बालगीत - विश्वशांतीचे अन् समतेच...
मायभूमी या विषयांवरील कविता मुलांमध्ये निष्ठेचे स्फुलिंग चेतवतात आणि राष्ट्राविषयी आपल्या जबाबदारीची जाणीव करुन देतात.
विश्वशांतीचे अन् समतेचे
ब्रीद आपुले राखूया,
चला, चला रे आज तिरंगा
या खांदयावर मिरवूया...
जात, धर्म ते विसरुन जाऊ,
आपण सारे भाऊ भाऊ !
भारतभूच्या छत्राखाली
ऐक्य आपुले राखूया,
चला, चला रे आज तिरंगा
या खांदयावर मिरवूया...
भीती न आम्हां मुळी कुणाची,
अभेदय छाती हिमालयाची !
भय कशाला आक्रमणाचे
शूर शिपाई होऊया,
चला, चला रे आज तिरंगा
या खांदयावर मिरवूया...
पाऊल आता पुढेच टाकू,
भारतभूची कीर्ती राखू !
हरितक्रांतीचा, विज्ञानाचा
मंत्र संजीवन गाऊया,
चला, चला रे आज तिरंगा
या खांदयावर मिरवूया...
जनन-मरण हे तुझ्याचसाठी,
टिळा मातिचा लाविन माथी !
सार्वभौमत्व हे भारतभूचे
अभंग आपण राखूया,
चला, चला रे आज तिरंगा
उंच नभावर चढवूया
N/A
References :
कवी - प्रकाश गोसावी
Last Updated : December 26, 2007
TOP