धन्य सवाई सरखेल राघोजीराव मुख्य अधिपती । कीतीक त्या तेजापुढे लोपती ॥ध्रु०॥
पूर्वी कोण्या पूर्वजाने समयी शत्रु सैन्य पळवुनी । सर्व साकल्य हुजुर कळवुना ॥
महाराजांचे प्रसन्न मन ते आपल्याकडे वळवुना । आले संकट सारे टळवुनी ।
श्रम साध्य सरखेलपणाचे अक्षय पद मिळवुनी । टाकिले दरिद्र दुर खिळवुनी ॥
चा० त्या वंशामध्ये जन्मले ॥ राघोजीराव चांगले ॥ भले मर्दुमिने शोभले ॥ चा०
जळात आणि प्रांतात ज्याला रिपु थर थर कापती । येउन अपराधी पाई लागती ॥१॥
नूतन विसा बाविसात उंबर स्वरूप शाम सुंदर । चढाइत घोड्यावर बहादर ॥
स्वता करवली करून मागे मारितात चादर ।
शूर कर जोडिता एकंदर ॥ कलगि तुरा शिरपेच झळाळित कडी कंठी नादर ।
हजारो जन करिती आदर ॥चा० गर गर भाला फिरविती ॥
राव पहिलवान हरविता ॥ गवयांचे गर्व निरविती ॥ चा० प्रवीण गाण्यामधे टाकिती साजावर थाप ती ।
सूर स्गीन विणे वाजती ॥२॥
स्वारी निघे कडकडीत भयंकर आरब किंकाळती । वारुमधे कोतल चौताळती ।
स्वार पिच्छाडिस मांड बरोबर दाटित संभाळती ।
हात हलतंच हुकूम पाळती ॥ दोहो बाजूस मोरचले मिजाजित रायावर ढाळती ।
पाहून मुखचंद स्त्रिया भाळती ॥चा० पुढे बल्ल बाण चालती ॥ भालदार मधुर बोलती ॥
खावंद मोठे मसलती ॥चा० धनि दिवाण साहेबास शंकरे दिली संतत संपती । ठेंगणी भुय आटीव आकृती ॥३॥
उदार गजराबाई सदोदित हास्यानन मावली । असले पुत्र सती प्रसवली ॥ उभय लौकिक रक्षुन जगात ध्वज लावली ।
हीच महायात्रा घरी पावली ॥ अशा कल्प वृक्षाची पडावी किंचित तरी सावली । जडो हे मन त्यांचे पावली ॥ चा०
मर्जिनरूप जे वागती ॥ झाले वर्तमान सांगती ॥ नंतर निरोप मागती ॥चा०
जलदी किती कामाची हुशारित चक्रापरि तळपती । जेव्हा तेव्हा हत्यार चमके हाती ॥४॥
ताईसाहेब भाग्याची पुत्र आणि पौत्रादिक साजती । श्रीमंतिणी स्त्रियात सुविराजती ॥ अनेक राजद्वारी अखंडित जय वाद्ये वाजती ।
विप्र मंगल घोष गर्जती ॥ राज्य असुन तर लहान मुल्खो मुलुखी कीर्त गाजती । नाव ऐकुन धनाढ्य लाजती । चा०
किती छत्रामधे जेवती ॥ किती घरीच अन्न सेविती ॥ किती कामावर ठेविती ॥ चा०
किती कारकुन लिहिणार किती कर जोडितात दंपती । दया येई मग मातुश्री प्रती ॥५॥
नित्य दान काही पुराण समई गान होतसे । सदा सत्काळ यात जातसे ॥ काय कोठे कमी जास्त सती ते सर्व स्वता पहातसे ।
खबर पर राज्यातिल येतसे ॥ चा० नाही राज्यामधे तस्कर ॥ हे जनास श्रेयस्कर ॥ भोगिती सुख सोयस्कर ॥ चा०
घरोघर गाती गीत जास्त नाही रयतेवर बाबती । शिरस्ते कदीम तेच चालती ॥६॥
सदैव मुक्तद्वार कुलाबा गरिबांचे माहेर । जसे तप साधनास बेहर ॥ श्रीमंत गेल्या पसुन मिळेना अन्न कोठे बाहेर ।
म्हणुन झड घालितात लाहेर ॥ वस्त्र पात्र येई शिधा हेच ह्या सरखेलांचे हेर । उचीच नव्हे शब्दांचा आहेर ॥ चा०
पहा पहा राजांचे मुख ॥ उभे रहा क्षणभर सन्मुख ॥ होइल दरिद्र विन्मुख ॥ चा०
प्रपंच कल्याणार्थ कराया प्रभूस विज्ञापती । सौख्य पावाल सर्व निश्चिती ॥७॥
मंत्री विनायक परशराम ते बुद्धिचे सागर । सर्व गुणी विद्येचे आगर । भुजंग राजे भुलती सुवासिक दिवाण मैलागर ।
राजकारणी एक नट नागर ॥ येती किती दर्शनास ब्राह्मण आणि सौदागर । रात्री हरहमेश होई जागर ॥ चा०
मुळी पुण्यवान ते धनी ॥ कारभारी तसे साधनी ॥ गंगु हैबती कवी शोधनी ॥ चा०
महादेव गुणी म्हणे प्रभाकर क्षेम असो भूपती । न्यहाल कधी करतिल सहजोगती ॥८॥