विवेकचूडामणी - श्लोक संग्रह २०३-२५०

विवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.


ते ज्ञान आणि अनात्मा यांच्या चांगल्या विवेचनानेच सिद्ध होते. म्हणून प्रत्यगात्मा आणि अनात्मा यांचे विवेचन केलेच पाहिजे. ॥२०३॥

अतिशय गढूळ झालेले पाणी कर्दम नाहीसा झाला म्हणजे जसे निवळ दिसते, त्याप्रमाणे अनात्मवस्तूंची निवृत्ति होते तेव्हा प्रत्यगात्म्याची सद्रूपाने स्पष्ट प्रतीति होते. यासाठी अहंकारादिक अनात्मवस्तूंचा प्रत्यगात्म्यापासून चांगला निरास (दूर त्याग) केलाच पाहिजे. ॥२०४॥॥२०५॥

वर सांगितलेल्या कारणास्तव हा विज्ञानमय कोश परमात्मा नव्हे. कारण, विज्ञानमय कोश विकारी आहे, जड आहे, परिच्छिन्न आहे, दृश्य आहे, आणि केव्हा केव्हा भासत असतो, व केव्हा केव्हा भासत नसतो असा आहे म्हणून हा अनित्य विज्ञानमय कोश नित्य परमात्मा होऊ शकत नाही. ॥२०६॥

पुण्यवान लोकांना पुण्याचा अनुभव घेत असता आणि स्वताची आवडती वस्तु मिळाली असता जी वृत्ति तमोगुणाने व्यापलेली असून प्रिय मोद आणि प्रमोद या गुणांनी युक्त असते तिला आनंदमय कोश म्हणतात. या वृत्तीमध्ये प्राणिमात्र यत्न केल्यावाचून स्वतः आनंदरूप होऊन आनंदाचा अनुभव घेतो. ॥२०७॥

सुषुप्ति अवस्थेमध्ये आनंदमय कोशाची अतिशय स्फूर्ति होत असते. आणि स्वप्नात व जागृतीमध्ये आवडती वस्तु दृष्टीस पडणे इत्यादि कारणांनी त्याची यकिंचित स्फूर्ति होत असते. ॥२०८॥

हा आनंदमय कोश देखील परमात्मा होऊ शकत नाही. कारण, हा उपाधीने युक्त आहे, प्रकृतीपासून झालेला आहे, म्हणूनच कार्यरूप आहे, आणि पुण्य कर्माच्या फलांचा जो समुदाय त्याच्या अधीन आहे (आणि परमात्मा याहून विलक्षण आहे.) ॥२०९॥

वेदवचन आणि युक्त यांच्या योगाने पाचही कोशांचा (वर सांगितल्याप्रमाणे) निषेध केला असता त्या निषेधाच्या अवधिरूपाने बोधरूप साक्षी (आत्मा) अवशेष राहतो. ॥२१०॥

शिष्य म्हणाला -

सद्गुरो ! या पाच कोशांचा 'हे मिथ्या आहेत' अशा प्रकारे निषेध केला असता सर्व वस्तूंचा अभावच येथे माझ्या पाहण्यात येतो, दुसरे काहीच येत नाही तेव्हा आत्मा ज्याला जाणणे आहे अशा पुरुषाने आत्मा म्हणून कोणत्या वस्तूला समजावे ? सद्गुरु म्हणाले - सुज्ञा ! खरे म्हटलेस. तू प्रश्न करण्याच्या कामी निपुण आहेस. अहंकारादिक सर्व विकार (कार्ये) आणि त्यामागून त्यांचा अभाव यांना जो प्रत्यक्षपणे जाणतो; पण ज्याला प्रत्यक्षपणे कोणी जाणत नाही त्या जाणत्या वस्तूला तू अतिसूक्ष्म बुद्धीने आत्मा असे जाण. ॥२११॥॥२१२॥॥२१३॥॥२१४॥

ज्या ज्या वस्तूला जो पुरुष प्रत्यक्षपणे जाणतो, तो त्या त्या वस्तूचा साक्षी होय; पण जी वस्तु प्रत्यक्षपणे कोणालाच कळत नाही, त्या वस्तूसंबंधाने साक्षीपणा कोणालाही देता येत नाही. ॥२१५॥

अहंकारादिकांच्या अभावाचे साक्षी आपण स्वताच आहो. कारण, स्वतःच आपण त्यांना जाणत असतो. म्हणूनच सर्वांपेक्षा पलीकडचा आणि सर्वांचा साक्षी असा प्रत्यगात्मा आपणच आहो. दुसरा कोणी नाही. ॥२१६॥

प्रत्यग्रूपाने निरंतर 'मी 'मी' अशा एकाच प्रकारे स्फुरण पावणारा जो हा आत्मा जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति या अवस्थांचे ठाई अत्यंत स्पष्टपणे भासमान असतो. आणि नानाप्रकारच्या विकारांना जे प्राप्त होत आहेत, अशा अहंकार बुद्धि इत्यादिकांना पाहत होत्साता जो ह्रदयामध्ये सच्चिदानंद रूपाने स्फुरण पावत असतो, त्या या आत्म्याला तू जाण. ॥२१७॥

घडा, पाणी आणि त्यात असलेले सूर्याचे प्रतिबिंब ही सर्व सोडून दिली असता जसा याहून वेगळा, या तिघांना प्रकाशित करणारा आणि स्वयंप्रकाश असा सूर्य जाणत्या मनुष्याच्या पाहण्यात येतो, तद्वत देह, बुद्धि आणि तिच्यात असलेले चैतन्याचे प्रतिबिंब (चिदाभास) यांना सोडून दिले असता द्रष्ट, अखंडबोधरूप सर्वांना प्रकाशित करणारा, कार्य आणि कारण याहून वेगळा, नित्य, व्यापक, सर्वत्र असलेला, अत्यंत सूक्ष्म, आपल्याहून जो भिन्न नाही, ज्याच्या आत किंवा बाहेर दुसरी वस्तु नाही, असा हा स्वरूपभूत आत्मा उत्तम प्रकारे जाणण्यात येतो तेव्हा विद्वान पुरुष पापरहित होतो, रजोगुणरहित होतो; मृत्युरहित होतो, शोकरहित होतो, आनन्दाने पूर्ण होतो, अणि स्वतः कोणापासूनही भीत नाही. आत्मतत्त्व जाणल्यावाचून मुमुक्षूला संसारबंधनातून सुटण्याला दुसरा मार्ग नाही.॥२१८॥॥२१९॥॥२२०॥॥२२१॥॥२२२॥

'मी ब्रह्माहून भिन्न नाही' असे जे ब्रह्माशी आपल्या ऐक्याचे अपरोक्ष ज्ञान, ते संसारातून सुटका होण्यास कारण आहे. या ज्ञानाच्या योगाने विद्वान लोक, अद्वित्य आनंदघन जे ब्रह्म त्यास प्राप्त होतात. ॥२२३॥

ब्रह्मस्वरूपी झालेला विद्वान जन्ममरणरूप संसारचक्रावर फिरून येत नाही. यासाठी आत्म्याचे जे ब्रह्माशी ऐक्य ते उत्तम प्रकारे जाणावे. ॥२२४॥

सत्य, ज्ञान, अनंत, कार्यकारणांहून पलीकडचे, स्वतः सिद्ध, नित्य, आनंदैकरस, प्रत्यगात्म्याहून अभिन्न, असे अतिशय शुद्ध ब्रह्म निरंतर उत्कर्ष पावत आहे. ॥२२५॥

हे सद्रूप ब्रह्म अगदी द्वैतरहित आहे. कारण, याहुन वेगळी वस्तु नाही. म्हणून परमार्थतत्त्वाचा उत्कृष्ट जेव्हा बोध होतो, तेव्हा दुसरी कोणतीही वस्तु रहात नाही. ॥२२६॥

जे हे सर्व जग अज्ञानामुळे अनेक रूपाचे प्रतीतीस येत आहे, त्याच्यावरचे सर्व कल्पनेचे दोष नाहीसे झाले असता ते सर्व जग ब्रह्मच आहे. ॥२२७॥

घट मृत्तिकेचे कार्य असूनही तो मृत्तिकेहून वेगळा नाही. सर्वत्र मृत्तिकेच्या स्वरूपाहून घटाचे स्वरूप भिन्न नाही, तर मग ज्याचे नाव मात्र मिथ्या कल्पिलेले आहे, असा घट मृत्तिकेहून वेगळा कोठून असणार ? ॥२२८॥

कोणीही मनुष्य घटाचे स्वरूप मृत्तिकेहून वेगळे दाखवू शकत नाही. यास्तव घट भ्रांतीनेच कल्पिलेला आहे, वास्तविक सत्य तर मृत्तिकाच आहे. तद्वत जगाचे स्वरूप ब्रह्माहून वेगळे कोणीही दाखवू शकत नाही. म्हणून जग भ्रांतीने कल्पिलेले आहे, आणि वास्तविक सत्य ब्रह्मच आहे. ॥२२९॥

हे सर्व जग सद्रूप ब्रह्माचे कार्य आहे, म्हणून सदैव ब्रह्मस्वरूपच आहे. ब्रह्माहून वेगळे नाही. जो मनुष्य 'हे जग ब्रह्माहून वेगळे आहे' असे म्हणतो त्याचा मोह गेला नाही, म्हणजे झोपी गेलेल्या मनुष्याप्रमाणे तो बकत आहेसे समजावे. ॥२३०॥

अथर्ववेदातील श्रुतिरूप श्रेष्ठ वाणी 'हे जग ब्रह्मच आहे' असे म्हणत आहे. तस्मात हे जग ब्रह्मच आहे. कल्पित पदार्थ आपल्या अधिष्ठानाहून वेगळा नसतो. ॥२३१॥

हे जगत स्वताच्या रूपाने सत्य आहे असे जर मानले तर तत्त्वाची हानि होते, वेदाला अप्रामाणिकपणा येतो, आणि ईश्वराकडे असत्यवादीपणा येतो, या तीनही गोष्टी विद्वानांना इष्ट नाहीत. ॥२३२॥

वस्तूचे तत्व जाणणार्‍या ईश्वराने (श्रीकृष्णाने) भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की 'दृश्य पदार्थ कल्पित आहेत यासाठी मी त्यांच्या ठिकाणी राहिलो नाही. आणि ते माझ्या ठिकाणी राहिले नाहीत.' ॥२३३॥

जग जर सत्य असते तर ते सुषुप्तीमध्ये दिसले पाहिजे. ज्यापेक्षा अगदी दिसत नाही, त्यापेक्षा ते असत्य आणि स्वप्नवत मिथ्या आहे. ॥२३४॥

यासाठी जग परमात्म्याहून वेगळे नाही. वेगळे असे भासते ते रज्जुसर्पादिकांप्रमाणे मिथ्या आहे. कल्पित पदार्थाला काय सत्यता असते ? भ्रांतीने तशा तर्‍हेचे (कल्पित पदार्थांसारखे) अधिष्ठानच भासत असते. ॥२३५॥

भ्रांति पावलेल्या पुरुषाला जे जे काही भासते, ते ते अधिष्ठानच (ब्रह्म) होय. याहून वेगळे नाही. जसे शुक्तीवर भासणारे जे रजत (रूपे) ती शुक्तीच होय. शुक्तीहून वेगळे रजत नाही. भ्रांति होते तेव्हा 'हे रजत आहे' असे जे वाक्य भ्रांति पावलेल्या पुरुषाच्या तोंडातून निघते, या वाक्यातील 'हे' या अंशाने जसे नेहमी शुक्तीचे निरूपण होत असते, त्याप्रमाणे 'हे' जगत आहे, या वाक्यातही 'हे' या वाक्यांशाने नेहमी ब्रह्माचेच निरूपण होत असते. शुक्तीवर कल्पिलेले रजत असे केवळ नावाचेच असते, तद्वत ब्रह्मावर कल्पिलेले जगत केवळ नावाचेच असते. ॥२३६॥

यासाठी परब्रह्म सत्य आहे, सदैव अद्वितीय आहे, शुद्धज्ञानरूप आहे, निरंजन आहे अतिशय शांत आहे, आदि आणि अंत यांनी रहित आहे, क्रियारहित आहे, आणि निरंजन व आनंदरसरूप आहे. ॥२३७॥

ते ब्रह्म मायेने कल्पिलेल्या सर्व भेदांनी रहित आहे. नित्य आहे, सुखरूप आहे, अवयवरहित आहे.कोणत्याही प्रमाणाने समजू शकण्याजोगे नाही, निराकार आहे, मन, वाणी इत्यादिकांना व्यक्तपणे कळत नाही, नाम आणि नाश यांनी रहित आहे असे असूनही कोणत्यातरी प्रकारचे हे एक ज्योति स्वताच प्रकाशमान होत असते. ॥२३८॥

ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान या संबंधाने रहित अनंत, निर्विकल्प, केवळ अखंड चैतन्यरूप अशा प्रकारच्या परब्रह्मरूप तत्त्वाला ज्ञानी जाणतात. ॥२३९॥

जे टाकता येत नाही, घेता येत नाही, मन आणि वाणी यांना अगम्य, प्रमाणे जेथे चालत नाहीत, ज्याचा आदि अंत नाही, असे जे पूर्णब्रह्मरूप ज्योति, ते मी आहे. ॥२४०॥

अशा प्रकारे ज्याचे विवेचन केले अशा 'तत' पदाचा अर्थ ईश्वर आणि 'त्वं' पदाचा अर्थ जीव या दोघांच्या उत्तम ऐक्याचेच "तत्त्वमसि" ही श्रुति वारंवार प्रतिपादन करीत आहे. ॥२४१॥

ईश्वर आणि जीव यांचे जे ऐक्य श्रुति सांगत आहे, ते लक्ष्यरूपाने आहे; पण वाच्यरूपाने नाही. कारण, सूर्य आणि काजवा, राजा आणि चाकर, समुद्र आणि विहिर, तसाच मेरु आणि परमाणु यांच्या परस्पर योग्यतेत जसे महदंतर आहे तद्वत वाच्यार्थरूप ईश्वर आणि जीव यांच्या योग्यतेत महदंतर आहे. ॥२४२॥

त्यांचे हे महदंतर उपाधीने कल्पिलेले आहे, आणि कोणताही उपाधि खरा नसतो. महदादिकांचे उत्पत्तिस्थान जी माया हा ईश्वराचा उपाधि होय. आणि मायेचे कार्यरूप जे पंचकोश हा जीवाचा उपाधि होय. हे श्रवण कर. ॥२४३॥

हे जे जीव आणि ईश्वर यांचे उपाधि, ते अगदी काढून टाकले असता ईश्वर नाही, आणि जीव नाही. ज्याप्रमाणे राजाचा उपाधि राज्य आणि योद्ध्याचा उपाधि तरवार ही दोन्ही एकीकडे ठेविली तर राजा नाही, आणि योद्धा नाही. ॥२४४॥

"अथात आदेशः" ही श्रुति ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित जे जीव आणि ईश्वर या दोघांचा स्वतः निषेध करीत आहे. तस्मात् श्रुतिरूप प्रमाणाने ज्याला आश्रय दिला अशा बोधाने वर सांगितल्याप्रमाणे त्या दोन्ही उपाधींचा त्याग केलाच पाहिजे. ॥२४५॥

'हे वस्तु ब्रह्म नाही, हे वस्तु ब्रह्म नाही,' कारण हे ब्रह्माचे ठाई कल्पित आहे आणि कल्पित आहे म्हणूनच रज्जूवर भासलेल्या सर्पाप्रमाणे व स्वप्नाप्रमाणे सत्य नाही. अशा प्रकारे सुयुक्तीने सर्व दृश्य वस्तूंचा निषेध करून नंतर ईश्वराचा आणि जीवाचा जो एकभाव आहे, तो जाणावा. ॥२४६॥

दोघांचा अखंड एकरसपणा सिद्ध होण्यासाठी लक्षणेने त्या दोघांचा (जीवाचा आणि ईश्वरचा) लक्ष्यार्थ जाणला पाहिजे. येथे जहल्लक्षणेचा व तसाच अजहल्लक्षणेचा उपयोग नाही. तर जहलजुल्लक्षणाच (भागत्याग लक्षणा) पाहिजे. ॥२४७॥

'तो हा देवदत्त आहे' या वाक्यामध्ये 'तो' आणि 'हा' या दोन विरुद्ध वाक्यांशांचा त्याग करून देवदत्तरूप व्यक्तींचे एकत्व जसे सांगितले जाते. तद्वत "तत्त्वमसि" या वाक्यामध्ये तच्छब्दाचा वाच्यार्थ ईश्वर आणि त्वपदाचा वाच्यार्थ जीव यांच्या विरुद्ध अंशांचा त्याग करून चैतन्यरूपाने दोघा चैतनांच्या अखंडपणाचा ज्ञानी लोक अनुभव घेतात. अशा प्रकारे शेकडो महावाक्ये भागत्याग लक्षणेने ईश्वर आणि जीव यांचे अखंड ऐक्य सांगत आहेत. ॥२४८॥ ॥२४९॥

'अस्थूलं' हे श्रुतीचे वचन मिथ्या वस्तूचा निषेध करून स्वतःसिद्ध, आकाशाप्रमाणे व्यापक आणि तर्कास विषय न होणारे अशा ब्रह्माचा बोध करीत आहे. यासाठी, ज्यांच्याविषयी 'हा आत्मा आहे' असा तुझा ग्रह झालेला आहे, त्या ह्या मिथ्याभूत दृश्य वस्तूंचा तू त्याग कर, आणि अतिशुद्ध झालेल्या अंतःकरणाने 'मी ब्रह्म आहे' अशाच प्रकारे अखंडबोधरूप आपल्या आत्म्याला जाण. ॥२५०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 14, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP