श्रीशिवबांची माय जिजाई महाराष्ट्राची शान
हिच्या यशाचे, पराक्रमाचे गाऊया जयगान !
मूर्तिमंत ही तेज प्रसवली तेजवती माता
शककर्त्याला काळ म्हणे ’त्या’ -तू युगनिर्माता
मंगला, स्वातंत्र्याचे पावन अर्पी दान
श्रीशिवबांची माय जिजाई महाराष्ट्राची शान !
शिवरायांच्या बालमनावर करिता संस्कार
युगायुगांचे स्वप्न मराठी झाले साकार
देशासाठी जळत राहिली ज्योती हीच महान
श्रीशिवबांची माय जिजाई महाराष्ट्राची शान !
स्वतंत्रतेचे सूर घुमवुनी शिवबांच्या कानी
साधीभोळी माय मराठी झाली रणराणी
या तेजाने शतकोटींचे फुलोत पंचप्राण
श्रीशिवबांची माय जिजाई महाराष्ट्राची शान !