्मुक्ताचे प्रारब्ध समजावे. कारण,बाह्यप्रतीति हे प्रारब्धाचे फल दृष्टीस पडते, असे श्रुति म्हणते. ॥४४४॥ ॥४४५॥

जोपर्यंत सुखादिकांचा अनुभव येतो, तोपर्यंत प्रारब्ध आहे असे मानावे लागते. कारण, फलाचा उदय कर्मापासूनच व्हावयाचा. कर्मावाचून कधीही होत नाही. ॥४४६॥

जागृति अवस्था प्राप्त झाली असता जसा स्वप्नातील कर्माचा लय होतो, तद्वत 'मी ब्रह्म आहे' अशा प्रकारचे अपरोक्ष ज्ञान प्राप्त झाले असता शेकडो कोटिकल्पामध्ये उपार्जित केलेले संचित कर्म लयास जाते. ॥४४७॥

स्वप्नाच्या वेळी जे काही उत्कट पुण्य किंवा पाप केले असेल, ते जागृत पुरुषाला स्वर्ग किंवा नरक देऊ शकेल काय? नाहीच शकणार. ॥४४८॥

आपल्या स्वरूपाला आकाशाप्रमाणे असंग आणि उदासीन जाणल्यावर पुरुष भावी कर्मांच्या योगाने कधीही किंचित देखील लिप्त होत नाही. ॥४४९॥

आकाशाला घटाचा संबंध असताही जसा घटातील मद्याचा दुर्गंध चिकटत नाही, तद्वत आत्म्याला उपाधीचा संबंध असताही उपाधीचे धर्म चिकटत नाहीत. ॥४५०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 14, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP