लवले होते फुलुनि ताटवे नव्या वसन्तात,
चंद्र बिलोरी शिंपित होता रजताने रात.
बसलो होतो हिरवईळीत गुणगुणत भावगीत
आशा पक्ष्यांपरी उडाल्या होत्या गगनात.
तोच अचानक फूले कोठुनी पडली ओंजळभर.
आणि खोडकर तुझे हात ते आले खांद्यावर.
कलेकलेने चंद्राप्रि ते प्रेमहि मावळले
शीड फिरवुनी तारु आपुले माघारी वळले.
आज पुन्हा त्या जागी येता तुटलेले धागे
ताटव्यात या दिसती अजुनी, हो अंतर जागे.
आज नसे ती व्याकुलता, ना राग, न अनुराग
विझून गेली कधीच, जी तू फुलविलीस आग,
मात्र कुतूहल केवळ वाटे वळताना पाउले
किती जणांवर उधळलीस वा उधळशील तू फुले ?