दोन ताम्रकलश ( एक पूजेसाठी पाणी ठेवण्याचा, दुसरा लक्ष्मीपूजनाकरिता पाण्याने अर्धा भरलेला ). केळीचे पान, तीन पाट (एक पूजेत ठेवण्यासाठी, एक पुरोहिताला बसण्यासाठी, एक स्वतः पूजकाला बसण्यासाठी), दोन आसने, लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मीची व सरस्वतीची तसबीर, तीन तबके/ताम्हने (एक कलशावर ठेवण्यासाठी, एक फुले ठेवण्यासाठी, एक आचमनादि कार्यासाठी), पूजेचे पदार्थ ठेवण्यासाठी एक मोठे ताट, एक भांडे, एक पळी, तीन वाट्या ( एक गंधासाठी, एक अक्षतांसाठी व एक मोठी तीर्थ ठेवण्यासाठी), समई, नीरांजन, धूपारती, कापूरारती, समईत तेलवात, निरांजनात तूप व फुलवात, उदबत्तीचे घर, उदबत्त्या, शंख, घंटा, शंखाची बैठक, पंचामृताचे पाच पुडांचे कचोळे (दूध, दही, तूप, मध व साखर हे पाच पदार्थ कचोळ्यात घालून ठेवणे.), कुंकवाचा करंडा, रांगोळी, अत्तराची कुपी, नैवेद्य ठेवण्यासाठी मोठी पात्रे, दोन किलो तांदूळ, शुद्ध पाणी; उगाळलेले गंध (वाटीत), तांदूळ भिजवून कुंकू लावून केलेल्या अक्षता (एका वाटीत), अबीर, सिंदूर, काड्यांची पेटी, हळदीकुंकू, धने, गूळ-खोबरे, साखरफुटाणे, साळीच्या लाह्या, बत्तासे, पेढे, गुलाबपाणी (गुलाबदाणीत), अत्तरदाणी, विड्याची १० पाने, १० सुपार्या, २ नारळ, एक उपरणे, एक खण, गणपतीसाठी कापसाची दोन वस्त्रे, ब्राह्मणाला देण्याची दक्षिणा, पूजेत ठेवण्याच्या दक्षिणेसाठी सुटी नाणी (सुमारे पाच रुपयांची), पूजनासाठी योग्य पात्रात दागिने, सोने नाणे, रत्ने, चांदीची नाणी, हिशेबाच्या नवीन संवत्सरांच्या वह्या, दौत, टाक, लेखणी, तराजू, वजनेमापे;, दूर्वा, विविध प्रकारची फुले, फुलांच्या माळा, तोरणे, पताका, शक्य तेथे विजेच्या दिव्यांची रोषणाई; पूजा व आरती झाल्यावर वाजविण्यासाठी फटाके, आमंत्रितांसाठी बैठकीची व्यवस्था, विड्याचे साहित्य, पानसुपारी, आंब्याचे डहाळे (१ पूजेत कलशावर ठेवणे व १ किंवा २ दारावर टांगणे), निर्माल्यासाठी परडी, देवीला रात्री निद्रेसाठी एक छोटा पाट.
दुकान, पेढी, कार्यालय, व्यवसायाची जागा किंवा स्वतःच्या घरी- लक्ष्मी पूजन करावे. त्या तिथीस दुपारपासूनच पूजेच्या तयारीस लागणे सोयीचे असते. पूजास्थान स्वच्छ करावे, रंग लावून, पताका, पुष्पमाळा, तोरणे, आम्रपल्लव, विजेची आरास करून ते सुशोभित करावे. इष्टमित्र, व्यापारी, सहव्यवसायी यांना निंमंत्रणे पाठवावीत. 'लक्ष्मी' म्हणून नाणी, सोन्याचांदीचे दागिने, भांडी, पैसे यांची व्यवस्था करावी. लक्ष्मी पूजनासाठी घेतलेली नाणी वर्षभर तशीच जपून ठेवावीत, तसेच दरवर्षी यथाशक्ती त्यात भर घालून वाढ करावी. सरस्वती पूजनासाठी जमाखर्चाच्या वह्या, रोजकीर्दीच्या चोपड्या, इत्यादि घेऊन नववर्षासाठी त्या उपयोगात आणावयाच्या म्हणून त्यांची पूजा करण्यासाठी त्यांच्या पहिल्या पृष्ठावर कुंकुममिश्रित गंधाने स्वस्तिक रेखाटावे. संवत्सर, तिथी, महिना यांचा तेथे उल्लेख करावा. ॥शुभ॥ ॥लाभ॥ असे लाल गंधाने त्या पृष्ठावर लिहावे. शाईच्या दौती, लेखणी, तराजू, वजने, मापे पूजेसाठी ठेवावीत. पाटावर किंवा पानावर पसाभर तांदूळ पसरून त्यावर कलश, कलशात ( पुढे पूजेत सांगितल्याप्रमाणे ) नाणी, फुले इत्यादि, कलशावर आंब्याचा टहाळा, त्यावर तबक, तबकात तांदूळ, तांदळावर कुंकवाने स्वस्तिकाकृती, त्यावर लक्ष्मीची मुर्ती (कमलास्थस्थ किंवा उभी) किंवा तसबीर, त्याच तबकात एक नारळ असे ठेवावे. पाटाच्या/पानाच्या एका बाजूस थोडे तांदूळ ठेवून वर गणपतिप्रतीक म्हणून एक सुपारी ठेवावी. जमाखर्चाच्या वह्या कलशासमोर, त्यावरील 'शुभ लाभ' अक्षरे दिसावीत अशा ठेवाव्यात. निमंत्रितांसाठी खुर्च्या, जाजम, लोड, तक्क्ये यथाशक्ती ठेवावे. त्यांच्या आदरातिथ्याची सोय असावी.
पूजकाने स्नान करून धूतवस्त्र किंवा रूढी असेल त्याप्रमाणे सोवळे नेसून (स्वच्छ, न फाटलेले, पीत, लाल, किंवा पांढरे वस्त्र असावे), उपरणे खांद्यावर घेऊन, स्वतःला मंगलतिलक लावावा, घरातील देवांना व वडील मंडळींना नमस्कार करून, पुरोहिताचे स्वागत करावे, त्यालाही मंगलतिलक लावावा. पाटावर आसन घालून त्यावर बसावे. आपल्या जवळच पुरोहिताचे आसन असावे. पूजकाने डाव्या हातास पाण्याचा तांब्या, समोर ताम्हन, पळीभांडे, देवाजवळ समई लावलेली, उदबत्ती, निरांजन, शंख, घंटा यांच्या जागी ते ते ठेवावे. मग आचमनादि कर्मे करून पूजेस प्रारंभ करावा.
वातावरण शांत, प्रसन्न असावे. गोंधळ, गडबड, केरकचरा असू नये. दीपांचा प्रकाश सर्वत्र असावा. निमंत्रितांनीही स्वच्छता पाळावी.