उपाधि म्हणून जो आहे तोच येतो, तोच जातो, तोच कर्मे करतो, तोच त्यांची फळे भोगतो आणि तोच जीर्ण झाला म्हणजे मरण पावतो. मी कुलपर्वताप्रमाणे निरंतर निश्चल राहिलो आहे. ॥५०१॥
सदा एकरूप आणि अंशरहित अशा माझ्या आंगी प्रवृत्ति नाही आणि निवृत्तिही नाही. जो एकरूप, निबिड, अंतररहित, आणि आकाशासारखा परिपूर्ण तो कसा काही व्यापार करील ? ॥५०२॥
इंद्रियरहित, चित्तरहित, निर्विकार, निराकार आणि अखंडसुखानुभवरूप अशा मला पापपुण्य कोठून असणार ? "अनन्वागतं" ही श्रुति देखील हेच सांगत आहे. ॥५०३॥
छायेने स्पर्श केलेली शीत, उष्ण, बरी किंवा वाईट वस्तु तिच्याहून वेगळा असणार्या पुरुषाला यत्किंचितही स्पर्श करीत नाही. ॥५०४॥
किंवा जसे घराचे धर्म दिव्याला स्पर्श करीत नाहीत, तद्वत साक्ष पदार्थांचे धर्म साक्षी पुरुषाला स्पर्श करीत नाहीत, कारण, तो विकाररहित, उदासीन आणि साक्ष पदार्थांहून अगदी वेगळा आहे. ॥५०५॥
कूटस्थ आणि चैतन्यरूप असा माझा साक्षीपणा, सूर्याचा जसा सर्व कर्मात साक्षीपणा तसा आहे, माझा नियामकपणा, अग्नीचा जसा दाह करण्यात नियामकपणा तद्वत आहे, आणि माझा आरोपित वस्तूंशी संबंध, रज्जूचा जसा आरोपित रज्जुशी संबंध तद्वत आहे. ॥५०६॥
मी कर्ता किंवा करविता नाही. मी भोगणारा किंवा भोगविणारा नाही. मी पाहणारा किंवा दाखवणारा नाही. तर मी स्वयंप्रकाश आणि अनिर्वचनीय आहे. ॥५०७॥
ज्यांच्या बुद्धीला मोह झालेला असे लोक उपाधीचे चलनवलन झाले असता त्या उपाधीच्या संबंधाने प्रतिबिंबाच्या आंगी आलेल्या चलनवलनाला मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, हाय हाय माझा अमक्याने नाश केला अशा प्रकारे, बिंबभूत जे सूर्यासारखे क्रियारहित आहे, त्याचे ठिकाणी मानतात. ॥५०८॥
हा जडपदार्थमय देह उदकात किंवा भूमीवर खुशाल लोळो ! जसे आकाश घटाच्या धर्मांनी लिप्त होत नाही, तद्वत मी या देहाच्या धर्मांनी लिप्त होत नाही. ॥५०९॥
कर्तृत्व, भोक्तृत्व, दुष्टत्व, उन्मत्तत्व, जाड्य, बुद्धत्व आणि मुक्तत्व इत्यादि विकल्प बुद्धीचे आहेत. म्हणूनच केवल आणि अद्वितीय अशा स्वरूपभुत परब्रह्माचे ठायी हे विकल्प वस्तुत मुळीच नाहीत. ॥५१०॥
प्रकृतीचे विकार दहा असोत, शेकडो असोत, किंवा हजारो असोत, असंग आणि चैतन्यरूप मला त्या योगाने काय होणार ? कारण ढग कधीही आकाशाला स्पर्श करू शकत नाहीत, तद्वत मलाही ते स्पर्श करू शकत नाहीत. ॥५११॥
आकाशासारखे, सूक्ष्म आदि आणि अंत यांनी रहित असे अव्यक्तापासून ते स्थूल पदार्थांपर्यंत सकल जगत जेथे केवळ आभासमात्र दिसते, असे जे अद्वितीय ब्रह्म तेच मी आहे. ॥५१२॥
सर्वांचा आधार, सर्व वस्तूंना प्रकाशित करणारे, सर्वमय, सर्वगत, सर्व वस्तूंनी रहित, नित्य शुद्ध, निश्चल आणि निर्विकल्प असे अद्वितीय ब्रह्म तेच मी आहे. ॥५१३॥
प्रत्यग्रूप, इंद्रियांच्या योगाने जाणण्यास अशक्य, सच्चिदानंदरूप, अनंत आणि जेथे मायेचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, असे जे अद्वितीय ब्रह्म, तेच मी आहे. ॥५१४॥
मी क्रियारहित, विकाररहित, अवयवरहित, आकाररहित, विकल्परहित, अवलंबनरहित, द्वैतरहित आणि नित्य असा आहे. ॥५१५॥
मी सर्वात्मक आहे, सर्वरूप आहे, सर्वां पलीकडचा आहे, अद्वितीय आहे, केवळ अखंड बोधरूप आहे, आणि निरंतर आनंदरूप आहे. ॥५१६॥
ज्या आपल्या कृपेच्या उत्तम महात्म्याच्या प्रसादाने मला हे ब्रह्मानंदरूप साम्राज्याचे ऐश्वर्य प्राप्त झाले. त्या महासमर्थ सद्गुरुरूप आपणाला माझा वारंवार नमस्कार असो. ॥५१७॥
गुरुराज, मोठ्या स्वप्नात असलेला, मायेने प्रकट केलेल्या जन्मजरामरणरूप बिकट अरण्यामध्ये भ्रमण करणारा, प्रतिदिवशी अतिशय तापांनी क्लेश पावणारा आणि अहंकाररूप वाघापासून अतिशय उपद्रव पावलेला अशा या मला अतिशय दयेने आपण निद्रेतून जागृत करून चांगले बचावले. ॥५१८॥
गुरुराज ! वाणी व मनाला अगोचर, निरंतर एक रूपाने राहणारे आणि जे जगद्रूपाने भासत आहे, अशा त्या आपल्या ज्योतिःस्वरूपाला वारंवार नमस्कार असो. ॥५१९॥
याप्रमाणे ज्याला तत्त्व समजले आणि आत्मसुखाचा लाभ झाला, अशा त्या उत्कृष्ट शिष्याला नम्र झालेला पाहुन ह्रदयात हर्ष पावलेले ते महासमर्थ गुरुराज पुन्हा पुढे सांगितल्याप्रमाणे उत्तम वचन बोलले. ॥५२०॥
हे जगत, ब्रह्माच्या प्रतीतीचा प्रवाह आहे, यासाठी अतिशय शांत मनाने ज्ञानदृष्टीच्या योगाने सर्व ठिकाणी आणि सर्व अवस्थांमध्ये ब्रह्मच आहे, दुसरे काही नाही, असे तू पहात जा. जसे डोळस पुरुषाच्या चारी बाजूस जे पाहण्यात येते ते रूपावाचून दुसरे काही नसते, तद्वत ब्रह्मवेत्त्याला बुद्धीच्या विहाराचे स्थान ब्रह्मावाचून दुसरे काही नाही. ॥५२१॥
कोण विद्वान् पुरुष या परमानंदरसाचा अनुभव घेण्याचे सोडून शून्य वस्तूंचे ठायी रत होईल? अतिशय आल्हाद देणारा चंद्र प्रकाशमान असता चित्रातील चंद्राला कोण पाहू इच्छिल ? ॥५२२॥
मिथ्या पदार्थाच्या अनुभवापासून किंचित देखील तृप्ति किंवा दुःखाची हानी होत नाही. यासाठी तू अद्वितीय आनंदरसाच्या अनुभवाने तृप्त होऊन आत्मनिष्ठेच्या योगाने निरंतर सुखाने रहा. ॥५२३॥
महाबुद्धिमंता ! तू सर्व प्रकारे स्वतालाच पहात स्वतालाच अद्वितीय मानीत आणि स्वानंदाचा अनुभव कालक्षेप कर. ॥५२४॥
अखंडबोधरूप आणि निर्विकल्प अशा आत्म्याचे ठायी विकल्प (भेद) मानणे हे आकाशात नगराची कल्पना करण्यासारखे आहे. यासाठी तू निरंतर आनंदमयरूपाने परम शांतीरूप पावून मौन धर. ॥५२५॥
मिथ्या पदार्थांच्या संकल्पविकल्पाला कारणभूत बुद्धीची परम शांति होणे याचे नाव मौन. हे मौन प्राप्त झाले असता ब्रह्माला ब्रह्मरूपाने जाणणार्या महात्म्याला अद्वितीय आनंदसंबंधी सुख निरंतर मिळत असते. ॥५२६॥
ज्याने आत्मस्वरूप जाणले, आणि जो स्वानंदरसाचे पान करू लागला अशा पुरुषाला वासनारहित मौनाहून वेगळे उत्तम सुखकर नाही. ॥५२७॥
आत्माराम आणि निरंतर मौन राखणारा विद्वान आपल्या इच्छेस येईल त्याप्रमाणे राहतो, चालतो, उभा राहतो, बसतो, निद्रा घेतो आणि दुसर्या क्रियाही करतो. ॥५२८॥
प्रतिबंधरहित ज्याची वृत्ति आणि ज्याने तत्त्व उत्तम प्रकारे जाणले, अशा महात्म्याला देश, काल, आसन, दिशा, यम, नियम इत्यादिक साधनांची अपेक्षा नाही. स्वस्वरूप जाणण्याला नियमादिकांची काय जरूर आहे ? ॥५२९॥
'हा घट आहे' असे जाणण्याला जशी नेत्रांच्या निर्मळपणावाचून दुसर्या कोणत्याही नियमाची अपेक्षा नाही, तसेच आत्म्याला जाणण्याला एक बुद्धीच्या शुद्धपणावाचून देश, काल, शरीरशुद्ध इत्यादिकांची बिलकुल अपेक्षा नाही. बुद्धि शुद्ध असेल तर हा नित्यशुद्ध आत्मा आपोआपच प्रकाशमान होतो. ॥५३०॥ ॥५३१॥
'मी देवदत्त आहे' हे जाणण्याला जशी दुसर्या कोणाची अपेक्षा नाही, तद्वत 'मी ब्रह्म आहे' असे ब्रह्मवेत्त्याला जाणण्यालाही दुसर्या कोणाची अपेक्षा नाही. ॥५३२॥
सूर्यासारख्या ज्याच्या तेजाने हे सर्व जग प्रकाशमान होते, त्या वस्तूला प्रकाशित करणारा पदार्थ जड, मिथ्या आणि तुच्छ असेल काय? ॥५३३॥
वेद, शास्त्रे, पुराणे आणि सर्व पदार्थ ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात, त्या जाणत्या वस्तूचा प्रकाश कोणत्या दुसर्या वस्तू पासून होणार ? ॥५३४॥
हा आत्मा स्वयंप्रकाश आहे, अनंत शक्तिमान आहे, प्रमाणाच्या योगाने अगम्य आहे, आणि सकल वस्तूंचा अनुभवरूप आहे. सर्वात उत्तम ब्रह्मवेत्ता या आत्म्याला जाणून बंधमुक्त होत्साता जयजयकार पावतो. ॥५३५॥
निरंतर आनंदरसाने तृप्त झालेला ब्रह्मवेत्ता विषयांचा अभाव झाल्यास खेद पावत नाही, विषयांच्या योगाने हर्ष पावत नाही, कोठे आसक्त होत नाही, व कोठे विरक्तही होत नाही, तर स्वताच स्वस्वरूपी सदैव क्रीडा करीत असतो, आणि आनंद पावत असतो. ॥५३६॥
बालक जसा भूक आणि शरीरपीडा यांना विसरून खेळण्याच्या वस्तूने खेळत असतो, तद्वत विद्वान अहंता आणि ममता यांना सोडून सुखी होत्साता सर्वाला विसरून स्वस्वरूपी रमतो. ॥५३७॥
ब्रह्मवेत्ते पुरुष चिंता आणि दैन्य यावाचून मिळालेली भिक्षा खातात, नदीचे पाणी पितात, स्वातंत्र्य असल्यामुळे निरंकुश राहतात, स्मशानात किंवा वनात निर्भयपणे निद्रा घेतात, ज्यांना धुण्याची किंवा वाळत घालण्याची गरज नाही अशी दिशारूप वस्त्रे नेसतात, घरातील शेजेप्रमाणे भूमीवर शयन करतात, वेदांतरूप मार्गामध्ये संचार करतात आणि परब्रह्माचे ठायी क्रीडा करतात. ॥५३८॥
ज्याचे जातिकुल वगैरे उघड दिसत नाही, असा बाह्यलक्षणांचा परित्याग करणारा ब्रह्मवेत्ता या शरीररूप विमानात राहून दुसर्याच्या इच्छेने आलेल्या सर्व विषयांना मुलाप्रमाणे सेवन करतो. ॥५३९॥
चैतन्यरूप आकाशात राहिलेला ब्रह्मवेत्ता वस्त्र नेसून, वल्कले नेसून अथवा नग्नपणानेच वेड्यासारखा, मुलासारखा किंवा पिशाचासारखा पृथ्वीवर फिरतो. ॥५४०॥
एकटा फिरणारा, निरंतर स्वस्वरूपाच्या योगानेच तृप्त राहणारा आणि स्वतः सर्व रूपाने राहिलेला ब्रह्मवेत्ता निष्कामपणाने विषयांचे सेवन करतो. ॥५४१॥
निरंतर परम आनंदाने सुख पावलेला ब्रह्मवेत्ता कोठे विद्वान् होऊन, कोठे मूढ होऊन, कोठे मोठ्या राजाचे वैभव संपादन करणारा होऊन, कोठे भ्रमिष्ट होऊन, कोठे सभ्य गृहस्थ होऊन, कोठे अजगरासारख्या वृत्तिचा होऊन, कोठे सत्पात्र होऊन अथवा कोठे अपमान पावून कोठे कोणाला ओळखता न येईल अशा रीतीने संचार करीत असतो. ॥५४२॥
ब्रह्मवेत्ता निर्धन असताही निरंतर संतुष्ट असतो, कोणी सहाय नसताही मोठा सामर्थवान असतो, विषय न भोगताही निरंतर तृप्त असतो, सर्वांहून विलक्षण असताही सर्वत्र समदृष्टी ठेवणारा असतो, करित असताही कर्ता नसतो, फलांना भोगीत असताही भोक्ता नसतो, देहधारी असताही देहरहित असतो, आणि परिच्छिन्न असताही व्यापक असतो. ॥५४३॥ ॥५४४॥
निरंतर शरीरावरच्या अभिमानाला सोडून राहणार्या ब्रह्मवेत्त्याला कधीही सुखदुःखे किंवा पुण्यपातके स्पर्श करीत नाहीत. ॥५४५॥
स्थूलादिक शरीरांशी संबंध बाळगणार्याला व त्यावर अभिमान ठेवणाराला सुखदुःखे किंवा पुण्यपातके लागू आहेत. पण ज्याने अभिमानरूप बंधनालाच तोडून टाकले अशा ब्रह्मस्वरूपी मुनीला पुण्यपातके व त्याची फले कोठून लागू असणार ? ॥५४६॥
सूर्य वस्तुतः राहूने ग्रासलेला नसतो तथापि तो ग्रासल्यासारखा भासतो, म्हणून लोक सूर्याच्या खर्या स्थितीला न जाणता त्याला राहूने ग्रासले असे म्हणतात. तद्वत उत्तम ब्रह्मवेत्ता वस्तुतः देहादिक बंधनातून मुक्त असताही मूढ लोक त्याच्या खर्या स्थितीला न जाणता शरीराचा आभास दिसतो तेवढ्यावरून त्या मुनीला शरीरी समजतात. ॥५४७॥ ॥५४८॥
सर्प जसा कात टाकून राहतो, तद्वत ब्रह्मवेत्ता देहाच्या अभिमानाल सोडून राहतो. या ब्रह्मवेत्त्याच्या देहाला प्राणवायूच थोडेबहुत इकडे तिकडे चाळवीत असतो. ॥५४९॥
उदकाचा प्रवाह ज्याप्रमाणे लाकडाला उंच सखल ठिकाणी घेऊन जातो, तद्वत प्रारब्ध कर्म ब्रह्मवेत्त्याच्या देहाला जसा जसा ज्याचा समय प्राप्त झाला असेल त्या भोगाकडे घेऊन जाते. ॥५५०॥