नाम तुझे गाती गाती थोरसान
दारी तुझ्या दीन दान घेती
चिखलात येता मूल माखोनिया
प्रेमे न्हाऊ तया घालतोसी
किंवा ज्याचा प्राण भुके कासाविस
त्याला दोन घास भरविसी
आणि येता कोणी पांगळा वा खुळा
त्यालाहि तू लळा लावितोसी
केव्हांचा रे उभा मीहि तुझ्या दारी
उशीर का परी आज असा ?
तूच भक्तासाठी सोसलीस झीज
आणि आता नीज कशी आली ?
किंवा दारी तुझ्या आलो रित्या करी
म्हणोनिया दूरी राहिलास !
अपेक्षिसी देवा काय नजराणा
कारण तू राणा जगताचा
पावलात तुझ्या गुंतलेले मन
काय अन्य धन माझ्यापाशी ?
उधळित आज भक्तीचीच फुले
डोळे तुझे ओलो करीन मी !
तूच पाठविले हाटात या मला
नाही कोणी दिला वाटाड्याही
वाटा कितीतरी तूच निर्मिल्यासे
बालमन कसे चुकेल ना ?
तूच दिले माझ्या डोईवर ओझे
पंकी पाय माझे रुतविले
तूच जागोजाग मांडलेसी खेळ
राहिला न वेळ ध्यानी माझ्या
आणि आता होता वेळ परताया
का रे देवराया कोपसी तू ?