सिंह, अस्वल, माकड व कोल्हा

इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत.

Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral.


सिंह, अस्वल, माकड व कोल्हा

एकदा अरण्याचा राजा सिंह याने आपल्या प्रजाजनांना दरबारात हजर राहण्याचा हुकूम सोडला. त्याप्रमाणे बहुतेक प्राणी सिंहाच्या दरबारी आले. अस्वलाला सिंहाच्या स्वयंपाक घरातून येणारा वास सहन न झाल्याने त्याने आपले नाक दाबून धरले. हा त्याचा उद्धटपणा पाहून सिंह रागावला व त्याने आपल्या पंजाच्या एका तडाख्यात अस्वलाला मारले. हा भयंकर प्रकार पाहून माकड भितीने थरथर कापू लागले. मग काहीतरी बोलायचे म्हणून ते सिंहास म्हणाले, 'राजेसरकारांच्या स्वयंपाक घरातून येणारा सुवास निरनिराळ्या उंची मसाल्याचा आहे. तो त्या मूर्ख अस्वलाला सहन झाला नाही. हे त्याचं दुर्दैव होय. राजे सरकारांचे पंजे तर फारच सुंदर आहेत, तसे इतर कोणाचेही नसतील.' माकडाचे हे बोलणे ऐकून सिंहाचे समाधान तर झाले नाहीच पण तो इतका चिडला की, एका क्षणात त्याने त्या माकडाच्या चिंधड्या उडविल्या. नंतर तो कोल्ह्याकडे वळून त्याला म्हणाला, 'कसे काय कोल्हेदादा ? माझ्या स्वयंपाकघरातून येणारा वास कशाचा असावा असं तुला वाटतं ?' त्यावर तो कोल्हा धूर्तपणे म्हणाला, 'महाराजाधिराज, नुसत्या वासावरून तो वास कशाचा आहे हे सांगता येण्याइतकं माझं नाक आधीच तीक्ष्ण नाही त्यातून मला आज पडसं झालेलं असल्यामुळे आपल्या घरातून येणार्‍या वासासंबंधाने अभिप्राय देण्याचं धाडस मी करत नाही.'

तात्पर्य - प्रसंगावधान व समयसूचकता या गुणांच्या बळावर माणुस वाटेल तसल्या संकटातून मुक्त होऊ शकतो.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-11T19:22:43.8100000