एका पिंजर्यात एक पारवा कोंडून ठेवला होता. तो 'या पिंजर्यात मला किती पिलं झाली ! मी किती धन्य !' अशी बढाई मारू लागला. तेव्हा जवळच असलेला कावळा त्या पिंजर्याजवळ येऊन म्हणाला, 'मित्रा, तुझ्या बढाईच्या गोष्टी पुरे कर. जो जो तुझी संतति वाढेल, तो तो ती तुला अधिक दुःख होण्यास कारण होईल. कारण ती सर्व पिलं ह्याच पिंजर्यात तुझ्यासारखी कोंडून ठेवलेली तुला पाहावी लागतील.
तात्पर्य - पारतंत्र्यात राहून संततीचा सुकाळ होण्यापेक्षा स्वातंत्र्यात राहून निर्वंश होणे बरे !