ब्राह्मण पूजा
(पूजकाने गंधाक्षता फूल, विडा, दक्षिणा व नारळ पुरोहिताला अर्पण करून नमस्कार करावा.) -
नमोऽस्त्वनंताय सहस्रमूर्तये । सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे ॥
सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते । सहस्रकोटियुगधारिणे नमः ।
(पुरोहिताने आशिर्वाद द्यावा )-
दीर्घमायुः श्रेयः शांतिः पुष्टिश्चास्तु । शुभं भवतु ।
पूजा झाल्यावर फटाके वाजवावेत नंतर सर्वांना प्रसाद, पानसुपारी, अत्तर, गुलाबपाणी, शीत किंवा उष्ण पेये यथाशक्ती देऊन संतुष्ट करावे. रात्री यथाशक्ती जागर करून करमणुकीचे कार्यक्रम करावेत.
(रात्री निजण्यापूर्वी (सुपारीवर) गणपतीवर गंधाक्षता व फूल वाहावे.) -
यांतु देवगणा सर्वे पूजामादाय मामकीम् ।
इष्टकाम-प्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ॥
अशा प्रकारे गणपतीचे विसर्जन करावे. इतर देवतांचे, देवीचे व वह्या तराजू, इत्यादींचे विसर्जन नाही. दुसर्या दिवशी सकाळी पूजा साहित्य आवरावे. निर्माल्य मोठ्या जलाशयात टाकावे. पूजेची उपकरणी पुन्हा घरात जागी ठेवावी. मूर्ती, तसबिरी घरात होत्या तेथे ठेवाव्यात. ब्राह्मणाला तांदूळ, वस्त्र, फळे, दक्षिणा, लोकांनी अर्पण केलेले द्रव्य आदि जे योग्य ते द्यावे. धन, नाणी, दागिने आदि काळजीपूर्वक उचलून जागच्या जागी व्यवस्थित ठेवावेत.
सूचना - रात्री देवीला निद्रा घेण्यासाठी एका पाटावर रांगोळीने कमलाकृती काढावी. तीत हळदकुंकू भरावे, मूर्ती तेथे ठेवावी व देवीने तेथे निद्रा घ्यावी अशी मनोमन प्रार्थना करावी. (ही पद्धत काही लोकात आहे.)
महत्त्वाची सूचना
केवळ श्रीमहागणपतये नमः व श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः ।
अशा नाममंत्रानीही हा पूजाविधी करता येतो. स्वतः पूजा करताना त्याचा उपयोग होईल.
॥ इति पूजाविधिः समाप्त ॥