विवेकचूडामणी - श्लोक संग्रह १-५०

विवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.


सर्व वेदान्तसिद्धांताचा मुख्य विषय, नित्यानन्दस्वरूपी तद्वत् वाणी व मन यांच्या योगानें समजण्यास अशक्य अशा सद्गुरु गोविंदाला मी नमन करितो. ॥१॥

प्राण्यांना नरदेहप्राप्ति दुर्लभ होय त्यातहि पुरुषदेह दुर्लभ. त्यातही ब्राह्मण्य दुर्लभ होय. त्यातही वेदोक्तधर्ममार्गाचे ठाई तत्परता असणें दुर्लभ होय. त्यातही विद्वत्ता दुर्लभ होय. व त्यामध्येंही आत्मा व अनात्मा यांचे विवेचन होणे दुर्लभ होय व एवढ्या गोष्टी घडून आल्या तथापि अनुभव दुर्लभ. एवढेहि होऊन ब्रह्मस्वरूपी लीन होणे अर्थात मुक्तिसाध्य होणें हे अतिदुर्लभ होय. तस्मात् अनेक जन्मांमध्ये कोट्यवधि सत्कर्मै केल्याशिवाय मुक्ति कदापि मिळत नाही. ॥२॥

मनुष्यदेह, मोक्षाची इच्छा व सत्पुरुषांचा आश्रय ह्या तीन गोष्टी दुर्लभ होत. असे दुर्लभ पदार्थ ईश्वराच्या प्रसादाने मिळतात. ॥३॥

दुर्लभ नरदेह व त्यामध्यें पुरुषदेह व त्यामध्यें वेदशास्त्र बोध ही महाप्रयासाने प्राप्त झाली असून जो कोणी मूर्ख मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करीत नाही तो आत्मघातकी अर्थात् आत्म्याची हिंसा करणार होत्साता आपला नाश करून घेतो. ॥४॥

दुर्लभ मनुष्यदेह व त्यामध्यें पुरुषदेह प्राप्त झाला असता जो आपल्या स्वार्थाचे ठायी दुर्लक्ष करितो त्यापेक्षा दुसरा मूढात्मा म्हणजे मूर्ख पुरुष कोण बरे आहे ? ॥५॥

लोक अनेक शास्त्रें बोलोत, अनेक देवांची पूजा करोत, अनेक कर्मे आचरोत, अनेक देवतांला भजोत; परंतु आत्म्याच्या ऐक्याचा बोध झाल्यावाचून शेकडो ब्रह्मदेव होऊन गेले तथापि मुक्ति म्हणून प्राप्त व्हावयाची नाही. ॥६॥

द्रव्याचे योगाने मोक्ष प्राप्त होण्याची आशा नाही, अशी श्रुति आहे. तद्वत् कर्माच्या योगानेही मुक्ति मिळण्याची आशा नाही असे स्पष्ट श्रुति सांगत आहे. ॥७॥

या कारणाकरिता बाह्य विषयसुखाची इच्छा टाकून मोठ्या सद्गुरूचा आश्रय धरून त्यांच्या उपदेशाने एकाग्र चित्त करून विद्वानानें मुक्ति प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावा. ॥८॥

योग काय आहे? हे जाणून सर्वांभूती निष्ठापूर्वक समदृष्टि ठेवून या मायान्वित संसारसमुद्रामध्ये निमग्न झालेल्या आत्म्याचा आत्मानात्मविचाराने उद्धार करावा. ॥९॥

गंभीर, ज्ञात्या व तत्पर विद्वानांनी भवबंधनापासून मुक्त होण्यासाठी सर्व कर्माचा न्यास (त्याग करून) आत्मानात्मविचाराचा निदिध्यास ठेवावा, अर्थात् मनामध्यें वारंवार एकसारखे चिंतन करावे. ॥१०॥

कर्म जे आपण करितो ते फक्त अन्तःकरणाचे शुद्धीसाठी होय; वस्तुप्राप्तिकरिता नव्हे. वस्तूची सिद्धि विचाराच्या योगाने होते; कोट्यवधि कर्मे केली म्हणून काही होत नाही. ॥११॥

चांगल्या विचाराच्या योगाने सिद्ध झालेला रज्जूच्या सत्य स्वरूपाचा निश्चय- जसा भ्रान्ती पावलेल्या अविचारी जनांनी मानलेल्या सर्पभयरूपी दुःखाचा नाश करितो, तद्वत् सुविचाराने जन्ममरणरूप संसाराचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो. ॥१२॥

सत्यवक्त्या पुरुषाच्या सांगण्यावरून आत्मस्वरूप कसे आहे याचा निश्चय पूर्ण विचारान्ती करता येतो. शेकडो स्नाने केली शेकडो दाने दिली व शेकडो प्राणायाम खेचले तथापि त्यांच्या योगाने आत्मस्वरूपाचा निश्चय कदापि करिता येणार नाही. ॥१३॥

विशेषेकरून फलाचि सिद्धि होण्याकरिता, फलसिद्धि. इच्छिणारा, योग्य अधिकारी असण्याची फारच आवश्यकता आहे व अशा कामी देश, काल इत्यादि उपाय साहाय्य करणारे आहेत. ॥१४॥

याकरिता आत्मस्वरूप जाणण्याची इच्छा करणार्‍या पुरुषाने प्रथमतः दयाळू व ब्रह्म जाणत्या पुरुषांमध्ये उत्तम असा गुरु पाहून त्याजपाशी जाऊन नंतर आत्मस्वरूपाचा पूर्ण विचार करावा. ॥१५॥

-आत्मविद्याप्राप्त्यर्थ अधिकार्‍याची आवश्यकता असते. तो अधिकारी उत्तम बुद्धिमान, विद्वान भवति न भवति चालविण्याचे कामी प्रवीण व शास्त्रोक्त लक्षणांनी युक्त असा पाहिजे. ॥१६॥

आत्मानात्मविवेक जाणणारा; संसारात विरक्त; शम, दम, इत्यादि गुणांनी युक्त व मोक्षप्राप्तीला उत्सुक, अशा पुरुषालाच ब्रह्मजिज्ञासेचा अधिकार आहे. ॥१७॥

ज्ञात्या विचारी सिद्ध पुरुषांनी याविषयी चार साधने सांगितली आहेत ही असली तरच ब्रह्मनिष्ठा सिद्ध होते. नाही तर नाही. ॥१८॥

प्रथमतः नित्य व अनित्य अर्थात् नाशवंत व अक्षय वस्तूचा विचार गणलेला आहे. व नंतर इहलोकींच्या व परलोकींच्या फलभोगाचे ठायी विरक्तता मानलेली आहे. शमदमादिक सहा साधनांची संपत्ति व मोक्षप्राप्तीच्छा ही चार साधने स्पष्ट होत. ब्रह्म हे सत्य, अविनाशी होय. जग हे मिथ्या विनाशी (नाशवंत) होय असा जो मनाचा निश्चय करणे त्याला नित्यानित्यवस्तूंचा विवेक अर्थात पृथक्पणाचे ज्ञान ही संज्ञा होय. देहापासून ब्रह्मलोकापर्यंत ज्या प्रत्यक्ष पाहिलेल्या व कानांनी ऐकलेल्या भोगवस्तू त्या टाकण्याची इच्छा होणे याचे नाव वैराग्य होय . विषय सदोष आहेत असे वारंवार ध्यानी मनी आणून विषयांच्या समुदायाचे ठायी वारंवार विरक्ति उत्पन्न होऊन आत्मवस्तूच्या ठिकाणी जी काही निश्चित स्थिति उत्पन्न होते तिजला शम अशी संज्ञा होय. ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांना विषयांपासून परतवून त्यांची त्यांच्या त्यांच्या गोलकाचे ठायी स्थापना करणे, याला दम म्हणतात. चित्तवृत्तीला बहिर्मुख न होऊ देणे, याचेच नाव उत्कृष्ट उपरति होय. ॥१९॥ ॥२०॥ ॥२१॥ ॥२२॥ ॥२३॥

निवारणार्थ उपाय न करिता दुःख सहन करणे व चिंता आणि शोक येणेकरून रहित असणे अशा मनोवृत्तीला तितिक्षा म्हणतात. ॥२४॥

शास्त्रावर व गुरुवचनावर, ते सत्य आहे असा जो निश्चय त्याला ज्ञानी साधुजन श्रद्धा म्हणतात, की ज्या श्रद्धेने आत्मवस्तु प्राप्त होते. ॥२५॥

अन्तकरणाला पाहिजे तो विषय देऊन संतुष्ट करणे हे काही समाधान नव्हे. तर दोषरहित परमात्म्याचे ठायी सदा सर्वदा बुद्धि निमग्न करणे याचे नाव समाधान. ॥२६॥

अहंकारापासून देहापर्यंत जी बंधने अज्ञानाने कल्पिलेली आहेत त्या बन्धनांपास्न स्वस्वरूपाच्या बोधाने मुक्त होण्याची जी इच्छा तिला मुमुक्षता ही संज्ञा होय. ॥२७॥

ही जी मोक्षप्राप्तीची इच्छा ती मंद किंवा मध्यम जरी असली; तथापि विषयाचे ठायी बैराग्य ठेवल्याने शम, दमादि साधनानें व सद्गुरूंच्या प्रसादाने ती परिपक्व होऊन मोक्षफलास प्रसवते. ॥२८॥

ज्या पुरुषाची मोक्षप्राप्तीची इच्छा व वैराग्य ही तीव्र असतात अशा विरक्त पुरुषाचेच ठायी पूर्वोक्त, शम, दमादि गुण फलद्रूप होतात. ॥२९॥

वैराग्य आणि मुक्त होण्याची इच्छा ही जेथे मंद असतात तेथे, जसे निर्जल प्रदेशात मृगजळ भासते त्याप्रमाणे शमादिक भासमान मात्र असतात. ॥३०॥

मोक्ष होण्यास जी सामग्री लागते तीत भक्ति फार श्रेष्ठ आहे. स्वस्वरूपाचे अनुसंधान करणे याला भक्ति म्हणतात. ॥३१॥

दुसरे म्हणतात की, स्वात्मतत्वाचे अनुसंधान ठेवणे याचे नाव भक्ति. वर जी साधने सांगितली आहेत त्या साधनांच्या योगाने आत्म्याचे तत्त्व जाणण्याची इच्छा जो पुरुष करितो. त्या पुरुषाने विद्वान सद्गुरूला शरणागत जावे म्हणजे संसारबंधनापासून सुटका होईल. पूर्वनिर्दिष्ट गुरु कसा असला पाहिजे तर चतुर्वेद जाणणारा, निर्दोष, निरिच्छ, ब्रह्मज्ञानी, जनांमध्ये श्रेष्ठ, ब्रह्माचे ठायी लीन, निरिधन अर्थात काष्ठरहित अग्नीप्रमाणे शांत, काही कारणाशिवाय दयेचा केवळ समुद्र व नम्र सत्पुरुषांचा बांधव,अशा प्रकारचा असावा. ॥३२॥ ॥३३॥

अशा गुरूचे उक्त प्रकाराच्या योगाने अर्थात भक्तीने, नम्रतेने, प्रीतीने व सेवनाने आराधन करून समीप जाऊन त्याला प्रसन्न करावे व आपणाला जाणण्यायोग्य जे आत्मज्ञान वगैरे ते पुढे लिहिल्याप्रमाणे विचारावे. ॥३४॥

हे स्वामिन्-गुरो ! हे भक्तलोकबंधो ! करुणासागर !! मी जो या संसाररूपी समुद्रात पडलेला आहे त्या माझा आपल्या सरळ करुणामृतवृष्टिकारक कटाक्षदृष्टीने उद्धार करा. ॥३५॥

हे गुरो ! टाळण्यास अशक्य व दुःसह अशा संसाररूपी दावाग्नीमध्ये मी पोळून गेलो आहे. व दुष्ट प्रारब्धरूपी वायूने भयभीत होऊन कंपायमान झालो आहे. तर अशा संकटापासून माझे संरक्षण करा. मी आपल्याला अनन्य भावे शरणागत आहे. आपणाशिवाय रक्षण करणारा अन्य कोणी मी जाणत नाही, अर्थात आपल्यावाचून त्राता अन्य कोणी नाही. ॥३६॥

वसंताप्रमाणे लोकांचे हित करणारे, शांत आणि थोर असे सज्जन स्वतः घोर संसारसागराला तरून काही स्वार्थावाचून (अर्थात केवळ दयेने) इतरांना तारीत होत्साते (या जगी) राहतात. ॥३७॥

दुसर्‍याचे श्रम दूर करण्यास स्वतः तत्पर असणे हा थोरांचा स्वभावच होय. हा चंद्र सूर्याच्या प्रखर किरणांनी सर्वोपरी तापलेल्या पृथ्वीचे स्वतः होऊन रक्षण करतो; म्हणजे आपल्या शीतल किरणांनी तिचा ताप दूर करतो. ॥३८॥

"प्रभो ! ब्रह्मानंदरसाच्या अनुभवाने युक्त, पवित्र, फारच शीत, सयुक्तिक, तुमच्या वाणीरूप कलशातून निघालेल्या आणि कानाला गोड लागणार्‍या अशा वाक्यरूप अमृतानी आपण मला स्नान घाला. कारण, प्रापंचिक ताप हाच एक दावाग्नि त्याच्या ज्वालांनी मी संतप्त झालेला आहे. जे तुमच्या कृपाकटाक्षाच्या गतीला क्षणभर पात्र झाले; म्हणजे त्यांच्याकडे तुझी क्षणभर कृपादृष्टीने पाहिले, ते तुझी अंगीकारलेले लोक धन्य होत. या भवसागराला कसा तरू; माझी काय गति होईल; (सद्गतीचा) उपाय कोणता; हे मी काहीच जाणत नाही. प्रभो ! कृपा करून माझे रक्षण करा, आणि, माझ्या संसारसंबंधी दुःखांचा नाश करा." अशा प्रकारे बोलणारा आणि संसाररूप दावाग्नीच्या तापाने तापलेला जो आपला शिष्य त्याला, दयेच्या पाझराने ओलसर झालेल्या दृष्टीने पाहून उदार अंतःकरणाच्या सद्गुरूने एकदम अभय द्यावे. ॥३९॥॥४०॥॥४१॥

शरण आलेला, मोक्षाची इच्छा करणारा, सांगितल्याप्रमाणे उत्तम रीतीने करणारा, अगदी शांत ज्याचे चित्त, आणि जो जितेंद्रिय अशा शिष्याला त्या ज्ञानी सद्गुरूने केवळ दयेने ब्रह्मतत्त्वाचा उपदेश करावा. ॥४२॥

सद्गुरु म्हणाले -

बा जाणत्या ! भिऊ नको. तुझा नाश होणार नाही. संसारसागराच्या तरण्यास उपाय आहे. पुरातन संन्यासी जा मार्गाने या संसारसागराच्या पार गेले, तोच मार्ग मी तुला सांगतो. ॥४३॥

संसारसंबंधी भय नाहीसे करणारा एक मोठा उपाय आहे. त्या योगाने तू संसारसागराला तरून परमानंदाला प्राप्त होशील. ॥४४॥

वेदान्तशास्त्राच्या अर्थाचा विचार केल्याने उत्तम ज्ञान होते. नंतर त्या ज्ञानाच्या योगाने संसारसंबंधी दुःखांचा अगदी नाश होतो. ॥४५॥

श्रद्धा, भक्ति आणि ध्यानयोग हे मुक्त होऊ इच्छिणाराला मुक्तीचे उपाय आहेत, असे साक्षात वेदवाणी सांगते. जो या उपायांवरच अवलंबून राहतो, त्याची अविद्येने कल्पिलेल्या देहबंधनापासून सुटका होते. ॥४६॥

वस्तुतः ब्रह्मस्वरूपी अशा तुला स्वरूपाच्या अज्ञानाने या देहादिक अनात्मवस्तूंपासून बंधन प्राप्त झाले आहे. आणि या पासूनच संसार प्राप्त झाला आहे. या आत्मा आणि अनात्मा या दोहोंच्या विवेचनापासून उदयास आलेला ज्ञानरूप अग्नि अज्ञानाला व त्याच्या कार्याला समूळ जाळून टाकील. ॥४७॥

शिष्य म्हणालास्वामिन ! मी हा प्रश्न करीत आहे, तो कृपा करून श्रवण करावा. या प्रश्नाचे उत्तर आपल्या मुखांतून श्रवण करून मी कृतार्थ होईन. ॥४८॥

बंध म्हणजे काय ? हा आला कसा ? याची स्थिती कशी आहे ? आणि यापासुन सुटका कशी होईल ? अनात्मा तो कोणता ? स्वरूपभूत परमात्मा कोणता ? आणि त्याचे विवेचन कसे ? हे सांगावे. ॥४९॥

सद्‌गुरु म्हणाले -

तू धन्य आहेस. कृतकृत्य आहेस. तू आपले कुल पवित्र केलेस. कारण, तू अविद्याबंधनापासून मुक्त होऊन ब्रह्म होऊ इच्छित आहेस. ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 14, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP