कोण्या वैभवात होऊनिया लीन
विसरसी दीन लेकरांना ?
म्हणतात तुझ्या दयेला ना अन्त
पुकारती सन्त थोरी तुझी
चिमण्यांच्या घरा लावशी मशाल
केवढी विशाल दया तुझी !
जळातले जीव तापल्या दुपारी
वाटवटावरी ओढसी तू
पाहसी तू शांत त्यांची तगमग
कोणाचा हा राग कोणावरी ?
कोण गुन्हेगार क्षमावन्त देवा
क्षमेचा अन् ठेवा कोणासाठी ?
तुझ्या महिम्याची प्रचंड पुराणे
गमती तराणे अर्थहीन !
तुझी पाषाणाने पहिलीच मूर्ति
घडविली, मति थोर त्याची !
आणि आता त्याच मूर्ति पुजवून
वेडे विडम्बन करतात !
असो, भलेबुरे वदलीसे वाचा
काय मानायाचा त्याचा राग
निखार्यात बद्ध असताना पाय
अपेक्षिसी काय संकीर्तन !