तू गगन-महाली बैससी वैभवशाली
मी पायपथाच्या धुळीत खपतो खाली
गुदमरुनि उभा मी अथांग या गर्दीत
या कोलाहलि तुज आळवतो मधु गानी
स्वर-लहरि कधी त्या रिघतिल का तव कानी ?
हे ह्रदय नसे परि स्थंडिल धगधगलेले
आशांचे इंधन अखंड त्यावर चाले
हे जीवन की हे मृगजळ एक विराट
मृग आर्त धावती दूर, सारखे दूर
अन् क्षितिजावरती सदा जलाचा पूर !
रे परत पाखरा, परत जायचे आज
ये अस्तगिरीवर क्षणाक्षणाने सांज
रवि सुवर्ण-तारूसम लोपेल समुद्री
पसरील पंख काळोख निळ्या आकाशी
ये गाऊ तोवर, बैस जरा मजपाशी !
एकाग्र मनाने पूजित होतो मूर्ती
मिटलेल्या डोळा दिसे दिव्यशी दीप्ति
का जागृत केले करूनी भग्न समाधी
अन् ऐकविले ते सत्य कठोर विधान
"रे देवा नसे हा, असे मात्र पाषाण !"
रेखले मनोहर हे रमणीचे चित्र
कमलापरि फुलले दिसे गात्र नी गात्र
उत्फुल्ल स्तन ते, कुंभ जणू कनकाचे
जडविली जयावर आणि माणके लाल,
परि ह्रदय त्यातले कधी काय रेखाल ?
ही वाट वनातुन गर्द भरे अंधार
मावळे विधूची कधीच बारिक कोर
हा घुमे पिशाचापरी तरूतुनि वारा
चमकती दूरवर तुझ्या घरातिल ज्योति
पद पुढे ढकलतो विसंबून त्यावरती !