अससि कुठे तू ? ढगास दडती मिनार ज्याचे निळे
सुवर्णदिपामधे स्नेहमय वात जिथे पाजळे
त्यागुनि शेषासना विहरते श्रीदेवी ज्या स्थळी
पायघड्यास्तव जिथे शिंपती मोत्यांच्या ओंजळी
जिथे परांच्या शय्येवरती विलासते यौवन
अधिकाराचे जिथे विराजे सुखकर सिंहासन
अससि काय तू त्या प्रासादी, विभवाच्या संगती
भग्न उसासे पण तेथुनही वार्यावर वाहती !
अससि कुठे तू? रूप सृष्टिचे प्रकट जिथे जाहले
जिथे चराचर मंगलतेने शुचितेने नाहले
नितळ शीत जळ संथ गतीने नदीमधे झुळझुळे
हार सृष्टीचा निखळुनि मोती एकएक की गळे
दाट आमराईत विसावा वितरितसे सावली
मोट उपसते विशुद्ध जीवन-गंगा विहिरीतली
वससि काय तू झोपडीत त्या किसानगोपासवे
तिथेहि पडती धुळीमधे पण जळजळती आसवे !
अससि कुठे तु ? जिथे प्रभूची मूर्ति उभी मन्दिरी
रसाळ गीते भक्तजनांची दुमदुमती अम्बरी
सुगन्धमय धूपांचा परिमळ वातावरणी भरे
मृदंग झांजातुनी झिरपती भक्तुसुधेचे झरे
मायपाश जिथे तुटलेले, जिवाशिवाची मिठी
विरक्तता जेथून पाहते पैलजगाच्या तटी
अस्सि काय तू मन्दिरात त्या भक्तमंडळासह
वैफल्याची तिथेहि जळते चिता कधी दुःसह !
अससि कुठे तू-अखण्ड मानवयात्रा तुज शोधते
अथवा अससी मृगजल, परि जे प्रगतिपथी ओढते !