मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सच्चिदानंद स्वामी पोथी| ११ सच्चिदानंद स्वामी पोथी सद्गुरू सच्चिदानंद स्वामींचे चरित्र अध्याय – १ अध्याय – २ अध्याय – ३ अध्याय – ४ अध्याय – ५ अध्याय – ६ अध्याय – ७ अध्याय – ८ अध्याय – ९ अध्याय – १० ११ अध्याय - ११ श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेले स्वामी महाराजांना भगवान दत्तात्रयांनी दर्शन देऊन प्रासादिक पादुका व छडी दिलेली आहे. Tags : pothisacchidanandपोथीसच्चिदानंद अध्याय - ११ Translation - भाषांतर विविध संतांची जयंती पुण्यतिथी । विविध उत्सव साजरे होती ।रावेरी दत्तमंदिरी येती । भक्तजन उत्सवासाठी ॥साजरे होती तिथीवार । तसैचि पवित्र सणवार ।आनंद होतसे अपार । रावेरकर भक्तांसी ॥भाद्रपदात मोठे उत्सव । भाद्रपद पौर्णिमा अन् वद्य नवमी उत्सव ।हेचि श्रीसच्चिदानंद स्वामींचे उत्सव । साजरे होती उत्साहात ॥दत्तजयंती सोहळ्याचे । त्यातील विविध पर्वणींचे ।प्रसिद्ध रथोत्सवाचे । आकर्षण असे भक्तांना ॥संपूर्ण भारतवर्षांत । एकमेव रथोत्सव असत ।दत्तपादुका रथांत । ठेवोनी परिक्रमा करिती ॥नागदिवाळी तिथीस । श्रीसच्चिदानंद स्वामींस ।प्रथम देऊनी निमंत्रणास । इतरांस निमंत्रण उत्सवाचे ॥मस्तनशहावली कुंवरस्वामी । अन्य संत रामबाई स्वामी ।जे जे रंगले दतातनामी । तयांसी निमंत्रण जाते ॥निमंत्रण दिंडी सोहळा असे । सर्वधर्मीय जनांचा सहभाग असे ।सर्व जातींचाही वाटा असे । एकोपा सर्वधर्मसमभावाचा ॥मोक्षदा एकादशी पासून । दत्तजन्मोत्सव सुरू होऊन ।पंचमीसी प्रक्षाळपूजन । सात दिवस कीर्तन असे ॥श्रीसच्चिदानंद स्वामींच्या ध्वजाचे । श्रीसद्गुरूंच्या पोथीचे ।श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे । पूजन होतसे उत्सवात ॥मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेसी । भक्त जमती रथोत्सवासी ।लाकडाच्या ह्या रथासी । ओढती श्रद्धेने भक्त ॥काष्ठाचे अश्व सुंदर । रथासी छान कलाकुसर ।रथात बैसे योगेश्वर । सारथ्य करी अर्जुन ॥असे चित्र कल्पून । रथ दिला भेट म्हणून ।उत्तमप्रकारे सजवून । बेटावदच्या रतनबाईंनी ॥श्रीसच्चिदानंद स्वामींसी । अग्रवालशेट देती रथासी ।रतनबाई देती नवीन रथासी । तोच आता उपयोगी ॥जेव्हा दत्तात्रेयांची इच्छा होय । तेव्हा रथ ओढला जाय ।थकती सर्व उपाय । जर नसे देवाची इच्छा ॥ह्या घटनेची प्रचिती । आजही अनेक भक्त घेती ।रथ हाताने ओढती । रथ मार्ग आठवडीबाजारातून ॥प्रचंड मोठा रथ चालत । छोट्या मार्गातून जात ।भक्त होती अचंबित । पाहून हा चमत्कार ॥भक्तजन हंडी फोडती । विविधरंगी फटाके फोडती ।आतषबाजी त्यास म्हणती । भक्त तालावरी नाचती ॥दत्तपादुका प्रासादिक । तयांचे होतसे कौतुक ।दत्तपादुकांचे अर्चक । करिती प्रक्षाळपूजा ॥दत्त गुरू पालखीत बैसती । नगरपरिक्रमा करिती ।मंदिरी पुन्हा येती । पाऊलांच्या ठश्यांची प्रक्षाळपूजा ॥तीळगूळ मिश्रित । रेवडीचा प्रसाद असत ।सेवन करूनी तृप्त होत । भक्तजन रथोत्सवात ॥मार्गशीर्ष वद्य द्वितीया । पालखीत बैसे विठुराया ।पालखीचे भोई व्हाया । आवडे बहुत भक्तांना ॥सजवलेल्या पालखीत । दत्तपादुका असत ।विठ्ठलमूर्ती समवेत । गोपालजी असती तेथे ॥नगरपरिक्रमा करून । दत्तमंदिरासी प्रदक्षिणा घालून ।पालखी येई मंदिरी परतून । अतिरम्य तो सोहळा ॥पंचमी तिथीसी अन्नदान । होतसे सहस्रभोजन ।भक्तांसी वाटे समाधान । होय उत्सवाची सांगता ॥असाच उत्सव खांडव्याला । श्रीसच्चिदानंद स्वामींनी सुरू केला ।गुरूपौर्णिमा उत्सवाला । तेथे असती गादीपुरूष ॥रावेरच्या भक्तांचा । उत्सव गुरूपौर्णिमेचा ।उत्सव दत्तजयंतीचा । हाचि असे एकमेव ॥नमूनिया दत्तपादुका । उत्सव करिती निका ।आता येथे अवतरणिका । लिहविली मजकडूनी ॥पहिल्या अध्यायात । श्रीसच्चिदानंदस्वामी जन्मकथा असत ।स्वामींपित्यासी दत्तदर्शन होत । ते सविस्तर वर्णिले ॥श्रीसद्गुरूंची होई प्राप्ती । श्रीदत्तगुरू दर्शन देती ।छडी प्रसादपादुका मिळती । कथिले दुसरे अध्यायी ॥स्वामींची नर्मदापरिक्रमा । ज्ञानपटाचा महिमा ।स्वामी घेती दत्तनामा । वर्णिले तिसरे अध्यायी ॥पुढील चौथ्या अध्यायात । रावेरी आगमन होत ।स्वामी दत्तपीठ स्थापित । वाचावी ही कथा ॥पाचवे अध्यायी वर्णिले । कैसे गोपालजी अवतरले ।मूर्तीरूपी प्रगटले । दत्त विठ्ठल आणि देवी ॥संत असती समकालीन । कैसे ते स्वामींचरणी लीन ।सहावे अध्यायी केले कथन । वाचावे भक्तहो ॥असे अध्याय सातवा । वर्णिले स्वामींच्या अनुभवा ।अवतार दत्ताचा जाणावा । श्रीसच्चिदानंद स्वामी ॥कथा दत्त दर्शनाची । कथा पांढऱ्या निशाणाची ।स्वामींच्या चतुर्थाश्रमाची । कथा असे आठवे अध्यायी ॥कथा नवव्या अध्यायात । समाधी योगाची असत ।संजीवन समाधी घेत । वाचावे लक्षपूर्वक ॥श्रीसच्चिदानंद स्वामींचे उत्तराधिकारी ।परंपरा तयांची सारी ।स्वामींची कृपा वंशजांवरी । वर्णिली दहावे अध्यायी ।दत्तमंदिर रावेर । साजरे होती सणवार ।उत्सवास भक्त थोर । कथिले अकरावे अध्यायी ॥ऐसे वर्णिले चरित्राला । भाद्रपद वद्य नवमीला ।एकोणिसशे पंचेचाळीस शकाला । ग्रंथराज पूर्ण जाहला ॥ह्या ग्रंथाची होतसे पूर्ती । दिगंती जाईल ग्रंथकीर्ती ।मज होय काव्यस्फूर्ती । नयनी अश्रू दाटले ॥॥ काव्य ॥श्रीसच्चिदानंद स्वामींनी आजि कृपा केलीस्वामीस्तुती लिहिण्याची सेवा मज दिधली ॥ धृ ॥श्रीसच्चिदानंद नाम राहे शब्दे भरोनियाअक्षररूपे स्वामीमूर्ती साकार झालीयास्वामीगुणगान मी आवडीने गातोचराचरी सर्व जगती स्वामींना मी पाहतोसप्तसागराची शाई असे कागद धरणीस्वामीस्तुती लिहावयाला न पुरे लेखणीमज पामराकडूनी घडली स्वामीचरित्र सेवावैभवासी ठाव द्यावा हीच इच्छा देवा ॥श्रीदासगणू विरचित । श्रीसच्चिदानंदलीलामृत ।हाचि पाया ग्रंथाचा असत । त्यावरी चरितामृत कळस ॥श्रीआनंदानंदस्वामी म्हणजेच नाना । करिती अष्टकांच्या रचना ।उपयोग त्याचा चरित्रलेखना । बहुत झाला उत्तम ॥श्रीसच्चिदानंदस्वामींचे हस्ताक्षर । ज्ञानपट जो रचिती ज्ञानेश्वर ।गुरूपरंपरेचे सार । उपलब्ध आहे रावेरी ॥इंग्रज सरकारने काढला । नंतर केशवदासांनीसुद्धा काढला ।अतिशय जपोनी ठेविला । श्रीसच्चिदानंदस्वामींचा फोटो ॥श्रीसच्चिदानंद चरितामृताचा । विधी ऐका पारायणाचा ।एक दिन अथवा तीन दिन वाचा । पुण्यप्रद हा ग्रंथराज ॥घेऊनी गहू मूठभरी । पसरून ते चौरंगावरी ।कलश ठेऊनी त्यावरी । कलशांत पाणी ठेवावे ॥शेजारी कलशाच्या । फोटो सच्चिदानंद स्वामींचा ।नसल्यास श्रीदत्ताचा । ठेवावा बहुत आदराने ॥कलश आणि फोटो पुजून । चमेलीची फुले वाहून ।नसल्यास उपलब्ध फुले अर्पून । करावे ग्रंथाचे पूजन ॥शुद्ध तुपाचा दिवा लावणे । धूतवस्त्र धारण करणे ।स्वच्छ आसनावरी बसणे । पवित्र असावे मन ।पहिले दिनी चार अध्याय । दुसरे दिनी चार अध्याय ।तिसरे दिनी तीन अध्याय । वाचोनी आरती करावी ॥देवासी नैवेद्य अर्पून । विप्रासी दक्षिणा देऊन ।ब्राह्मणभोजन घालून । करावी पारायण समाप्ती ॥ऐसे करिता पारायण । प्रसन्न होईल अत्रिनंदन ।सुखसमृद्धीने भरेल जीवन । श्रीसच्चिदानंद स्वामींच्या कृपेने ॥देवाहून श्रेष्ठ श्रीसद्गुरू । ठेविला त्यांनी कृपाकरू ।बुद्धिवैभवाचा दातारु । एकमेव श्रीसद्गुरूराव ॥श्रीसद्गुरूंनी जे लिहवीले । ते येथे प्रगट जाहले ।माझे काही न उरले । ग्रंथ अर्पण करितो आता ॥श्रीसद्गुरू आनंदकंद । स्वामी श्रीसच्चिदानंद ।दासवैभव पदारविंद । शत शत नमन करितो ॥इति श्रीदासवैभवविरचिते श्रीसद्गुरू सच्चिदानंदचरितामृते एकादशोध्यायः N/A References : N/A Last Updated : August 24, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP