संपला अंधार हा झाली नवी पहाट
डोळ्यांपुढती दिसू लागली प्रकाशभरली वाट ॥
सोसले अन्याय सारे झेलले सारे निखारे
येथवरी मी चालून आलो अंधारातून दाट ॥
अज्ञानाचे बांध फोडले परंपरेचे पाश तोडले
रोखू न शकतो आता कोणी नव्या युगाची लाट ॥
लोपली सारी निशा अन् उजळल्या दाही दिशा
क्षितिजावरती सूर्य उदयाचा आला चढून घाट ॥