एका मांजराला त्याच्या लहानपणी एक चिमणी खेळावयास दिली होती. तिची व त्याची फार मैत्री जमली. चिमणीने मांजराभोवती उड्या माराव्या व मधूनच त्याला टोचावे तर मांजराने आपल्या पंजाने तिला दूर लोटावे असा खेळ चालला होता. ती दोघेही एकमेकांवर कधी रागवत नसत. पुढे त्या चिमणीच्या ओळखीची दुसरी एक चिमणी होती. तिचे हिच्याशी भांडण झाले. दुसरी चिमणी सशक्त असल्याने तिने हिला टोचून टोचून फार त्रास दिला. मग ती चिमणी मांजराजवळ आली व तिने त्या चिमणीला शिक्षा करण्याविषयी विनंती केली. मांजराने लगेचच झडप घालून त्या दुसर्या चिमणीस पंजात पकडले व एका क्षणात खाऊन टाकले. त्या चिमणीचे मांस मांजराला फार आवडले. मग ते म्हणाले, 'चिमणीचं मांस इतके रुचकर असते हे आजपर्यंत मला ठाऊक नव्हते.' इतके बोलून त्याने आपल्या मैत्रिणीवरही झडप घातली व तिलाही खाऊन टाकले.
तात्पर्य - कोणत्याही प्राण्याच्या दुष्ट मनोवृत्ती एकदा जागृत केल्यावर त्याला आवरणे फार कठीण असते.